कधी जमतं, कधी गप्प बसते.
14 September, 2025
आज गप्प बसून राहिलो तर पुढच्या पिढीला काय आपण काय देणार?
कधी जमतं, कधी गप्प बसते.
15 June, 2024
सवाष्ण कादंबरी ( डॉ. क्षमा गोवर्धने-शेलार)
29 April, 2024
अमलताश फिल्म
06 March, 2024
अनय
30 December, 2023
Three of us
19 December, 2022
मौनमुद्रा
04 December, 2022
माणसं
16 November, 2022
चिऊची डायरी
फाल्गुनी पाठक
MajaMaOnPrime
द शम्मी कपूर
12 July, 2020
रात हमारी तो... (परिणीता)
परिणीता मला अनेक कारणांमुळे आवडतो. तो सिनेमा पाहायचा तर त्या दोघांच्या लव्हस्टोरीसाठी बघावा... आणि संजय दत्त / रेखा / आणि बाकी सगळी मेलोड्रामॅटीक लोक पडद्यावर येतात तेव्हा डोळे मिटून घ्यावेत... रेखाच्या जुन्या सिनेमांवर फिदा असलेल्या रेखाला या सिनेमात पाहणं माझ्यासाठी नकोसं होतं... रेखा हा खरंतर एका स्वतंत्र पोस्टचा विषय आहे... असो. रेखा आठवली की भरकटायला होतंच!
एकमेकांशी प्रेमात एकनिष्ठ असणं ही भावना आहे... लग्नसंस्था त्याला फक्त सामाजिक आणि कायदेशीर मान्यता देते इतकंच. हे असं एकनिष्ठ आणि तरीही
स्वाभिमानी असणं विद्या बालनने सहज अभिनयातुन दाखवलाय. कपाटातुन पैसे घेणं... जाऊ नकोस म्हटल्यावर रेखाच्या नाईट क्लबला न जाणं.. वगैरे अनेक प्रसंग आहेत.
पण एक इनमिन पाच-सात मिनिटांचा शॉट आणि त्याला जोडुन आलेलं गाणं मेरे दिल के बहोत करीब है...
लोलिता ... इथे ललिता असा मराठीतला वेडपट उच्चार करायचा नसतो... हां तर ... लोलिताचे वडील आजारी पडल्यावर शेखर त्यांना आणि खरेतर लोलिताला भेटायला आलेला असतो. तिथे आल्यावर शेखरला समजतं की गिरीशच्या खर्चाने लोलिता आणि तिचं कुटूंब परदेशात जातंय.. तिच्या वडलांच्या उपचारासाठी. आधीपासुनच चिडलेला शेखर याही वागण्याचा जाब विचारायला लोलिताकडे जातो आणि तेव्हा शेखरशी जुजबी बोलून गिरीशशी (संजय दत्त .. यांना दुसरा कोणी भेटला नाही का ) सहजपणे बोलत बोलत लोलिता बाहेर जाते. ते पाहून शेखर अजुनच भडकतो. पण त्याला तिच्याशी बोलण्याची गरजही वाटत नाही... (टीपिकल जुन्या काळचा नवरा फिलींग... मेरे होते हुए तुमने ऐसा किया क्यू टाईप्स) शेखर तरातरा पायऱ्या उतरतो आणि भराभर गिरीशशी बोलणं संपवून ... त्याला औषधं आणायला कटवून लोलिता शेखरला भेटते. पायऱ्यांवर फक्त दोघेच पायरीवर असतात... विलक्षण वेगाने आणि आसुसून ती त्याला पाठुन मिठी मारते ... त्या एका मिठीत, चेहऱ्यावरचे भाव सगळं सांगतात... तिचा एकलेपणा... माझा शेखर लग्नाला तयार झाला असेल तरीही तो मनापासून नाही हा विश्वास... कम्यूनिकेशन गॅप असली की हे असं होतं याची जाणीव... ती उत्कटता...
पुढे लोलिता म्हणते, "अब सबकुछ ठीक हो जायेगा." त्या एका वाक्यात तिचा त्याच्याबद्दल असलेला दृढविश्वास शब्दात व्यक्त होतो. नवरा-बायकोने कधीही सर्वासमोर उघड प्रेम दाखवु नये हा त्याकाळचा संस्कार सगळं काही त्या एका मिठीत दिसलाय.
