16 November, 2022

चिऊची डायरी

Multi vitamins and calcium etc drops घेणं हा एक रोजचा धमाल कार्यक्रम असतो. ते ड्रॉप्स मोजूनच द्यावे लागतात. ते मात्र मी काढून देते. पंधरा मिनिटांत आटोपणारा खेळ. अर्थात हे रोज असंच होतं असं नाही. त्याचीच हि गंमतजंमत. 

आई खाली बसताना किंवा डायनिंग टेबलवर पाणी, त्या ड्रॉप्सच्या बाटल्या, चमचा, ड्रॉपर सगळं साहित्य घेऊन बसतेय का यावर चिऊचं बारकाईने लक्ष असतं. माझ्याही अंगात किडे भारी ! मुद्दाम मी एखाद दुसरी गोष्ट देतच नाही. मग चिऊपण काय विसराळू मिळालीय अशा नजरेने बघते. 😂
कॅल्शियम मोजून वाटीत दिलं रे दिलं की प्यायच्या आधीच प्रश्न, " आदून देनाल?" (अजून देणार?) मी नाही म्हणणार माहितेय तरी दरवेळेस विचारेल, मग मिस्कील हसेल... (मी मनातल्या मनात, अग चेंगटा, आधी दिलंय ते तर पी. 🤪)  त्यानंतर मात्र ते जेमतेम दोन-तीन चमचे कॅल्शियम पोटात जायला पाच ते पंधरा मिनिटं कितीही वेळ लागू शकतो... depends upon her mood.  बयेची गाडी फारच रंगात असेल तर वाटीतला शेवटचा थेंब पण कसा बोटावर येत नाहीय याबद्दल स्वतःशीच बडबड करून होते. कॅल्शियम चाटून पुसून पिऊन झालं की तिरक्या नजरेनं आईकडे बघायचं आणि डी व्हिटामिनची बाटली आपल्या पाठीमागे लपवायची..  अशावेळेस आईने, 'अरेच्या बाटलू कुठे गेलीस तु' असे काहीतरी डायलॉग्स म्हणणे शास्त्र असते! मग त्या बाटलीतून आधीच तयार असलेला ड्रॉपर बाहेर येऊन तो तोंडात जातो... (आपोआपच बरं का !) मग आई समोर बसलेली नसली तर आईच्या नावानं जप करायचा. आई मग वरून ड्रॉपरचं रबरी फुगा दाबणार. (मनातल्या मनात : बाई सगळंच तुम्ही करा. फक्त तोंडात ड्रॉपर दाबायला मला ठेवा कामाला. 😂😂😉)
मग येतो फॉलिक ॲसिडचा नंबर ! मोजून 8 थेंब द्यायचे असलेली काचेची बाटली आई तिरकी करते. चिऊनं धरलेल्या चमच्यात ड्रॉप पडतात. हे सवयीचं असलं तरी दरवेळेस चिऊ मात्र अद्भुत काहीतरी घडतंय असला शुद्ध नाटकी आव आणत काहीतरी बडबडते. (ती काय बोलते ते अजूनही समजलेलं नाही.) मग चमचा तोंडात धरून चाटत बसते. मग एकदाचे ड्रॉप संपले की पाणी पिऊन सगळं सिंकमध्ये ढकललं की आई समोर असो - नसो, एकदम थाटात चिऊ ओरडते "झायंऽऽऽ"

चिऊ कसली, तिची आईच सुटकेचा निश्वास टाकते...

फाल्गुनी पाठक

कॉलेज आटपून दुपारी घरी आलं की जेवून टीव्ही लावायचा. आतु झोपलेली असायची. बाबा कामावर... तो वेळ माझा. टीव्हीलाच डायरेक्ट हेडफोन्स लावायचे. म्युझिक चॅनेल्स सर्फिंग करायची. कुठेतरी ती दिसायचीच. तिच्या गोल गोग्गोड चेहर्‍यावरचं हसू, गाणं म्हणत असतानाचा तिने धरलेला ठेका, त्या ठेक्यावर उडणारा तिचा तो बॉबकट की बॉयकट(?), तिच्या ते स्वतःभोवती गिरक्या घेणं. आणि गाणं संपल्यानंतरही मनात गुंजत राहणारा तो मधुर आवाज... अहाहा! 

