05 December, 2010

शांततेलाही आवाज असतो...

शोजा... हिमालयाच्या कुशीत वसलेलं असंख्य गावांमधलं एक पिटुकलं गाव. पन्नासपेक्षा कमी घरं असलेलं निर्मळ लोकांचं शांत निवांत गाव. मनाली मधली टिपिकल पर्यटकी ठिकाणं पुर्वीच पाहुन झाली होती. नवीन काय? ह्या गहन प्रश्नाचं उत्तर सोडवता सोडवता अचानक एके दिवशी अरुण अग्निहोत्री याचं हिमालयाच्या आडेवाटेवर अशा काहीतरी नावाचं पुस्तक हातात पडलं आणि शोजाचा शोध लागला. पण पुस्तकात सविस्तर असुन ते फार गांभीर्याने वाचलं नाही आणि तिथे गेल्यावर मात्र हे नाव ऐकुन तिथल्या ड्रायव्हर लोकांच्या चेहर्‍यावरचे भाव बघताना करमणुक झाली.

ज्यावेळेस ड्रायव्हरला विचारलं त्यावेळेस तो आधी चक्रावुन गेला. मला ‘औट’ माहिती आहे. पुढचं तुम्ही इथे या मग बघु असं वरवर म्हणाला असला तरी तो मनात मात्र वैतागला असणार हे लगेच लक्षात आलं. हे लोक मॅप्स घेऊन येतात आणि कुठले कुठले स्पॉटस् शोधुन काढतात या गोष्टीची त्याला गेल्यावेळेस नेहमी मजा वाटायची. तसंच यावेळेस झालं. तिथे पोचल्यावर त्याने त्याच्या ‘दोस्तलोगों’ ना विचारल्यावर निम्म्या लोकांना माहिती नव्हतंच आणि ज्यांना माहिती होतं त्या प्रत्येकाने काय विचित्र कस्टमर आहेत असा भाव चेहर्‍यावर दाखवला आणि रस्ता खराब आहे जाऊ नका असंही वर सांगितलं. पण आम्ही मात्र आमच्या निर्णयावर ठाम होतो. ते पाहिल्यावर ड्रायव्हरला हो म्हणावंच लागलं तिथे पोचल्यावर मात्र तोही खुप खुश झाला. ‘बहोत अच्छा लगता है’ असं वारंवार त्याने बोलुन दाखवलं.


सिमला- मनाली रस्त्यावर असलेल्या ‘औट’ गावावरुन शोजाकडे जायला आत एक फाटा फुटतो. सुरुवातीला छान छान असणारा हा 30-35 किलोमीटरचा ब्रिटीशकालीन रस्ता शेवटी मात्र खरोखरच वाईट होता. ड्रायव्हरची गाडी वर चढवताना दमछाक झाली.. आम्हांला पण मग वाटायला लागलं, निर्णय चुकला की काय? आम्हां सर्वांच्या आणि ड्रायव्हरच्या मते ठरलं की ‘दुपार होत आलीय. अजुन एखाद किलोमीटर पुढे जायचं, काही नसेलच तर परत मागे फिरायचं. मग संध्याकाळच्या उजेडात खाली परत गावात पोहोचता येईल. गाडीने एक-दोन वळणं घेतली आणि भली मोठी पाटी दिसली. “राजा गेस्ट हाऊस- शोजा”..... हुश्श.... अखेरीस शोजा आलं.


लगेच गाडी एका बाजुला लावली. दहा-बारा छान आटोपशीर खोल्यांचं आणि किमान सोयी असलेलं हे हॉटेल अगदी मोक्याच्या ठिकाणी होतं. खोल्यांच्या मागे असलेल्या व्हरांड्यामधुन हिमालयाच्या हिरव्यागार रांगांचं मनसोक्त दर्शन होत होतं. आत एकटाच एक नोकर होता. मालक खालती गावात गेला होता. नोकराजवळच सगळी चौकशी केली. अजुन पुढे पाच किलोमीटर वर ‘जलोरी पास’ नावाचं पहिलं ठिकाण होतं आणि तिथुनच पुढे सर्योलसर लेक ला जाण्यासाठी पायी रस्ता होता. शोजाला राहण्याची विशेष अशी व्यवस्था नाही हे त्याने न सांगताही कळत होतं. आम्ही सगळेच थकलो होतो.मुख्य म्हणजे ड्रायव्हरचा फार अंत पाहण्यात अर्थ नव्ह्ता. शोजाला निघायच्या नादात आम्ही गाडीत पेट्रोल भरलं नव्हतं. ‘औट’ ला विचारलं तर संपलेलं! मग शोजाला पोचल्यावर मात्र लगेच नोकराकरवी हॉटेलच्या मालकाला फोन लावला. कस्टमर आपल्याकडेच उतरणार म्हटल्यावर मी घेऊन येतो असं लगेच सांगितलं. मग लगेच खोली त्याब्यात घेतली. बॅगा ठेवल्या. आख्या हॉटेलमध्ये आम्हीच एकटे!! वरवर निर्धास्त झालो असलो तरी गाडीत पेट्रोल एकदम कमी होतं. दुसर्‍या दिवशी खाली परत जाता येईल ह्याची शाश्वती नव्हती. जलोरी पासचा तर विचार करणं सोडावं लागलं असतं. पण अखेरीस हो नाही करता परत मालकाला फोन केला. त्याने पुन्हा एकदा ठाम सांगितलं मी नक्की पेट्रोल घेऊन येतो. तुम्ही पास पाहुन या. मग मात्र इतका वेळ चिंतीत असलेल्या ड्रायव्हरच्या आवाजात एकदम उत्साह आला.