पण भडकलेला शेखर तिचं काहीही ऐकून घेत नाही. त्या दोघांची भांडणं होतात ... तो तिला अद्वातद्वा बोलतो. तिला अवाक होऊन ऐकत राहते. आणि स्वतःची बाजू सांगायला जाते पण खाडकन तिच्या कानफटात वाजवून तो निघून जातो. शेखरचं हे रूप पाहून कमालीचा धक्का बसलेली लोलिता पायरीवर बसते. मागून सूर वाजतात. गाणं वाजायला लागतं. ...रात हमारी तो
कालांतराने सैफ लग्न करायचं ठरवतो आणि तिचं भावविश्व साफ कोलमडते. तिचा स्वाभिमान इथून पुढे फक्त आणि फक्त प्रसंगातून आणि अभिनयातुन दिसतो...
एका प्रेयसीच्या नंतर बायकोच्या नात्याने त्याच्या कपाटातुन घेतलेले सारे पैसे कर्जाऊ होतात आणि ती एक अक्षर मेलोड्रामा न करता गिरीशच्या हातून घराचे पेपर्स पाठवते. तिथून पुढचा मेलोड्रामा बघण्याचा उत्साह मला नसतो. आणि आतापर्यंतच्या अवीट गोडीच्या गाण्यांचा आणि त्यांच्या लव्हस्टोरीचा मझा मी किरकिरा करत नाही.
पक्ष्यांच्या दुनियेत - भाग - ४ (गायबगळा आणि ढोकरी)
गायबगळा (Cattle Egret)
बदलत्या (खरंतर अस्वच्छ!) परीस्थितीतही अजुनपर्यंत टिकुन राहिलेल्या बगळ्यांच्या जातीमधील बगळा म्हणजे “ग़ायबगळा”...
सडपातळ बांध्याचे गायबगळे विणीच्या हंगामाव्यतिरिक्त पांढरे शुभ्र दिसतात. सोनसळी पिवळ्या रंगाचे डोळे, भाल्यासारखी निमुळती, टोकदार चोच, पायांवर पिसांचा अभाव, नर-मादी दिसायला एकसारखी... “व्ही आकाराच्या रेषेत” थव्याने उडताना दिसतात तेव्हा ‘बगळ्यांची माळफुले अजुनि अंबरात’ ह्या भावगीताची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. पाळीव गाई-म्हशी, बैल, जंगलांमध्ये – रानरेडे, गेंडे, गवे अशा प्राण्यांच्या पाठीवर बसुन निर्वेधपणे राजासारखे हिंडतात. त्यांच्या पायाने उडणारे शेती, पाणथळींच्या ठिकाणी असणारे किडेमकोडे, नाकतोडे, चतुर, टोळ तर खातातच शिवाय प्राण्यांच्या पाठीवरचे, कानामागचे चिलटे, गोचीड वगैरे किटक खातात आणि कासावीस झालेल्या त्यांच्या जिवाला थोडा दिलासा देतात.
गायबगळे खरंतर एकावेळेस ५०-५० च्या संख्येने एकत्र राहणारे पक्षी, पण वाढत जाणार्या शहरीकरणामुळे आणि बेफाम, अविचारी वृक्षतोडीमुळे सर्वच प्रजातीमधील बगळ्यांची संख्या झपाट्याने कमी होते आहे. दिवसभराच्या खाण्याच्या शोधासाठी उडुन-फिरुन थकलेले हे गायबगळे संध्याकाळी रातनिवा-यासाठी (roosting) चिंच, आंबा, वड, पिंपळ अशा आपल्या ठरलेल्या झाडांकडे झेपावतात. त्यातही अशा प्रकारची झाडे शक्यतो माणसांच्या वस्तीनजीक असल्यास त्यांना घुबड आणि गरुड-घारीसारख्या शिकारी पक्ष्यांपासुन असलेला धोका कमी होतो. त्यांना घरटी बांधणे सुरक्षित वाटते. एकाच वेळेस पुर्ण ५०-६० पक्ष्यांच्या थवा वर्षानुवर्षे एकाच झाडावर रात्री राहण्यासाठी आणि काही ठिकाणी तेथेच घरटी बांधायला राहतो. अशा झाडांना सारंगागार असंही म्हटलं जातं. व्यंकटेश माडगुळकर, मारुती चितमपल्ली यांच्या लेखांमध्ये या सारंगागाराची सुरेख वर्णने आहेत. “हा सृजनाचा सोहळा” पाहात राहणे अतिशय विलक्षण असते असंही माडगुळकरांनी त्यांच्या एका पुस्तकात म्हटले आहे.
