12 July, 2020

रात हमारी तो... (परिणीता)

परिणीता मला अनेक कारणांमुळे आवडतो. तो सिनेमा पाहायचा तर त्या दोघांच्या लव्हस्टोरीसाठी बघावा... आणि संजय दत्त / रेखा / आणि बाकी सगळी मेलोड्रामॅटीक लोक पडद्यावर येतात तेव्हा डोळे मिटून घ्यावेत... रेखाच्या जुन्या सिनेमांवर फिदा असलेल्या रेखाला या सिनेमात पाहणं माझ्यासाठी नकोसं होतं... रेखा हा खरंतर एका स्वतंत्र पोस्टचा विषय आहे... असो. रेखा आठवली की भरकटायला होतंच!


एकमेकांशी प्रेमात एकनिष्ठ असणं ही भावना आहे... लग्नसंस्था त्याला फक्त सामाजिक आणि कायदेशीर मान्यता देते इतकंच. हे असं एकनिष्ठ आणि तरीही

स्वाभिमानी असणं विद्या बालनने सहज अभिनयातुन दाखवलाय. कपाटातुन पैसे घेणं... जाऊ नकोस म्हटल्यावर रेखाच्या नाईट क्लबला न जाणं.. वगैरे अनेक प्रसंग आहेत.


पण एक इनमिन पाच-सात मिनिटांचा शॉट आणि त्याला जोडुन आलेलं गाणं मेरे दिल के बहोत करीब है...


लोलिता ... इथे ललिता असा मराठीतला वेडपट उच्चार करायचा नसतो... हां तर ... लोलिताचे वडील आजारी पडल्यावर शेखर त्यांना आणि खरेतर लोलिताला भेटायला आलेला असतो. तिथे आल्यावर शेखरला समजतं की गिरीशच्या खर्चाने लोलिता आणि तिचं कुटूंब परदेशात जातंय.. तिच्या वडलांच्या उपचारासाठी. आधीपासुनच चिडलेला शेखर याही वागण्याचा जाब विचारायला लोलिताकडे जातो आणि तेव्हा शेखरशी जुजबी बोलून गिरीशशी (संजय दत्त .. यांना दुसरा कोणी भेटला नाही का ) सहजपणे बोलत बोलत लोलिता बाहेर जाते. ते पाहून शेखर अजुनच भडकतो. पण त्याला तिच्याशी बोलण्याची गरजही वाटत नाही... (टीपिकल जुन्या काळचा नवरा फिलींग... मेरे होते हुए तुमने ऐसा किया क्यू टाईप्स) शेखर तरातरा पायऱ्या उतरतो आणि भराभर गिरीशशी बोलणं संपवून ... त्याला औषधं आणायला कटवून लोलिता शेखरला भेटते. पायऱ्यांवर फक्त दोघेच पायरीवर असतात... विलक्षण वेगाने आणि आसुसून ती त्याला पाठुन मिठी मारते ... त्या एका मिठीत, चेहऱ्यावरचे भाव सगळं सांगतात... तिचा एकलेपणा... माझा शेखर लग्नाला तयार झाला असेल तरीही तो मनापासून नाही हा विश्वास... कम्यूनिकेशन गॅप असली की हे असं होतं याची जाणीव... ती उत्कटता...


पुढे लोलिता म्हणते, "अब सबकुछ ठीक हो जायेगा." त्या एका वाक्यात तिचा त्याच्याबद्दल असलेला दृढविश्वास शब्दात व्यक्त होतो. नवरा-बायकोने कधीही सर्वासमोर उघड प्रेम दाखवु नये हा त्याकाळचा संस्कार सगळं काही त्या एका मिठीत दिसलाय.


पण भडकलेला शेखर तिचं काहीही ऐकून घेत नाही. त्या दोघांची भांडणं होतात ... तो तिला अद्वातद्वा बोलतो. तिला अवाक होऊन ऐकत राहते. आणि स्वतःची बाजू सांगायला जाते पण खाडकन तिच्या कानफटात वाजवून तो निघून जातो. शेखरचं हे रूप पाहून कमालीचा धक्का बसलेली लोलिता पायरीवर बसते. मागून सूर वाजतात. गाणं वाजायला लागतं. ...रात हमारी तो


कालांतराने सैफ लग्न करायचं ठरवतो आणि तिचं भावविश्व साफ कोलमडते. तिचा स्वाभिमान इथून पुढे फक्त आणि फक्त प्रसंगातून आणि अभिनयातुन दिसतो...


एका प्रेयसीच्या नंतर बायकोच्या नात्याने त्याच्या कपाटातुन घेतलेले सारे पैसे कर्जाऊ होतात आणि ती एक अक्षर मेलोड्रामा न करता गिरीशच्या हातून घराचे पेपर्स पाठवते. तिथून पुढचा मेलोड्रामा बघण्याचा उत्साह मला नसतो. आणि आतापर्यंतच्या अवीट गोडीच्या गाण्यांचा आणि त्यांच्या लव्हस्टोरीचा मझा मी किरकिरा करत नाही.




रात हमारी तो... स्वानंद किरकिरे

No comments:

Post a Comment