कितीतरी गाणी तिच्याच नावानं आज फेमस आहेत. आमचीच नाही तर त्यानंतरच्या दोन चार पिढ्या तिच्या गाण्यावर फिदा होत्या... तरूणाईची नस तिने परफेक्ट ओळखली होती. नव्वदच्या दशकात जीन्स-टॉप-जॅकेट आणि केसांचा बॉबकट ही अमेरीकन स्टाईल भारतीय मुलींच्या आयुष्यात येऊ घातली होती. आमच्या पिढीला ती कधी कोणी परकी वाटलीच नाही. आपल्यातलीच एक मोठी बहिण गाण्याच्या माध्यमातून आपल्या क्रशस्टोरीला पॉझिटिव्ह सपोर्ट देतेय असं वाटायचं. जोडीला तिचा मधाळ आवाज. गाण्याच्या पार्श्वभूमीवर रंगत जाणारी एक निरागस क्रशस्टोरी... तिच्या कथा साध्या असायच्या. गाण्यातल्या कपलचे कपडेही साधे असायचे. पटकन केव्हाही आपल्याही आयुष्यात असं कोणीतरी येईल असं वाटेल इतकं ते सारं लोभस होतं. त्या फुलपाखरी दिवसांत तिला पाहताच ह्रदयात धडधडायचं...ती यावर्षी कोणती नवीन गाणी आणणार ही याची उत्सुकता असायची.

 तिने गायलेल्या प्रत्येक गाण्यावर तिच्याच नावचा ठसा होता... आहे... असणार आहे. मग भले कोणीतरी काल उगवलेल्या आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या मुलीनं कॉपीराईट नसण्याची पळवाट काढून तिच्या गाण्याचं रिमिक्स केलं तरी आजही युट्यूबवर तिच्याच गाण्याचे व्ह्युज वाढतील. 

ती तेव्हाही दांडीया क्वीन होती. आजही आहे. तो फाल्गुनी पाठक नावाचा स्वतःच एक ब्रँड होता. आजही आहे. 

Love you lot FalguniPathak

#Nostalgia90s

#falgunipathak

MajaMaOnPrime

मजा मा
#MajaMaOnPrime 

काल दिवसभरात थोडा थोडा करून मजा मा पाहिला. माधुरी दिक्षित, शिबा चढ्ढा वगैरे नावं बघून आधी वाटलं की असाच टाईमपास सिनेमा असेल. पण हा एकदमच वेगळा सिनेमा आहे. 
साधी, सरळ रेषेत जगणारी आणि दोन वेगवेगळ्या आर्थिक स्तरावरील पण साधारण एकाच विचारसरणीतली भारतीय कुटूंबांची हि गोष्ट ! एक कुटूंब भारतात राहतं, दुसरं अमेरिकेत ... आम्ही अमेरिकन कसे छान, श्रीमंत पण संस्कारी, आम्ही भारतीय कसे authentic, traditional वगैरे वगैरे सुरू असतानाच दुसर्‍या पातळीवर वेगळ्या माणसांच्या गटाच्या अस्तित्वाबद्दल पडद्यावर नाट्य घडत असतं... 
आणि हा वेगळा गट आहे तो म्हणजे LGBTQ + क्वियर कम्युनिटी !

या विषयावरच्या सिनेमाची सुरूवात भारतात दीपा मेहतांनी फायर सिनेमापासून केली. त्यानंतर खुलेपणाने बोलायला इतकी वर्षं मध्ये जावी लागली.... गेल्या वर्षी आलेला "बधाई दो" आणि आताचा "मजा मा" हे दोन्ही सिनेमे साध्या साध्या प्रसंगातून समाजात काय मत आहे ते मांडतात. म्हणूनच या चित्रपटातले प्रसंग अतिशय realistic वाटतात. 

