Showing posts with label Common birds. Show all posts
Showing posts with label Common birds. Show all posts

12 July, 2020

पक्ष्यांच्या दुनियेत - भाग - ४ (गायबगळा आणि ढोकरी)

गायबगळा (Cattle Egret)


बदलत्या (खरंतर अस्वच्छ!) परीस्थितीतही अजुनपर्यंत टिकुन राहिलेल्या बगळ्यांच्या जातीमधील बगळा म्हणजे “ग़ायबगळा”...

सडपातळ बांध्याचे गायबगळे विणीच्या हंगामाव्यतिरिक्त पांढरे शुभ्र दिसतात. सोनसळी पिवळ्या रंगाचे डोळे, भाल्यासारखी निमुळती, टोकदार चोच, पायांवर पिसांचा अभाव, नर-मादी दिसायला एकसारखी... “व्ही आकाराच्या रेषेत” थव्याने उडताना दिसतात तेव्हा ‘बगळ्यांची माळफुले अजुनि अंबरात’ ह्या भावगीताची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. पाळीव गाई-म्हशी, बैल, जंगलांमध्ये – रानरेडे, गेंडे, गवे अशा प्राण्यांच्या पाठीवर बसुन निर्वेधपणे राजासारखे हिंडतात. त्यांच्या पायाने उडणारे शेती, पाणथळींच्या ठिकाणी असणारे किडेमकोडे, नाकतोडे, चतुर, टोळ तर खातातच शिवाय प्राण्यांच्या पाठीवरचे, कानामागचे चिलटे, गोचीड वगैरे किटक खातात आणि कासावीस झालेल्या त्यांच्या जिवाला थोडा दिलासा देतात. 

गायबगळे खरंतर एकावेळेस ५०-५० च्या संख्येने एकत्र राहणारे पक्षी, पण वाढत जाणार्‍या शहरीकरणामुळे आणि बेफाम, अविचारी वृक्षतोडीमुळे सर्वच प्रजातीमधील बगळ्यांची संख्या झपाट्याने कमी होते आहे. दिवसभराच्या खाण्याच्या शोधासाठी उडुन-फिरुन थकलेले हे गायबगळे संध्याकाळी रातनिवा-यासाठी (roosting) चिंच, आंबा, वड, पिंपळ अशा आपल्या ठरलेल्या झाडांकडे झेपावतात. त्यातही अशा प्रकारची झाडे शक्यतो माणसांच्या वस्तीनजीक असल्यास त्यांना घुबड आणि गरुड-घारीसारख्या शिकारी पक्ष्यांपासुन असलेला धोका कमी होतो. त्यांना घरटी बांधणे सुरक्षित वाटते. एकाच वेळेस पुर्ण ५०-६० पक्ष्यांच्या थवा वर्षानुवर्षे एकाच झाडावर रात्री राहण्यासाठी आणि काही ठिकाणी तेथेच घरटी बांधायला राहतो. अशा झाडांना सारंगागार असंही म्हटलं जातं. व्यंकटेश माडगुळकर, मारुती चितमपल्ली यांच्या लेखांमध्ये या सारंगागाराची सुरेख वर्णने आहेत. “हा सृजनाचा सोहळा” पाहात राहणे अतिशय विलक्षण असते असंही माडगुळकरांनी त्यांच्या एका पुस्तकात म्हटले आहे.