आपल्या पनवेल गावाच्या थोडं बाहेर आता जिथे डोमिनोज पिझ्झाचं आऊटलेट आहे तिथे आणि तिथुनच जवळ असलेल्या पंचमुखी मारुतीच्या देवळाजवळ बगळ्यांची दोन झाडे होती. अलिबागला जाता-येता दरवेळेस पनवेलमध्ये शिरताना संध्याकाळ व्हायचीच. तेव्हा तिथला फ्लायओव्हरही नव्हता. बगळ्यांचा कालरव सरावाने ऐकु यायचा. आणि पाठोपाठ ते देऊळ दिसायचं. ती झाडे दोन्ही माणसांच्या वस्तीजवळ होती आणि जवळच काळुंद्रे नदीचं पाणी वाहायचं. सारंगागार म्हणुन आदर्श जागा होती ती... कालांतराने रस्ता रुंदीकरणात देऊळ ठेवलं आणि ती दोन्ही झाडे मात्र तोडली गेली. बगळ्यांचे निवासस्थान कायमचे गेले. कोणाला न खेद, न खंत! गेल्याच वर्षीच्या पावसाळ्यात बल्लाळेश्वर तलावामध्ये बगळ्यांचा लहान थवा दिसला होता पण आता या वर्षी अविचारी बुजविण्यामुळे तिथुनही जवळपास सारेच पाणपक्षी गायब झालेत.
ढोकरी (Indian Pond Heron)
ढोकरी म्हणजेच हेरॉन च्या प्रजातीदेखील अगदी सहजपणे पाणथळ जागी, धरणे, पाण्याचे कालवे, खाडीची दलदल, शेती इत्यादी ठिकाणी दिसुन येतात. सोबत दिलेला फोटो इंडियन पॉन्ड हेरॉन या जातीच्या पक्ष्याचा आहे. याशिवाय राखी ढोकरी (Grey Heron), जांभळी ढोकरी (Purple Heron) तसेच उरण आणि पणजे गावाजवळील पाणथळी (uran and panje wetlands conservation area) असणारी रातढोकरी (Black Night Heron) इत्यादी प्रजाती सहजपणे दिसतात.
दिसायला कोंबडीएवढ्या आकाराचा मातकट पाठीचा आणि पांढर्या पंखांचा हा पक्षी कोकणातील भातखाचरांमध्ये सहजपणे दिसतो. भातखाचरांमधील खेकडे, कोळी, छोटे मासे, बेडुक हे यांचं मुख्य खाद्य... भातांची रोपे आपसुक सुरक्षित राहात असल्याने शेतकरीदेखील हाकलुन लावत नाहीत. कोकणात त्यांना भुरे बगळे असंही त्यांना म्हटलं जातं. गळा, मान आणि छातीच्या बाजुस पांढर्याु रंगावर पिवळ्या- गडद तपकिरी रेषांमुळे आणि खाद्य पकडताना अतिशय निश्चल उभा राहात असल्याने पटकन आजुबाजुच्या वातावरणात इतका मिसळुन जातो की एकदम उडाल्यावरच लक्षात येतो. इतर बगळ्यांप्रमाणेच हेरॉन्स देखील थव्याने एकत्र शक्यतो एकाच झाडांवर वस्ती करतात.
इंग्रजी भाषेतील “Heronry” म्हणजे आपल्याकडील सारंगागार शब्द यांच्याचवरुन आलेला आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे आणि दिवसेंदिवस कमी होत जाणार्याक पाणीसाठे, प्रदुषित होणारे नदीकिनारे, खाडीकाठची दलदल यांच्यामुळे हेरॉन्स, इग्रेट, आयबिस, इत्यादी पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होते आहे. हे सारेच पाणपक्षी आणि त्यांची सारंगागारे निसर्गचक्रात महत्वाची भुमिका बजावतात. ह्या पक्ष्यांची विष्ठा जमवुन त्यांचे शेतजमिनीत खत म्हणुन वापर केला जातो. तसेच ह्या पक्ष्यांचे मुख्य खाद्य टोळ, चतुर, गोचीड, सरडे यासारखे किटक आणि बेडुक, खेकडे यासारखे पाण्यातले लहान प्राणी हे ह्या प्रकारच्या पक्ष्यांचे मुख्य खाद्य असल्याने खरंतर पिकांवरील कीड नैसर्गिकरीत्या नियंत्रणात राहण्यास मदत होते. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी झपाट्याने सारंगागारे कमी होत असताना मात्र गडचिरोली जिल्ह्यातील वघाळा या गावी मात्र असलेल्या मोठ्या सारंगागारचे रक्षण तेथील गावकरी मोठ्या प्रेमाने करत आहेत...
पक्ष्यांच्या दुनियेत - भाग - ३ (खंड्या आणि भारतीय नीलपंख)
03 September, 2019
पक्ष्यांच्या दुनियेत- भाग २ (सुर्यपक्षी)
महाराष्ट्रात सुर्यपक्ष्यांचे सामान्यपणे चार ते पाच प्रकार दिसतात.