एका बाईला दुसरी बाई आणि एका पुरूषाला दुसरा पुरूष सर्वार्थाने आवडावा यात नैसर्गिक आहे की अनैसर्गिक याबद्दल मतं निरनिराळी आहेत. मी जाणीवपूर्वक इथे नैतिकतेचा मुद्दा आणत नाही. कारण नैतिक/ अनैतिक हे व्यक्तिसापेक्ष असतं. पण त्या दोन व्यक्तींमध्ये असलेली प्रेमाची भावना हि फक्त शारिरीक असेलच असं नाही ती मानसिक पातळीवर देखील असते. हि त्या प्रेमाच्या नात्याची मागणी आहे.  माणसांची नाही. जेव्हा एखादं नात्यात अपेक्षा केली जाते तेव्हाच त्या नात्यात ओलावा तयार होतो, सहवास असेल, सुसंवाद असेल तर प्रेम वाढीस लागतं. भले ते नातं दोन पुरूषांमधील असेल (gay relationship) किंवा दोन स्त्रियांमधील असेल (lesbian relationship)... यात नैतिक-अनैतिक या कन्सेप्ट कायमच बदलत राहणार आहेत. आजचं अनैतिक कदाचित उद्या नैतिक असेलही. पुर्वी HIV झाला की भुवया उंचावल्या जायच्या... सरोगसी,  स्पर्म डोनेशन म्हटलं की नाकं मुरडली जायची.  आज गल्लोगल्ली IVF च्या पाट्या दिसतात. तसंच हे !

अजूनही या नात्याला खुद्द त्या दोन व्यक्तींची सहमती असेलच असंही नाही. सिनेमात एक प्रसंग आहे, पल्लवी पटेल ला  संजना म्हणते, "तु जशी आहेस ते आधी स्वतःशी प्रामाणिकपणे मान्य कर. आणि कोणाला, कधी, कसं, केव्हा आणि "का" सांगायचं ह्या प्रश्नांची उत्तर तु स्वतः शोध. मग बाकीचा विचार !"    हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे मला वाटतं. 
आपल्या पुराणकथांत यक्ष, यक्षिणी, किन्नर होतेच पण तरीही आज आपण ज्या समाजात राहतोय तो समाज अजून या क्वियर कम्युनिटीला खुलेपणानं स्विकारायला तयार होत नाही. (फक्त भारतीय नव्हे तर जागतिक पातळीवर कोणताही समाज) 
संजनाने मांडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधताना पल्लवी पटेल सारख्या व्यक्तीने पुढच्या काही मुद्द्यावर विचार करणंही गरजेचं आहे. "लोग क्या कहेंगे" या प्रश्नाची चौकट मोडण्याचं धाडस, या विषयावरचं वैद्यकीय ज्ञान, कायदेशीर पाठींबा, आर्थिक स्वावलंबन, शारिरीक क्षमता, पूर्ण कुटूंबाचा खंबीर आणि डोळस सपोर्ट हेही तितकंच महत्त्वाचं आहे. 

जेव्हा पल्लवी पटेल लाय डिटेक्टर टेस्टला धाडसाने सामोरी जाते तेव्हा त्या स्त्री ला पुरूषी मानसिकतेचा पूर्ण अंदाज आलेला असतो. या चित्रपटातला हाच दहा मिनिटांचा क्लायमॅक्स सिन पूर्ण सिनेमाचं यश आहे.  क्वियर कम्युनिटीला देखील माणूस म्हणून आधी बघा नंतर त्यांच्या gender, sexuality, physical relations याचा विचार करा हे लक्षात आणून देण्याचं काम हा क्लायमॅक्स करतो. 

बाकी गोष्ट फेसबुकवरच कुठे ना कुठे वाचायला मिळेल.  नाही तर आज रविवार आहे. डायरेक्ट सिनेमाही बघता येईल. ❤️

द शम्मी कपूर



पावसाळ्यातली कुंद दुपार ! कॉलेज आटपून घरी येऊन आळसावले होते. आतु रोजच्यासारखी झोप म्हणून दटावून गेलेली. टीव्हीलाच हेडफोन्स लावून म्युझिक चॅनेल सिनेमा चॅनेल सर्फिंग सुरू होतं. एका जुन्या गाण्यापाशी रेंगाळले. संपतच आलेलं. पुढचं गाणं सुरू झालं.....
ड्रमबिट्सचा आवाज... चढत जाणारा सॅक्सोफोन... क्षणाची शांतता आणि तो पडद्यावर अवतरला. 