आपल्या पनवेल गावाच्या थोडं बाहेर आता जिथे डोमिनोज पिझ्झाचं आऊटलेट आहे तिथे आणि तिथुनच जवळ असलेल्या पंचमुखी मारुतीच्या देवळाजवळ बगळ्यांची दोन झाडे होती. अलिबागला जाता-येता दरवेळेस पनवेलमध्ये शिरताना संध्याकाळ व्हायचीच. तेव्हा तिथला फ्लायओव्हरही नव्हता. बगळ्यांचा कालरव सरावाने ऐकु यायचा. आणि पाठोपाठ ते देऊळ दिसायचं. ती झाडे दोन्ही माणसांच्या वस्तीजवळ होती आणि जवळच काळुंद्रे नदीचं पाणी वाहायचं. सारंगागार म्हणुन आदर्श जागा होती ती... कालांतराने रस्ता रुंदीकरणात देऊळ ठेवलं आणि ती दोन्ही झाडे मात्र तोडली गेली. बगळ्यांचे निवासस्थान कायमचे गेले. कोणाला न खेद, न खंत! गेल्याच वर्षीच्या पावसाळ्यात बल्लाळेश्वर तलावामध्ये बगळ्यांचा लहान थवा दिसला होता पण आता या वर्षी अविचारी बुजविण्यामुळे तिथुनही जवळपास सारेच पाणपक्षी गायब झालेत.


ढोकरी (Indian Pond Heron)

ढोकरी म्हणजेच हेरॉन च्या प्रजातीदेखील अगदी सहजपणे पाणथळ जागी, धरणे, पाण्याचे कालवे, खाडीची दलदल, शेती इत्यादी ठिकाणी दिसुन येतात. सोबत दिलेला फोटो इंडियन पॉन्ड हेरॉन या जातीच्या पक्ष्याचा आहे. याशिवाय राखी ढोकरी (Grey Heron), जांभळी ढोकरी (Purple Heron) तसेच उरण आणि पणजे गावाजवळील पाणथळी (uran and panje wetlands conservation area) असणारी रातढोकरी (Black  Night Heron) इत्यादी प्रजाती सहजपणे दिसतात. 

दिसायला कोंबडीएवढ्या आकाराचा मातकट पाठीचा आणि पांढर्या  पंखांचा हा पक्षी कोकणातील भातखाचरांमध्ये सहजपणे दिसतो. भातखाचरांमधील खेकडे, कोळी, छोटे मासे, बेडुक हे यांचं मुख्य खाद्य... भातांची रोपे आपसुक सुरक्षित राहात असल्याने शेतकरीदेखील हाकलुन लावत नाहीत. कोकणात त्यांना भुरे बगळे असंही त्यांना म्हटलं जातं. गळा, मान आणि छातीच्या बाजुस पांढर्याु रंगावर पिवळ्या- गडद तपकिरी रेषांमुळे आणि खाद्य पकडताना अतिशय निश्चल उभा राहात असल्याने पटकन आजुबाजुच्या वातावरणात इतका मिसळुन जातो की एकदम उडाल्यावरच लक्षात येतो. इतर बगळ्यांप्रमाणेच हेरॉन्स देखील थव्याने एकत्र शक्यतो एकाच झाडांवर वस्ती करतात. 


इंग्रजी भाषेतील “Heronry” म्हणजे आपल्याकडील सारंगागार शब्द यांच्याचवरुन आलेला आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे आणि दिवसेंदिवस कमी होत जाणार्याक पाणीसाठे, प्रदुषित होणारे नदीकिनारे, खाडीकाठची दलदल यांच्यामुळे हेरॉन्स, इग्रेट, आयबिस, इत्यादी पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होते आहे. हे सारेच पाणपक्षी आणि त्यांची सारंगागारे निसर्गचक्रात महत्वाची भुमिका बजावतात. ह्या पक्ष्यांची विष्ठा जमवुन त्यांचे शेतजमिनीत खत म्हणुन वापर केला जातो. तसेच ह्या पक्ष्यांचे मुख्य खाद्य टोळ, चतुर, गोचीड, सरडे यासारखे किटक आणि बेडुक, खेकडे यासारखे पाण्यातले लहान प्राणी हे ह्या प्रकारच्या पक्ष्यांचे मुख्य खाद्य असल्याने खरंतर पिकांवरील कीड नैसर्गिकरीत्या नियंत्रणात राहण्यास मदत होते. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी झपाट्याने सारंगागारे कमी होत असताना मात्र गडचिरोली जिल्ह्यातील वघाळा या गावी मात्र असलेल्या मोठ्या सारंगागारचे रक्षण तेथील गावकरी मोठ्या प्रेमाने करत आहेत...