जवळपास सर्वच सुर्यपक्ष्यांची हालचालीमध्यें आणि राहण्याच्या, अन्नाच्या सवयींमध्ये फारसा फरक नसतो. कायमस्वरुपी निवासी असलेले किंवा बदलत्या ऋतुप्रमाणे देशांतर्गत स्थलांतर करणारे हे चिमणीपेक्षा लहान आकाराचे पक्षी आहेत. माळरानांच्या जोडीलाच अगदी आपल्या बागांमध्ये, उद्यानांमध्येही हे पक्षी सहज दिसुन येतात. आकाराने लहान असल्याने शिकारी पक्ष्यांकडुन, मांजरींकडुन शिकार होण्याचे भय अधिक आणि म्हणुनच सतत इकडेतिकडे वेगाने उडत राहणे हा या पक्ष्यांचा स्थायीभाव. शहरांमध्ये लोकप्रिय होत असलेल्या गच्ची बागेमध्ये पाण्याची उथळ, पसरट परातीच्या आकाराची भांडी ठेवली तर मात्र ठराविक वेळेस हे सुर्यपक्षी तिथे येऊन पाण्यात डुंबण्याचा आनंद अनुभवताना हमखास दिसतात. पण आपल्या बिल्डिंगच्या आसपास काटेसावर, गुलमोहर,फणस, पळसासारखी झाडे असली आणि वर्दळ कमी असली तर हे पक्षी अगदी जवळुन पाहायला मिळायची शक्यता अधिक असते. लांब आणि टोकेरी चोचीच्या सहाय्याने पळस, जास्वंद, चाफा, रुईची फुले, सोनटक्का यासारख्या फुलांमधले रस पिणं, आसपासचे किटक, बारीक अळ्या हे यांचं आवडतं खाणं. इतर निवासी पक्ष्यांप्रमाणेच मार्च ते जुन हा याही पक्ष्यांचा विणीचा हंगाम. इतर वेळेस काहीसे फिकट दिसणारे ह्यांच्या पिसांचे रंग अधिक आकर्षक होतात आणि लाल रंगांच्या पळस-पांगार्याच्या पार्श्वभुमीवर हे लाल-पिवळे-काळे तजेलदार रंगांचे देखणे पक्षी प्रकर्षाने लक्षात येतात. आपल्या सामान्य लोकांच्या लक्षात येणारा फरक म्हणजे या सर्व पक्ष्यांचे बदलते आणि आकर्षक होणारे रंग.
त्यातले चटकन ओळखता येणारे आणि आपल्या शहरी भागात दिसणारे दोन सुर्यपक्षी आहेत. जांभळा सुर्यपक्षी (Purple Sunbird) आणि शिंजीर किंवा जांभळ्या पाठीचा सुर्यपक्षी (Purple-rumped sunbird).
जांभळा सुर्यपक्षी (Purple Sunbird):
विणीचा हंगामात नराचा मुळचा तपकिरी रंग बदलला जातो आणि चकचकीत काळा होतो. अंगावर उन पडल्यावर हा काळा रंग जांभळा दिसतो म्हणुनच ह्याला जांभळा सुर्यपक्षी असं म्हटलं जातं आणि मादीचा रंग वरच्या बाजुला हिरवट आणि खालच्या बाजुला पिवळा असतो. आपल्या पनवेलमध्ये गोखले हॉल समोरच्या असलेल्या सरकारी वसाहतींच्या आसपास आणि गार्डन हॉटेलच्या परीसरात मला एक-दोन वेळा जांभळा सुर्यपक्षी अचानकपणे दिसुन आला होता. कर्नाळ्याच्या जंगलात तर हा जागोजागी दिसतो.
जांभळ्या पाठीचा सुर्यपक्षी (purple rumped snbird) आणि गेल्यावेळेस सांगितलेला शिंपी पक्षी ह्यांच्या आकारात आणि आवाजात कमालीचे साम्य असले तरी सुर्यपक्ष्याच्या टोकेरी आणि टोकाशी किंचित वाकड्या असलेल्या चोचीमुळे हा शिंजीर लक्षात राहतो. या सुर्यपक्ष्याच्या नराचे डोके चकाकदार हिरवे, पाठीच्या वरच्या बाजुला लाल-चॉकलेटी रंग, खालच्या बाजुची पाठ आणि मान चमकदार जांभळ्या रंगाची अशा अफलातुन रंगांमुळे हे सुर्यपक्षी उन्हात आले की कमालीचे लोभसवाणे दिसतात. मादी मात्र तुलनेने अनार्षक दिसते...वरच्या बाजुस राखाडी-तपकिरी आणि खालची बाजु पिवळी....बस्स! तिच्या बाबतीत रंगांचा खेळ संपला. 15 August, 2019
अच्युत गोडबोले यांची फेसबुकवरील पोस्ट.