"पलभर ठहर जाए ... दिल ये संभल जाए " अशी माझी अवस्था. 

त्याची ती मधाळ जादुई नजर... उफ्फ ... छातीत ह्रदय मन वगैरै नावाची जागा असते याची लख्ख जाणीव झाली ! मला माझ्याच ह्रदयाचे ठोके पहिल्यांदाच लख्ख ऐकायला आले. अंग शहारलं. मी "मोठी" झालेय याची जाणीव मला यानेच तर करून दिली होती. आयुष्यातला माझा पहिला आणि खरंतर तोच शेवटचा क्रश ! तो गात होता ...  जणू माझ्याचसाठी ....

तुमने मुझे देखा हो कर मेहरबां ! 
रुक गयी ये जमीं, थम गया ये आसमाँ 
जाने मन, जाने जाँ ... 💞 💕

वय वाढत गेलं, जगाचे भलेबुरे अनुभव आले तसं मन निबर होत गेलं. शम्मीवरचं माझं प्रेमही मॅच्युअर्ड होत गेलंय. मात्र शम्मी साठी माझ्या ह्रदयाचे ठोके आजही तितकेच गडबडतात. ! Love for him is a pure emotion. हो ! शम्मीच ! आज तो जिवंत असता तर तो वास्तव आयुष्यात माझ्या आजोबा- पणजोबांच्या वयाचा असता. तरीही तो माझ्या तरल भावविश्वातला एकारान्त शम्मी "च".  

आज हे लिहीतानाही तो क्षण जसाच्या तसा आठवतो आहे. 

खरंतर तुमने मुझे देखा या गाण्यातली त्याचे नजरेतले भाव होते ते खरंतर त्याच्या नूकत्याच गेलेल्या लाडक्या गीता बाली साठी होते. ती नजरेतली आर्तता एका अस्सल प्रियकराची होती. कांजण्या झालेल्या आणि मृत्यूशी झुंज देताना अपयशी ठरलेल्या आपल्या प्रियतम बायकोसाठी तो गाणं म्हणत होता. त्याच्याबद्दलच्या सगळ्या चांगल्या वाईट बातम्या, अफवा सर्वांना धीराने तोंड देत, सतत त्याच्या पाठीमागे गीताबाली उभी राहात आली होती आणि तोच आधार त्याच्या नजरेसमोर कोसळत असताना शम्मीमधला कलाकारही खचत चालला होता. लग्न केलं तेव्हा गीताबाली प्रसिद्ध नायिका होती आणि शमशेरराज कपूरचे तोपर्यंत "द शम्मी कपूर" मध्ये रुपांतर व्हायचे होते. 

जानेवारी १९६५ मध्ये गीता बाली गेली. ऑक्टोबर १९६६ मध्ये तिसरी मंजील पूर्ण होऊन रिलीज झाला. मधल्या पावणेदोन वर्षांत शम्मी पूर्ण खचून गेला होता. १९६८ मध्ये आलेल्या ब्रह्मचारी सिनेमाने त्याला बेस्ट ॲक्टरचं ॲवार्ड मिळवून दिलं खरं. याच काळात त्याचं वजन वेगाने वाढत होतं. नीला देवी यांच्याशी त्याने दुसरं लग्न केलं आणि स्वतःच्या मर्यादा पूर्ण ओळखून असलेल्या शम्मीने चरित्रात्मक भुमिका निवडल्या. मग त्याने सिनेमे केले खरे पण त्यात "द शम्मी कपूर" ची जान नव्हती. आणि त्याने स्वतःहूनच सिनेमातून रिटायरमेंट घेतली. 

मी कॉलेज संपवून पोस्टग्रॅज्युएशनच्या अभ्यासात गुंतले... त्याच सुमारास एकीकडे मी जिथे कुठे छापून आलंय ते वाचत असायचे. हे सारं समजत गेलं आणि अभिनेता म्हणून प्रेमात होतेच आणि मनापासून आनंदी आयुष्य जगणारा माणूस म्हणून तो कांकणभर अधिकच आवडत गेला. पडद्यावर इतका धुमाकुळ घालणारा हा प्रिन्स सिनेक्षेत्रापलिकडे मात्र स्वतःच्या लेकरांत, बायकोत रमणारा कुटूंबवत्सल पुरूष होता.  