पक्ष्यांच्या दुनियेत - भाग - ३ (खंड्या आणि भारतीय नीलपंख)

लांब शीळ घालणारा खंड्या (white-throated kingfisher) आणि कर्नाळ्याच्या जंगलात आढळणारा भारतीय नीलपंख (Indian Roller) ह्या दोघांनी ऑक्टोबर महिन्याच्या अंकांत हजेरी लावलीय. खंड्या आपल्या पनवेलमध्ये बल्लाळेश्वरचा तलाव आणि फडके नाट्यगृहासमोरचा देवाळे तलाव इथे अगदी सहजपणे दिसतो. बल्लाळेश्वरच्या तलावाचे बुजविणे सुरु केल्यापासुन तिथुन या खंड्याचे जातभाई “Pied Kingfisher” यांना आपला बाडबिस्तरा हलवावा लागलेला आहे. खरंतर मला पांढर्‍या गळ्याच्या खंड्यापेक्षा हा Pied KF जास्त आवडतो. कारण त्याचं पाण्यावर गोल घिरट्या घालणं, २-३ सेकंद एकाजागी स्थिरपणे पंखांची फडफड करत(process of hovering) अचानक एका क्षणी सुर्र्कन पाण्यात बुडी मारुन मासोळी पाण्यात बाहेर काढणं(and catching fish)... हे सारं सारं तो ज्या सफाईदारपणे आणि ज्या नजाकतीने करतो ते पाहाणं लक्षवेधक असतं. पण खंड्यावर कॅमेर्‍याचा डोळा ठेवुन ह्या हालचाली फोटोत पकडणं मात्र सारा श्वास रोखुन धरण्याचा आणि शटरस्पीडचा खेळ ! त्यामानाने पांढर्‍या गळ्याचा खंड्या मात्र तुलनेने सुशेगात असतो. तरीदेखील त्याला उडताना आणि खाद्य पकडताना मात्र फोटो काढणं तितकंच कर्मकठीण. आपल्या सावजावर एकाग्रपणे लक्ष ठेवुन निमिषार्धात सुरु मारुन त्याला पकडणं ह्या कलेमध्ये “बकध्याना”नंतर ह्या खंड्यांचाच नंबर लागतो.




पांढरा गळा, निळ्या-मोरपिशी रंगाचे पंख, गडद लाल-गुलाबी रंगाची चोच आणि चमकदार तपकिरी रंगाचे डोके आणि मान यामुळे पक्षी आकाराने लहान असला तरी सहज दिसुन येतो. त्याची नजर मोठी वैशिष्ट्यपुर्ण असते. खंड्या पक्षी जेव्हा हवेत किंवा पाण्याबाहेरुन पाण्यात बघत असतो तेव्हा याचे दोन्ही डोळे स्वतंत्रपणे काम करतात (monocular) आणि ज्या क्षणी तो पाण्यात सुर मारतो त्याक्षणी त्याच्या नजरेला मेंदुकडुन सिग्नल्स जातात आणि दोन्ही डोळे एकच काम करु लागतात (binocular stage). जिवंत खेकडे आणि मासे हे सर्वच खंड्या जातवर्गाचे मुख्य अन्न. पाणथळ जागा, तलाव आणि आता बदलत्या हवामानाशी आणि बदलत्या जागांशी जुळवुन घेत हे खंड्या आजकाल कोळीवाड्याच्या आसपास देखील दिसतात. पण तेव्हा मात्र पोटात कालवल्याशिवाय राहात नाही. कारण जिवंत मासे-खेकडे पकडणे आणि एखाद्या खडकावर आपटुन खाणे ही त्यांची खरी सवय आणि शरीराची गरज आहे. 