वाढदिवस..
तसं पाहिलं तर आयुष्याकडे मागे वळून पाहाताना मी बरंच कमावलं आणि बरंच गमावलं असं वाटतं. पैसा आणि प्रसिद्धी हे माझे खूप मोठे सोबती कधीच नव्हते, पण मी त्याबाबत खूपच समाधानी आहे. पण यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे मला सामान्य वाचकांकडून प्रचंड म्हणजे प्रचंडच प्रेम मिळालं. अगदी लहान लहान तालुक्यांतल्या खेडयांपासून ते देशापरदेशांतल्या मोठ्या शहरांपर्यंत!आणि विशेष म्हणजे ज्येष्ठांबरोबरच हजारो तरुणांनीही मला खूपच उचलून धरलं. एखाद्या लेखकाला इतकं स्टारडम मिळेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. नाटकं, सिनेमे किंवा ललित साहित्य लिहिणार्यांपैकी काहींना असं स्टारडम मिळालेलं आपण जाणतोच. पण विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, गणित आणि अनेक कला अश्या विषयांवर लिहिणार्याल्या समाजात इतका मान मिळू शकतो हे बघून मला खूप भारावून जायला होतं. त्यामुळेच मला लिहिण्याचं बळ येतं. मी सगळ्या वाचकांचा ऋणी आहे.
एक खंत मात्र सतत वाटत राहाते. आपण आयुष्यात काय मिळवलं ? मला अजूनही प्रचंड बेचैन करणारी गोष्ट म्हणजे मी ज्या प्रेरणेनं एकेकाळी समाज बदलायला निघालो होतो, त्या तर्हेनं समाज किंचितही बदलला नाही. इतकंच नाही तर तो दिवसेंदिवस जास्तच वाईट होत चाललाय. इथे मी कुठलाही इझम किंवा कुठलाही पक्ष यांचा विचार करत नाहीये. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण बघितलं तर गेल्या तीस वर्षांपासून आपण प्रचंड आत्मकेंद्री झालो आहोत. एव्हढंच नव्हे तर तसं होणं चांगलं, असंही म्हणायला लागलो आहोत. आज गुन्हेगारी आणि हिंसा पूर्वीपेक्षा खूपच वाढल्या आहेत. गेल्या ३० वर्षात भ्रष्टाचार प्रचंड वाढला, आतंकवाद वाढला, युद्धं आणि मारामार्या वाढल्या, विस्थापितांची संख्याही वाढली, धर्म आणि जातींमधली दरी वाढली, धर्म आणि जातीवरुन खून, मारामार्या आणि दंगली व्हायला लागल्या. विषमता वाढली आणि बेकारीही प्रचंड वाढली, सट्टेबाजीही वाढली. तेजी-मंदीचे बुडबुडे आणि अरिष्टंही वाढली. त्याचबरोबर रोजगारातली आणि एकूण आयुष्यातली अस्थिरताही वाढली. मनोविकार वाढले, नैराश्याचं प्रमाण वाढलं, आत्महत्या वाढल्या. शेतकरी, विद्यार्थी अश्या सगळ्यांच्या मिळून रोज भारतात १००० आत्महत्या होतात ! असा समाज माझ्या डोक्यातला आदर्श समाज होता का ? या समाजाला आपण सुखी म्हणायचं का ?