सिनेमात हिरॉईनशी शारीर सलगी करून, बिनधास्त उघड उघड तिच्या नजरेला नजर देत तिला जागीच आपल्या प्रेमात पाडणारा, दिलखेचक अदा करून बेधुंद नाचणारा तो एक निळ्या डोळ्यांचा राजकुमार होता. प्रोफेसर, तिसरी मंजील सारखे मोजके सिनेमे वगळता तो अभिनयाच्या फंदात पडला नाही. अभिनयाचं वगैरे बघायला बाकी सुसंस्कृत, अतिआदर्शवादी, नाकासमोर चालणारे, गोग्गोड बोलणारे बाकीचे होतेच की. त्यांचाही अपना अपना एक फॅनक्लास होता. पण शम्मी हा शम्मीच होता.  वास्तवातल्या प्रेमाची शारीर ओढ शम्मीनं खास त्याच्या स्टाईलने पडद्यावर पहिल्यांदा दाखवली. एका अर्थाने तो काळाच्या पुढेच दोन पावलं चालणारा... 
पडद्यावर जसा तो काळाच्या पुढेच होता तसा वास्तविक आयुष्यात तो रसरसून आयुष्य जगत भविष्याचा वेध घेणारा माणूस होता. 

२००६-२००७ मध्ये माझी अजून एक मजा झाली.  पोस्टग्रॅज्यूएशनला IT in library अशा काहीतरी नावाचा स्वतंत्र शंभर मार्कांचा पेपर होता. तेव्हा इंटरनेटच्या हतिहासाच्या संदर्भांत नोटस काढताना एक छोटं आर्टीकल हाती लागलं. कोपर्‍यात शम्मीचा फोटो आणि website programming language बद्दलची माहिती असं काहीतरी होतं ते. मला धक्काच बसला. शम्मी इतका टेकसॅव्ही इतका काळाच्या पुढे जाऊन विचार करणारा आहे हे तोपर्यंत मला माहितीच नव्हतं. अजूनही जुन्या नोटसमध्ये ते आर्टीकल असलं तर असेलही. मी लगेचच बॅग आवरली. घरी आले. तो ऑर्कुटचा जमाना होता. ऑर्कुट सुरू केलं. शोधाशोध केल्यावर असंख्य फॅनगृप्स दिसले. सोशल मिडीया कन्सेप्ट बाल्यावस्थेतच होती. पण त्या ऑर्कुटवर सर्वात मोठी फॅनलिस्ट लता खालोखाल शम्मीची होती हे आमच्या आजच्या पिढीला माहिती देखील नसेल.  त्याची स्वतःची वेबसाईट आहे हेही समजलं. खरा धक्का पुढेच बसायचा होता. ज्याकाळात आपल्यामधील अनेकांना कॉम्पुटर, इमेल, इंटरनेट हे शब्दसुध्दा माहीत नव्हते, या गोष्टींचा प्रसार झाला नव्हता, त्याकाळी तो त्याचा वापर करीत असे. अनेकांसाठी तो भारतातला पहिला इंटरनेटचा गुरू होता. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी चा पहिला "C" भारतीय लोकांपर्यंत पोचला नव्हता त्या काळात त्याने लंडनहून खास हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मागवलं होतं. १९६०च्या दशकातच तो स्वतः website programming (HTML वगैरे) शिकला आणि कपूर खानदानाची वेबसाईट स्वतः तयार केली. VSNL ने अधिकृतरित्या सामान्य लोकांपर्यंत इंटरनेट पोचवण्याआधीच ज्या बड्या लोकांपर्यंत इंटरनेट आलेलं होतं त्यातला एक माझा "द शम्मी कपूर" आहे हे समजल्यावर मला ती रात्र झोप लागली नव्हती. 