आपल्या पनवेलमध्ये आगरी समाज हॉलच्या बाजुच्या परीसरात, पटेल हॉस्पिटलच्या बाजुने त्या समोरच्या तलावावरुन जाणार्‍या तारेवर बसुन हे महाराज मजेत हेलकावे घेत असतात आणि मधुनच एखाद्या टारगटाने तारस्वरात लांब शिट्टी वाजवावी तशी त्यांची खास शिट्टी वाजवतात. अगदी पहिल्यांदा भर दुपारी १२ वाजता मी समोर आलेल्या टेम्पो-बाईक-ऑटोरीक्क्षांचे हॉर्नस या सर्व कोलाहलामधुन याची शीळ फारच जवळुन ऐकली आणि दचकलेच. एकतर तो तापलेला उन्हाळ्याचा दिवस, हातात भाजीच्या पिशव्या आणि रस्त्यावरच्या गाड्या ओंलाडुन समोर बसलेल्या नारळवाल्याकडे कसं जावं याचा विचार करत असताना ह्या खंड्याने जोरकस शीळ घातली. आणि मला काही समजायच्या आत मी १८० अंशांत फिरुन माझी मान तलावाकडे आणि त्यावरच्या वायरकडे ! इतकं की बाजुने जाणार्‍या बायकरने काय येडपट बाई आहे असं पाहिलं देखील. हे पनवेलमधलं खंड्याचं पहिलं दर्शन. सोबत दिलेला फोटो तर मी आगरी समाज हॉलच्या परीसरात खंड्या होता तेव्हा काढलेला आहे. 





भारतीय नीलपंख मात्र सहसा शहराजवळ दिसत नाहीत. मात्र नीलपंखाची नोंद कर्नाळ्याच्या जंगलात झालेली आहे. मैंनेहुन किंचितसा लहान आणि निळ्या-तपकिरी रंगांचा हा अतिशय देखणा पक्षी जेव्हा हिरव्या झाडांच्या आणि फिक्या निळ्या आकाशाच्या पार्श्वभुमीवर हवेत भरारी घेतो तेव्हा त्याला फोटोमध्ये अचुक पकड्ण्यासाठी हौशी फोटोग्राफर्समध्ये मोठी चुरस लागते.... असंख्यवेळा क्लिकक्लिकाट केल्यावर एखादाच फोटो मनासारखा येतो आणि फ्रेम होऊन हॉलच्या भिंतीवर विराजमान होतो. या पक्ष्यांचे पंख आणि शेपटी उडताना गडद निळे दिसतात. छातीचा आणि पाठीचा रंग तपकिरी, आणि चोच काळ्या रंगाची असते. भारतीय नीलपंख खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ, रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारांवर दिसतो. याचे खाद्य कीटक, बेडुक, पाली हे आहे. मुंबई-पुणे रस्त्यावर किंवा पेण-अलिबाग रस्त्यावरती कमी वर्दळीच्या जागीदेखील हा नीलपंख सहज दिसुन येतो. 

दक्षिण भारतातातील काही राज्यांचा हा राज्यपक्षी आहे. गमतीशीर गोष्ट म्हणजे त्याच्या या निळ्याशार रंगामुळे त्याला काहीसं धार्मिक महत्व प्राप्त झालेलं आहे. काही भाषांच्या लोककथांमध्ये ह्या पक्ष्याला शंकराचं रुप मानलेलं आहे. (कृष्ण का नाही? तोही निळाच होता की...) तसेच दसर्‍याच्या दिवशी ह्या पक्ष्याचं दर्शन होणं अत्यंत शुभ आणि धनप्राप्ती होणार असल्याचं मानतात. !