या सगळ्यांपेक्षा जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे आपण गेल्या ३० पर्यावरणाची अपरिमित हानी केली. त्यामुळे सतत पूर, दुष्काळ, वादळं, अतिवृष्टी अश्या चित्रविचित्र गोष्टी अवकाळी व्हायला लागल्या आणि त्यातून अब्जावधी रुपयांचं नुकसान व्हायला लागलं; आणि त्यामुळे अनेक लोक मरायला लागले आणि कोट्यवधी बेघर व्हायला लागले. सध्या महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक या राज्यांत एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे पूर याचं जे अमानुष तांडव चाललंय ते या सगळ्याची साक्ष देताहेत. पूर्वीही यातल्या काही गोष्टी व्हायच्या पण त्यांची तीव्रता आणि वारंवारिता आज प्रचंड वाढली आहे. पण हे सगळं अचानक झालेलं नाहीये. या सगळ्यांमध्ये एक सुसूत्रता आहे. या सगळ्या गोष्टी फक्त मानवनिर्मितच नाहीयेत तर त्या आपल्या चुकीच्या समाज-अर्थव्यवस्थेमुळे आणि चुकीच्या विकासनीतीमुळे झालेल्या आहेत. या सगळ्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वाढत्या उत्पादकतेचा फायदा फक्त १५-२० टक्के श्रीमंत लोकांना आणि फारफारतर थोडाफार मध्यमवर्गाला झाला. पण तो खालच्या ५०-६० टक्के लोकांपर्यंत खूपच कमी प्रमाणात पोहोचला. आणि त्यामुळे विषमता भीषण आणि बिभत्स दिसेल एव्हढी वाढली. तरीही ‘जी.डी.पी. वाढतोय, देशाची प्रगती होतेय’, अश्या घोषणा देऊन जगभर अनेक सरकारांनी जनतेला भुलवत ठेवलं. पण या जी.डी.पी. वाढीच्या अतिवेडामुळे (जीडीपीइझम) सतत प्रचंड ऊर्जा खाणारी आणि रोजगार निर्मिती न करणारी यंत्रं आणि रोबोज वापरुन फक्त वरच्या १५-२० टक्के लोकांसाठीच चैनीच्या चंगळवादी वस्तूंचं शहरांमध्ये उत्पादन करणारी एक विकासनीती आपण उभी केली आणि त्यामुळे गेल्या ३० वर्षांमध्ये वाढती विषमता, बेकारी आणि प्रदूषण या तीन राक्षसांची आपणच निर्मिती केली. ही विकासनीती आपण बदलली नाही तर तापमानवाढीमुळे या शतकाअखेरीस पृथ्वीचं आणि माणसाचं काय होईल हे सांगता येत नाही, अशी आज परिस्थिती आहे.
या उद्विग्नतेतूनच मी ‘अनर्थ’ हे पुस्तक लिहिलं. त्याला प्रतिसाद चांगला मिळतोय ही आनंदाची गोष्ट आहे. पण त्याचबरोबर सध्या दुष्काळ आणि पूर यांचं जे तांडव चाललंय ते या पुस्तकातल्या थिअरीला दुजोराच देतंय हे बघून वाईटही वाटतंय.
खरं म्हणजे आपण विकासाची व्याख्याच बदलली पाहिजे. विकास म्हणजे फक्त जीडीपीची वाढ असं न धरता, समाजातल्या प्रत्येकाचे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, कौटुंबिक, सामाजिक आणि पर्यावरणीय असे सर्व विकास झाले पाहिजेत. तंत्रज्ञान वापरू नये असं मुळीच नाही; जीडीपीत वाढ करू नये असंही नाही, पण जेवढी वाढ निसर्गाला, पर्यावरणाला मान्य आहे, त्याचा विद्धंस न होता करता येईल तेवढीच वाढ व्हायला हवी. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, वीज, रस्ते यांकडे लक्ष देऊन निदान सर्वांना समान संधी तरी उपलब्ध करून दिली पाहिजे. अपंग, वृद्ध, रुग्ण आणि अशा अनेकांची काळजी घेणारी शांतताप्रिय, विवेकवादी समाजव्यवस्था निर्माण करणं याला ‘खरा विकास’ म्हणता येईल. यासाठी शांततामय आणि लोकशाही मार्गानं एक चळवळ उभी करायची गरज आहे. त्यासाठीच खरं तर ‘अनर्थ’ लिहिलंय. माझ्या आयुष्यात मी फारसे सामाजिक बदल घडवून आणू शकलो नाही याची मला प्रचंड खंत आहे आणि ती मला सतत बेचैन करत असते. पण आता निदान शेवटी त्यात थोडाफार का होईना आणि जेव्हढा शक्य आहे तेव्हढा बदल घडवण्यासाठी मी माझ्या परीनं त्यात मतं मांडली आहेत. जरुर वाचा आणि वाचल्यावर काय वाटलं ते कळवा.
अच्युत गोडबोले.
achyut.godbole@gmail.com
Cafe Coffee Day: एक कप कॉफीने अनेकांचं आयुष्य बदलवलं !
03 August, 2019
पक्ष्यांच्या दुनियेत- भाग १ (दयाळ आणि शिंपी)
प्रस्तावना !
झाडे, पक्षी, प्राणी, किटक यांच्याप्रमाणेच मानवजात ही मुलत: निसर्गपरिसंस्थेचा (part of ecosystem) एक भाग आहे. माणसाने मात्र वेगाने विकसित होत जाणार्या आकलनशक्त्ती आणि बुध्दीमत्तेच्या जोरावर निसर्गातील सर्वच घटकांचा स्वार्थासाठी वापर करण्यास सुरुवात केली आणि परिणामी आज जैवविविधता (biodiversity) कमी होते आहे आणि त्याचा दृष्य परिणाम तात्काळ पक्ष्यांच्या विविधतेवर दिसुन येतो आहे. पक्षी हे जैवविविधतेचे प्रथम आणि सहजगत्या लक्षात येणारे मापक (Indicator) समजले जाते. एखाद्या परिसरात जितक्या विविध प्रकारचे पक्षी दिसतात तितका तो अधिवास माणसासाठी राहण्यास उपयुक्त असे मानले जाते.
