25 May, 2016

दुरावा

रात्रीचे अकरा वाजलेत… आजच्या whats app आणि एफ बी च्या जमान्यात माझी बोटं पूर्वी प्रमाणे SMS टाईप करू लागतात फक्त दोनच अक्षरं - GN … SMS पलीकडे पोचतो…


रिप्लाय ची वाट पाहणं सुरु होतं…
एकीकडे तू काय विचार करत असशील याचा मी विचार करत राहतो.
तुला जाऊन तब्बल चार दिवस आणि अठरा तास उलटलेत.

पोचल्यावर लगेच मला फक्त एका शब्दाचं उत्तर 'पोचले.'
निघताना झालेल्या इतक्या मोठ्या भांडणानंतर तुझा sms येणं तसं अनपेक्षितच… पण त्यावर उत्तर द्यायला मी इतका वेळ घेतला त्याला कारणही तसाच आहे… कारण तू रोजच आईशी मात्र तू तब्बल १५-२० मिनिट बोलतेस … आई ते सगळ सांगते आणि वर मलाच टोमणे मारते …कधी मोठी होणार रे तुम्ही दोघं, तू sorry म्हण की. बेस्ट लक पण दिलं नव्हतं तु… ब्ला ब्ला ब्ला…




तुझा राग टिकत नाही माहितीय मला … आता तू फोन करशील न? मग काय म्हणशील?

'काय गरज होती आई समोर त्याच्याबद्दल असं बोलायची… तुला माहितीय मला घराबाहेर पडताना कोणाची कटकट नको असते. आणि आता काय GN करतोस ? किंवा ''माझा पहिला पेपर, पहिली कॉन्फरस याचं काहीच नाहीय तुला मग फक्त GN तरी कशाला ते? किंवा असंही म्हणशील परवा तू एकटाच आईस्क्रीम खाउन आलास ते आईने सांगितलं मला. तेव्हा माझी आठवण आली नाही आता कशाला मस्का मारतोस… "

पण खरं सांगतो चिम्प्ये … ते आईस्क्रीम खाताना मज्जा आली नाही आणि ते अंगावर सांडवलं पण नाही मी. तुला आठवत का लहानपणी मी अशीच खुसपट काढून काढून भांडायचो, बरेचदा तुलाच मार पडायचा. पण मग तरीही काही वेळाने तूच द्दादुड्या करत माझे गाल कधी ओढशील याची वाट बघायचो. 

ट्रीईईंग… तुझाच SMS आला… फोन नाहीच … या सगळ्यातलं तू काहीच म्हणत नाहीस फक्त इतकंच म्हणतेस, "GN "




आता तुला तुझा द्दादु इतका परका वाटतो का? आता सारं काही बदलत 'का' चाललंय ? आपण मोठ्ठे 'का' झालोयेत?