03 September, 2019

पक्ष्यांच्या दुनियेत- भाग २ (सुर्यपक्षी)


महाराष्ट्रात सुर्यपक्ष्यांचे सामान्यपणे चार ते पाच प्रकार दिसतात.
(1) purple sunbird
(2) purple-rumped sunbird (with its different eclipsed plumage stages)
(3) Crimson-backed Sunbird
(4) Loten’s Sunbird.

जवळपास सर्वच सुर्यपक्ष्यांची हालचालीमध्यें आणि राहण्याच्या, अन्नाच्या सवयींमध्ये फारसा फरक नसतो. कायमस्वरुपी निवासी असलेले किंवा बदलत्या ऋतुप्रमाणे देशांतर्गत स्थलांतर करणारे हे चिमणीपेक्षा लहान आकाराचे पक्षी आहेत. माळरानांच्या जोडीलाच अगदी आपल्या बागांमध्ये, उद्यानांमध्येही हे पक्षी सहज दिसुन येतात. आकाराने लहान असल्याने शिकारी पक्ष्यांकडुन, मांजरींकडुन शिकार होण्याचे भय अधिक आणि म्हणुनच सतत इकडेतिकडे वेगाने उडत राहणे हा या पक्ष्यांचा स्थायीभाव. शहरांमध्ये लोकप्रिय होत असलेल्या गच्ची बागेमध्ये पाण्याची उथळ, पसरट परातीच्या आकाराची भांडी ठेवली तर मात्र ठराविक वेळेस हे सुर्यपक्षी तिथे येऊन पाण्यात डुंबण्याचा आनंद अनुभवताना हमखास दिसतात. पण आपल्या बिल्डिंगच्या आसपास काटेसावर, गुलमोहर,फणस, पळसासारखी झाडे असली आणि वर्दळ कमी असली तर हे पक्षी अगदी जवळुन पाहायला मिळायची शक्यता अधिक असते. लांब आणि टोकेरी चोचीच्या सहाय्याने पळस, जास्वंद, चाफा, रुईची फुले, सोनटक्का यासारख्या फुलांमधले रस पिणं, आसपासचे किटक, बारीक अळ्या हे यांचं आवडतं खाणं. इतर निवासी पक्ष्यांप्रमाणेच मार्च ते जुन हा याही पक्ष्यांचा विणीचा हंगाम. इतर वेळेस काहीसे फिकट दिसणारे ह्यांच्या पिसांचे रंग अधिक आकर्षक होतात आणि लाल रंगांच्या पळस-पांगार्‍याच्या पार्श्वभुमीवर हे लाल-पिवळे-काळे तजेलदार रंगांचे देखणे पक्षी प्रकर्षाने लक्षात येतात. आपल्या सामान्य लोकांच्या लक्षात येणारा फरक म्हणजे या सर्व पक्ष्यांचे बदलते आणि आकर्षक होणारे रंग.

त्यातले चटकन ओळखता येणारे आणि आपल्या शहरी भागात दिसणारे दोन सुर्यपक्षी आहेत. जांभळा सुर्यपक्षी (Purple Sunbird) आणि शिंजीर किंवा जांभळ्या पाठीचा सुर्यपक्षी (Purple-rumped sunbird).


जांभळा सुर्यपक्षी (Purple Sunbird):
विणीचा हंगामात नराचा मुळचा तपकिरी रंग बदलला जातो आणि चकचकीत काळा होतो. अंगावर उन पडल्यावर हा काळा रंग जांभळा दिसतो म्हणुनच ह्याला जांभळा सुर्यपक्षी असं म्हटलं जातं आणि मादीचा रंग वरच्या बाजुला हिरवट आणि खालच्या बाजुला पिवळा असतो. आपल्या पनवेलमध्ये गोखले हॉल समोरच्या असलेल्या सरकारी वसाहतींच्या आसपास आणि गार्डन हॉटेलच्या परीसरात मला एक-दोन वेळा जांभळा सुर्यपक्षी अचानकपणे दिसुन आला होता. कर्नाळ्याच्या जंगलात तर हा जागोजागी दिसतो.