उदाहरणार्थ, वेडे राघु, २-३ प्रकारच्या मैना, कावळे, चिमण्या, पोपट, बुलबुलच्या दोन-तीन जाती, सुर्यपक्षीच्या ३-४ जाती, तांबट, अधुनमधुन दिसणारे घुबड, घारी यासारखे पक्षी जर तुमच्या परिसरामध्ये (३-४ किलोमीटरचा साधारण गोलाकार परीसर) आढळत असतील तर घराच्या आसपास वड-पिपळ, गुलमोहर, पळस, पांगारा, उंबर यासारखी झाडे आहेत आणि तुमच्या घराच्या आसपासची ऑक्सिजनची पातळी चांगली आहे हा महत्त्वाचा आणि आपल्यासारख्या सहज सामान्य लोकांना लक्षात येण्यासारखा निर्देशक आहे.
कावळे, कबुतर आणि चिमण्या वगळता ८-१० प्रकारचे पक्षी आपल्या बिल्डिंगच्या आसपास सहज दिसतात. त्यांची संख्या वाढविणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. यातीलच काही पक्ष्यांची माहिती या सदराद्वारे मी देण्याचा प्रयत्न करते आहे. या सदरामध्ये नमुद केलेले जवळजवळ सर्वच पक्षी मी पनवेलमधील व्ही. के. हायस्कुल (बल्लाळेश्वर-वडाळे तलाव) परिसर, नित्यांनद नगर, पनवेल महानगरपालिकेचा गोखले हॉलजवळील अत्यंत रहदारीचा भाग इथे पाहिलेले आहेत. पाहिले आहेत असे म्हणण्यापेक्षा चालत असताना सहज दिसलेले आहेत किंवा त्यांचा आवाज ऐकु आलेला आहे. या सदरामुळे आपल्या सर्वांमध्ये किमान आपल्या जागेआसपासची झाडे जोपासण्याची आणि पर्यायाने पक्ष्यांबद्दलची जागरुकता निर्माण व्हावी अशी सदिच्छा!
- मृणाल भिडे (सोमणी)
दयाळ (Oriental Magpie Robin)
रोज सकाळी अत्यंत सुमधुर आवाजात शीळ घालत मला उठवणारा आणि माझ्या माहेरचा comfort zone इथे पनवेलमध्ये नित्यनियमाने रोज जपणारा हा माझा लाडका दयाळ या सदराचा पहिला मानकरी ठरलाय. सकाळच्या वेळेस घराच्या कोणत्याही खिडकीतुन पाहिलं की चिमणीपेक्षा थोडासाच मोठा, काळ्या पाठीचा आणि पांढर्या पोटाचा हा दयाळ झक्कासपैकी तारांवर हेलकावे घेत बसलेला दिसतो. त्याला मध्येच काय हुक्की येते देव जाणो, त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या कावळ्यालाही तो उगाचच हुसकावुन लावतो. ‘बस्स बाबा, तुच एकटा तारेवर’, असं म्हणत कावळा देखील बापडा उडुन जातो. खरंतर पळस, पांगारा अशी फुलांची झाडं याला फार प्रिय. पण माझ्या घरासमोरचा दयाळ मात्र उंबरावर बसुन बहुदा उंबरामधले किडे शोधुन शोधुन खात असतो. किंवा आजुबाजुच्या घरांमधे लावलेली फुलझाडांवरही याचं बारीक लक्ष असतं. कोणी नाहीसं बघुन झपकन त्या झाडात घुसेल, फुलांमधला रस पिईल, पाणी साचलेलं असेल ते पिईल नाहीतर कुंड्यामधल्या अळ्या शोधुन, त्या मटकावुन परत तारेवर हेलकावे घेत राहिल.
या दयाळचा विणीचा हंगाम (breeding season) मार्च अखेरीस सुरु होतो आणि जुलै अखेरीस पिल्लं घरट्याबाहेर येउन उडायला शिकतात. विणीच्या हंगामात एरवी शांत लयीत गाणार्या दयाळाला नव्याने गाणी सुचायला लागतात. अशाच एका एप्रिलमधल्या शांत दुपारी माझी झोपमोड करुन अव्याहतपणे हा नेहमीपेक्षा वरच्या पट्टीत कोणाला साद घालतोय हे मी वाकुनवाकुन सगळीकडे शोधत राहिले.. तेवढ्यात मला बर्यापैकी दुरच्या बिल्डिंगमधे काहीतरी काळं-पांढरं हलताना दिसलं. दुर्बिणीतुन निरखुन पाहिल्यावर लक्षात आलं की हे मिस्टर दयाळ या विणीच्या हंगामामधली आपली प्रेयसी शोधण्याकामी मग्न आहेत. १-२ दिवसांतच त्यांना यश मिळाल्याचं लगेच दिसुन आलं. कारण नंतर पुढचे काही दिवस तारेवर एका ऐवजी दोन दयाळ पक्षी हेलकावे घेत बसलेले दिसले, दोघेही जण आपल्या चिमुकल्या शेपट्या सतत वरखाली नाचवत अळ्या, किडे शोधुन खाण्यात तल्लीन झालेले होते.