याहू डॉट कॉम वेबसाईट जेव्हा भारतात लॉन्च झाली तेव्हा शम्मी कपूरला आदराने तिथे निमंत्रण दिलं गेलं होतं ते त्याच्या टेकसॅव्ही असल्यामुळेच. पण प्रत्यक्षात त्याच्या जंगली सिनेमातल्या याऽऽहु या सुप्रसिद्ध आरोळीमूळे गमतीदार गैरसमज सामान्य लोकांमध्ये तयार झाले. अनेकांना; अगदी त्याच्या कुटूंबातील लोकांना देखील वाटायचं की शम्मी कपूर याहू इंडीया वेबसाईटचा मालक आहे ! शम्मी ने स्वतःच एका मुलाखतीत हसत हसत म्हटलेलं की, " एक दिवस रणधीर जवळ आला आणि म्हणाला, काका आम्हालाही माहिती नव्हतं की याहु इंडिया चे हक्क तुमच्याजवळ आहेत. मी त्याला म्हणालो; बाबा रे, याहूचा मी खरोखरच मालक असतो तर आज मी इथे तुमच्याजवळ नसतो राहिलो. अमेरीकेत राहिलो असतो... " 

मध्यंतरी सिनेमा बघण्यापलिकडे आणि रोजचा पेपर वाचण्यापलिकडे माझं वाचन कमी झालेलं. रणबीर कपूर - त्याचा नातू सिनेमात आलाय, त्याच्या बातम्या वाचल्या पण त्याचा सिनेमा पाहिला नव्हता. अचानक एक दिवस समजलं, रॉकस्टार मध्ये शम्मी आहे. त्याच्या शॉट्स पूरता तो सिनेमा पाहिला आहे. रॉकस्टारची गाणी तेवढ्यापूरती गुणगुणावी वाटली तरी तो सिनेमा अजूनही पाहिलेला नाही. खुप नंतर रणबीर कपूरचे बाकीचे सिनेमे पाहिले. आवडलेत पण माझा मेंदू आजही रणबीर आणि शम्मी यांची नकळत तुलना करतोच करतो. 

२०११ मध्ये मी एका emotionally confused stage मध्ये होते. माझ्या आयुष्यात नक्की काय चाललं आहे, कोणासाठी चालू आहे हे सर्व मला समजत नव्हतं... तयार होऊ पाहणारं अलवार नातं एका दिवसात खाड्कन तुटलं होतं... त्या काळात शम्मीचा किडनीचा विकार बळावलाय हेही समजायचं. तो काही आपल्या वयाचा नाहीय. तो जाणारच आज न उद्या हेही मी जाणून होते. माझं त्याच्यासाठी पागल असणं याबद्दल आमच्या घरात काहीसा मिस्कील सुर असायचा. पण मला ते आवडायचं...  " तो " तर निघून गेलाय माझ्या वास्तव आयुष्यातून, आता "शम्मी कपूर" ही माझ्या हळव्या स्वप्नांच्या जगातून जाणार... खरंतर ही एका व्यक्तीची दुसर्‍या व्यक्तीसोबत केलेली विचित्र आणि वरवर विनोदी वाटणारी तुलना आहे. हे ही मेंदूला समजायचं. पण माझं मन ते मानायला तयार नव्हतं. 

आणि १४ ऑगस्ट २०११ ला शम्मी गेलाच ... मी नंतरचे अनेक महिने यंत्रवत जगत होते. बरं हे कोणालाच काही न सांगता येण्यासारखं नव्हतं. परक्याला हा प्रसंग ठार विनोदी देखील वाटू शकेल इतका खोलवर आघात मला शम्मीच्या मृत्यूने आणि त्या ब्रेकअपने झाला होता. तेव्हा  जवळपास रोज रात्री मला वाटायचं, टाईम मशीन मध्ये बसावं आणि चांगलं दोन तीन पिढ्या आधीच जन्माला यावं. कॉम्प्युटर, इंटरनेट, ऑटोमेशन याच्याआधीचं संथ आयुष्य जगायला मिळावं. 

आज जवळपास अकरा वर्षांनंतर कसं कोण जाणे हे ब्लॉगसाठी लिहावं वाटलं.... 


टीपः त्याचे सगळे सिनेमे मला प्रचंड आवडतात. 
तरीही काही मस्ट वॉच: 
१. तिसरी मंज़िल
२. राजकुमार (प्रिन्स नावाचा वेगळा सिनेमा आहे.)
३. जंगली
४. प्रोफेसर
५. कश्मीर की कली
६. An evening in Paris
७. ब्रह्मचारी