जांभळ्या पाठीचा सुर्यपक्षी (purple rumped snbird) आणि गेल्यावेळेस सांगितलेला शिंपी पक्षी ह्यांच्या आकारात आणि आवाजात कमालीचे साम्य असले तरी सुर्यपक्ष्याच्या टोकेरी आणि टोकाशी किंचित वाकड्या असलेल्या चोचीमुळे हा शिंजीर लक्षात राहतो. या सुर्यपक्ष्याच्या नराचे डोके चकाकदार हिरवे, पाठीच्या वरच्या बाजुला लाल-चॉकलेटी रंग, खालच्या बाजुची पाठ आणि मान चमकदार जांभळ्या रंगाची अशा अफलातुन रंगांमुळे हे सुर्यपक्षी उन्हात आले की कमालीचे लोभसवाणे दिसतात. मादी मात्र तुलनेने अनार्षक दिसते...वरच्या बाजुस राखाडी-तपकिरी आणि खालची बाजु पिवळी....बस्स! तिच्या बाबतीत रंगांचा खेळ संपला. 

पनवेलमध्ये शहरात अजुनतरी मला हा पक्षी कमीवेळा दिसलाय. नाही म्हणायला एक-दोनदा जुन्या भाजीबाजारात पंचमुखी मारुतीच्या देवळाजवळ आणि रोटरी गार्डनच्या आसपास हा दिसला.

03 August, 2019

पक्ष्यांच्या दुनियेत- भाग १ (दयाळ आणि शिंपी)


प्रस्तावना !
झाडे, पक्षी, प्राणी, किटक यांच्याप्रमाणेच मानवजात ही मुलत: निसर्गपरिसंस्थेचा (part of ecosystem) एक भाग आहे. माणसाने मात्र वेगाने विकसित होत जाणार्‍या आकलनशक्त्ती आणि बुध्दीमत्तेच्या जोरावर निसर्गातील सर्वच घटकांचा स्वार्थासाठी वापर करण्यास सुरुवात केली आणि परिणामी आज जैवविविधता (biodiversity) कमी होते आहे आणि त्याचा दृष्य परिणाम तात्काळ पक्ष्यांच्या विविधतेवर दिसुन येतो आहे. पक्षी हे जैवविविधतेचे प्रथम आणि सहजगत्या लक्षात येणारे मापक (Indicator) समजले जाते. एखाद्या परिसरात जितक्या विविध प्रकारचे पक्षी दिसतात तितका तो अधिवास माणसासाठी राहण्यास उपयुक्त असे मानले जाते.
उदाहरणार्थ, वेडे राघु, २-३ प्रकारच्या मैना, कावळे, चिमण्या, पोपट, बुलबुलच्या दोन-तीन जाती, सुर्यपक्षीच्या ३-४ जाती, तांबट, अधुनमधुन दिसणारे घुबड, घारी यासारखे पक्षी जर तुमच्या परिसरामध्ये (३-४ किलोमीटरचा साधारण गोलाकार परीसर) आढळत असतील तर घराच्या आसपास वड-पि‌पळ, गुलमोहर, पळस, पांगारा, उंबर यासारखी झाडे आहेत आणि तुमच्या घराच्या आसपासची ऑक्सिजनची पातळी चांगली आहे हा महत्त्वाचा आणि आपल्यासारख्या सहज सामान्य लोकांना लक्षात येण्यासारखा निर्देशक आहे.
कावळे, कबुतर आणि चिमण्या वगळता ८-१० प्रकारचे पक्षी आपल्या बिल्डिंगच्या आसपास सहज दिसतात. त्यांची संख्या वाढविणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. यातीलच काही पक्ष्यांची माहिती या सदराद्वारे मी देण्याचा प्रयत्न करते आहे. या सदरामध्ये नमुद केलेले जवळजवळ सर्वच पक्षी मी पनवेलमधील व्ही. के. हायस्कुल (बल्लाळेश्वर-वडाळे तलाव) परिसर, नित्यांनद नगर, पनवेल महानगरपालिकेचा गोखले हॉलजवळील अत्यंत रहदारीचा भाग इथे पाहिलेले आहेत. पाहिले आहेत असे म्हणण्यापेक्षा चालत असताना सहज दिसलेले आहेत किंवा त्यांचा आवाज ऐकु आलेला आहे. या सदरामुळे आपल्या सर्वांमध्ये किमान आपल्या जागेआसपासची झाडे जोपासण्याची आणि पर्यायाने पक्ष्यांबद्दलची जागरुकता निर्माण व्हावी अशी सदिच्छा!
- मृणाल भिडे (सोमणी)