नोकराला रात्रीच्या जेवणाबद्दल थोडंफार सांगुन जलोरी पास ला जायला निघालो. गेस्टहाऊस पासुन पाच किलोमीटर वर असलेला हा जलोरी पास पुढे सिमल्याला जातो. जलोरी पास ला महाकाली देवीचं छोटं देऊळ आहे. देवळाच्याच बाजुने चेहनी कोठी आणि सर्योलसर लेकला जाण्यासाठी रस्ता होता. 10-12 किलोमीटरचा हा ट्रेक करण्यासाठी मात्र हातात पुर्ण दोन दिवस हवेत. सर्योलसर ला राहायची व्यवस्था होते असं स्थानिकांकडुन समजलं पण त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. तिथेच असलेल्या टपरीवजा हॉटेलमध्ये ‘राजमा-चावल’ खाल्लं. मग निरुद्देश भटकत राहिलो.

थोड्यावेळाने खाली गेस्ट हाऊस ला गेल्यावर मालकाने पेट्रोल आणलं होतं. ते भरुन मोठा सुटकेचा श्वास टाकला. संध्याकाळी मागच्या व्हरांड्यात मालकाशी बोलत असताना खुप मजेशीर माहिती कळली. शोजा हे गाव पर्यटन स्थळ म्हणुन नकाशावर आलं ते ब्रिटीशांमुळे. सिमल्याला राहणारे ब्रिटीश ऑफिसर्स रिकाम्या वेळात आजुबाजुच्या गावांमध्ये भटकत राहायचे. त्यापैकीच एका ब्रिटीश ऑफिसरला हे गाव बेहद्द आवडलं आणि या गावाला डांबरी रस्ता मिळाला. त्याच डांबरी रस्त्याची भारत सरकारने नाममात्र डागडुजी केलेली आहे. आम्ही त्याविषयी हळहळ व्यक्त करताच मालक म्हणाला, “रस्ता चांगला नाहीय तेच उत्तम आहे. म्हणुनच इथली शांतता टिकुन आहे. कारण सिमल्यावरुन मनालीला जाणारा हा रस्ता तुलनेने जवळचा आहे. हा रस्ता नीट झाला तर या रस्त्याला असणारी अवघड वळणं काढुन टाकली जातील आणि हे दिल्ली-पंजाबवाले गाड्या सुसाट सोडतील. त्यापेक्षा आहे हे उत्तम. आणि बर्फाच्या काळात मात्र हा रस्ता बंदच असतो. त्यामुळे तो फार काही नीट होणार नाही असं वाटतंय, निदान लगेचच्या काळात तरी...!!”

हळुहळु काळोख व्हायला लागला आणि मग आम्ही सर्वचजण निःशब्दपणे बसुन राहिलो. खुप सुंदर वाटत होतं.... समोरच्या हिरव्यागार रांगा सावकाशपणे काळ्या रंगात बुडुन जात चालल्या... आकाशात एक एक करत तारा उगवायला लागला.. किती वेळ गेला समजलंच नाही. खाली- आजुबाजुला शोजा गावातली माणसं केव्हाच काळोखात बुडुन गेली होती. कुठे कुठे लांबवर एखाद-दुसरा प्रकाशाचा ठिपका दिसत होता. रात्री उशीरा 8.30 ला जेवणासाठी नोकराने हाक मारली... तेव्हा भान आलं... आणि जाणवलं... आपण आता कोणताच विचार करत नव्हतो.... मनात कसलाही कोणाचाही विचार न येणं... निर्विचार राहणं हे किती अलगदपणे जमुन गेलं??? आणि एकदम हलकं सुखद वाटलं. गरम गरम वाफाळतं जेवण आणि बाहेरुन दरीतुन वर येणारा थंडगार वारा... पटापट जेवलो. काही वेळाने अलगद झोप डोळ्यांवर उतरली... तेव्हा एखाद दुसरा ठिकाणी दिसणारा प्रकाशही विझुन गेला होता... शोजा गाव शांत झोपलं होतं. आणि आकाशात तार्‍यांचा पाठशिवणीचा खेळ रंगला होता...