शिंपी (Common Tailorbird)
च्युईट, च्युईट असा सलग न थकता सकाळचा गजर लावुन मला उठविणारा दुसरा पक्षी म्हणजे शिंपी.... सर्वप्रथम मी गेल्यावर्षी अर्धवट झोपेत पहाटे याचा खणखणीत स्वर ऐकला तेव्हा माझी उरली सुरली झोप देखील उडाली.. मला क्षणभर वाटलं, हा जणु खिडकीच्या बाहेरच बसुन ओरडतोय, इतका जवळुन याचा आवाज ऐकु येत होता. एकतर हा रंगाने पोपटी-हिरवा आणि आकाराने चिमणीइतका पिटुकला असल्याने पटकन झाडांच्या पानांत मिसळुन जातो. तेव्हाही त्याला शोधुन काढताना माझी दमछाक झाली आणि प्रत्यक्षात हे राजे खालच्या झाडाऐवजी घराबाजुला असलेल्या शेजारच्या सदाफुलीच्या रोपात बसुन साद घालत होते. काही दिवस गेले आणि अचानक एकाऐवजी दोन-तीन आवाज ऐकु लागले. निरखुन पाहिलं तर तब्बल ७-८ पक्षी एकत्र कौलांवर बसुन उन्हं खात खात; माश्या, लहान सुंरवट, अळ्या, चिलटं वगैरे किडेमकोडे शोधत होते आणि एकीकडे खणखणीत च्युईट, च्युईट स्वरात एकमेकांशी गप्पा मारत होते. आंब्याचा मोहोर, त्याभोवती फिरणारे किडे, पळस, पांगारा या फुलांचा मध हेदेखील यांचं आवडतं खाणं. ज्या अर्थी ७-८ जण एकत्र दिवसभर मला अधुनमधुन दिसतातच त्या अर्थी त्यांची घरटी देखील जवळपास कुठेतरी असावीत. मला मात्र ती अजुन पाहायला मिळालेली नाहीत. सहसा रुंद पानांचे झाड किंवा बारमाही हिरवे राहणारे वड-आंबा यासारखे झाड शिंपी पक्षी शोधतात. दोन पानांच्या कडा बाजुबाजुने एकमेकांत गुंतवत किंवा एकच मोठे रुंद पान गोल वळवुन त्याचे लहान बोगद्यासारखे देखणे घरटे बांधण्याचे कसब बघण्यासारखे असते. शहरात मात्र मोठी झाडे कमीकमी होत असल्याने शिंपी पक्षी सोनटाका, क्रदळ (कर्दळ), रुंद पानांचे पामट्री अशा झाडांमध्ये देखील घरटे बांधताना आढळुन येतात.
थोडे विषयांतर करुन सांगायचे तर ज्यांच्याकडे पाळीव प्राणी नसतील आणि सोनटाका/कर्दळीच्या जोडीला जाई-जुई, जास्वंद, अनंत, झेंडु अशी फुलझाडे असतील आणि गॅलरीला बर्डनेट नसेल त्यांनी पाण्याचे पसरट भांडे जरुर ठेवावे. सुरुवातीला काही दिवस फक्त कावळे आणि कबुतरं येऊन घाण करतील पण एकदा चिमण्या आणि बुलबुल यांना पाण्याचा सुगावा लागला की आपोआप बाकीचे छोटे पक्षी निर्धास्त होतात आणि त्यांचा किलबिलाट दिवसभर सुरु राहतो. मांजर, कुत्रा घरात असेल तर मात्र कावळा, कबुतरं सोडुन सहसा कोणी पक्षी येत नाही. सलग दोन अडीच वर्षं हे सारे पक्षी येत राहिले की त्यातल्याच कोणीतरी आपली नजर चुकवुन ठराविक काळासाठी आपला संसार थाटतात. (आणि बरेचदा तो पक्षी शिंपी किंवा बुलबुलच असतो.)
05 February, 2019
कण न् कण
(मृणाल भिडे - १९/०१/२०१९)