दयाळ (Oriental Magpie Robin)

रोज सकाळी अत्यंत सुमधुर आवाजात शीळ घालत मला उठवणारा आणि माझ्या माहेरचा comfort zone इथे पनवेलमध्ये नित्यनियमाने रोज जपणारा हा माझा लाडका दयाळ या सदराचा पहिला मानकरी ठरलाय. सकाळच्या वेळेस घराच्या कोणत्याही खिडकीतुन पाहिलं की चिमणीपेक्षा थोडासाच मोठा, काळ्या पाठीचा आणि पांढर्‍या पोटाचा हा दयाळ झक्कासपैकी तारांवर हेलकावे घेत बसलेला दिसतो. त्याला मध्येच काय हुक्की येते देव जाणो, त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या कावळ्यालाही तो उगाचच हुसकावुन लावतो. ‘बस्स बाबा, तुच एकटा तारेवर’, असं म्हणत कावळा देखील बापडा उडुन जातो. खरंतर पळस, पांगारा अशी फुलांची झाडं याला फार प्रिय. पण माझ्या घरासमोरचा दयाळ मात्र उंबरावर बसुन बहुदा उंबरामधले किडे शोधुन शोधुन खात असतो. किंवा आजुबाजुच्या घरांमधे लावलेली फुलझाडांवरही याचं बारीक लक्ष असतं. कोणी नाहीसं बघुन झपकन त्या झाडात घुसेल, फुलांमधला रस पिईल, पाणी साचलेलं असेल ते पिईल नाहीतर कुंड्यामधल्या अळ्या शोधुन, त्या मटकावुन परत तारेवर हेलकावे घेत राहिल.
या दयाळचा विणीचा हंगाम (breeding season) मार्च अखेरीस सुरु होतो आणि जुलै अखेरीस पिल्लं घरट्याबाहेर येउन उडायला शिकतात. विणीच्या हंगामात एरवी शांत लयीत गाणार्‍या दयाळाला नव्याने गाणी सुचायला लागतात. अशाच एका एप्रिलमधल्या शांत दुपारी माझी झोपमोड करुन अव्याहतपणे हा नेहमीपेक्षा वरच्या पट्टीत कोणाला साद घालतोय हे मी वाकुनवाकुन सगळीकडे शोधत राहिले.. तेवढ्यात मला बर्‍यापैकी दुरच्या बिल्डिंगमधे काहीतरी काळं-पांढरं हलताना दिसलं. दुर्बिणीतुन निरखुन पाहिल्यावर लक्षात आलं की हे मिस्टर दयाळ या विणीच्या हंगामामधली आपली प्रेयसी शोधण्याकामी मग्न आहेत. १-२ दिवसांतच त्यांना यश मिळाल्याचं लगेच दिसुन आलं. कारण नंतर पुढचे काही दिवस तारेवर एका ऐवजी दोन दयाळ पक्षी हेलकावे घेत बसलेले दिसले, दोघेही जण आपल्या चिमुकल्या शेपट्या सतत वरखाली नाचवत अळ्या, किडे शोधुन खाण्यात तल्लीन झालेले होते.

शिंपी (Common Tailorbird)

च्युईट, च्युईट असा सलग न थकता सकाळचा गजर लावुन मला उठविणारा दुसरा पक्षी म्हणजे शिंपी.... सर्वप्रथम मी गेल्यावर्षी अर्धवट झोपेत पहाटे याचा खणखणीत स्वर ऐकला तेव्हा माझी उरली सुरली झोप देखील उडाली.. मला क्षणभर वाटलं, हा जणु खिडकीच्या बाहेरच बसुन ओरडतोय, इतका जवळुन याचा आवाज ऐकु येत होता. एकतर हा रंगाने पोपटी-हिरवा आणि आकाराने चिमणीइतका पिटुकला असल्याने पटकन झाडांच्या पानांत मिसळुन जातो. तेव्हाही त्याला शोधुन काढताना माझी दमछाक झाली आणि प्रत्यक्षात हे राजे खालच्या झाडाऐवजी घराबाजुला असलेल्या शेजारच्या सदाफुलीच्या रोपात बसुन साद घालत होते. काही दिवस गेले आणि अचानक एकाऐवजी दोन-तीन आवाज ऐकु लागले. निरखुन पाहिलं तर तब्बल ७-८ पक्षी एकत्र कौलांवर बसुन उन्हं खात खात; माश्या, लहान सुंरवट, अळ्या, चिलटं वगैरे किडेमकोडे शोधत होते आणि एकीकडे खणखणीत च्युईट, च्युईट स्वरात एकमेकांशी गप्पा मारत होते. आंब्याचा मोहोर, त्याभोवती फिरणारे किडे, पळस, पांगारा या फुलांचा मध हेदेखील यांचं आवडतं खाणं. ज्या अर्थी ७-८ जण एकत्र दिवसभर मला अधुनमधुन दिसतातच त्या अर्थी त्यांची घरटी देखील जवळपास कुठेतरी असावीत. मला मात्र ती अजुन पाहायला मिळालेली नाहीत. सहसा रुंद पानांचे झाड किंवा बारमाही हिरवे राहणारे वड-आंबा यासारखे झाड शिंपी पक्षी शोधतात. दोन पानांच्या कडा बाजुबाजुने एकमेकांत गुंतवत किंवा एकच मोठे रुंद पान गोल वळवुन त्याचे लहान बोगद्यासारखे देखणे घरटे बांधण्याचे कसब बघण्यासारखे असते. शहरात मात्र मोठी झाडे कमीकमी होत असल्याने शिंपी पक्षी सोनटाका, क्रदळ (कर्दळ), रुंद पानांचे पामट्री अशा झाडांमध्ये देखील घरटे बांधताना आढळुन येतात.
थोडे विषयांतर करुन सांगायचे तर ज्यांच्याकडे पाळीव प्राणी नसतील आणि सोनटाका/कर्दळीच्या जोडीला जाई-जुई, जास्वंद, अनंत, झेंडु अशी फुलझाडे असतील आणि गॅलरीला बर्डनेट नसेल त्यांनी पाण्याचे पसरट भांडे जरुर ठेवावे. सुरुवातीला काही दिवस फक्त कावळे आणि कबुतरं येऊन घाण करतील पण एकदा चिमण्या आणि बुलबुल यांना पाण्याचा सुगावा लागला की आपोआप बाकीचे छोटे पक्षी निर्धास्त होतात आणि त्यांचा किलबिलाट दिवसभर सुरु राहतो. मांजर, कुत्रा घरात असेल तर मात्र कावळा, कबुतरं सोडुन सहसा कोणी पक्षी येत नाही. सलग दोन अडीच वर्षं हे सारे पक्षी येत राहिले की त्यातल्याच कोणीतरी आपली नजर चुकवुन ठराविक काळासाठी आपला संसार थाटतात. (आणि बरेचदा तो पक्षी शिंपी किंवा बुलबुलच असतो.)