11 March, 2015

मुंबई- कलकत्ता दुरान्तो आणि तिथुन पुढे ‘पदातिक’...


(संपुर्ण प्रवास २९/०४/१२ ते १४/०५/१२ असा १६ दिवसांचा होता. मिळेल त्या कागदांवर लिहुन जपुन ठेवलेल्या नोट्सवरुन आठवेल तसं ब्लॉगसाठी लिहायचा प्रयत्न केलेला आहे.)

मुंबई- कलकत्ता दुरान्तो आणि तिथुन पुढे पदातिकचा प्रवास. गाड्या बदलण्याची सवय आहेच आणि त्या हलत्या गाड्यांमध्ये झोपण्याचीही सवय आहे. पण ह्या वेळेस मात्र दुरांतोने प्रवास करणं माझ्यासाठी कठीण होउन बसलं होतं. रात्री सलग झोप लागली नाही. अर्धवट झोपेत अर्धवट जागेपणी मला नुकत्याच झालेल्या जपानमधील भुंकपाच्या बातम्या आठवत होत्या. माझा एक मित्र त्याच वेळेस तिथे होता. भारतात परतल्यावर तो म्हणाला होता... तुमच्या पायाखालची जमीन हलत नाहीय, तुम्ही एका स्थिर जमिनीवर उभे आहात याची जाणीव खुप दिलासा देणारी असते. खरंय त्याचं! आपण जत्रेत/ एस्सेलवर्ल्डमध्ये चक्रात बसतो, किती वेळ 15-20 मिनिटं! या गाडीला टेक्निकल हॉल्ट्स आहेतच. पण बाकी सगळा वेळ नावेत बसल्यासारखं डुलायचं. पण त्याला देखील लय नव्हती... मध्येच जोरात मध्येच सावकाश... छ्या... काय फालतु गाडी आहे... पण हे सगळं कधी थांबणार हे पक्कं माहिती आहे. इथे जिवाची शाश्वती आहे... तिथे तीदेखील नव्हती. तिथुन जिवंत बाहेर पडायला मिळेल याची त्याला स्वत:लाच खात्री नव्हती... अशाच उलट सुलट विचारात झोप लागली.
      घरात कधी करेन का पण इथे मात्र सकाळी ९.३०लाच नाष्टा झाला. आता सारखं हलत राहुन कंटाळा यायला लागलाय. गाडीतुन उतरलं की गरगरायला लागेल... बाहेर सगळं कोरडं, रखरखीत. लांबवर पसरलेली सुकी शेतं, धुळीने माखलेली बांधाकडेची झाडं-झुडुपं, दागोरी-बेल्हा सारखी छोटी गावं, मध्येच नदीवरचे लांबलचक पुल, कमी झालेल्या-आटत गेलेल्या नदीपात्रात बसलेले कुत्रे, गायी-म्हशी सगळं एका खिडकीपलीकडे फास्ट-फॉरवर्ड होत होतं. उन्हाळाच जणु एका खिडकीपलीकडे येऊन थांबला होता... मी गाडीत बसुन झोपाळल्या डोळ्यांनी पहात होते... पण झोप मात्र लागत नव्हती.

      संध्याकाळी पावणेआठला दुरान्तो मधुन उतरलो आणि रात्री उशिरा पदातिकमध्ये बसलो. कायम दिल्ली, कलकत्ता वगैरे तिथुन पुढे जाणार्‍या ट्रेन्समधलं बेडिंग छान आणि अतिशय स्वच्छ कसं असतं हे मला ना उलगडणारं कोडं आहे. यावेळेस देखील पदातिकमधलं बेडिंग कोरं-करकरीत असावं इतकं स्वच्छ होतं. आणि मुख्य म्हणजे ट्रेन साधारण जितकी हलते तितकीच आणि एका लयीत धावत होती. दोन दिवसांची गाढ झोप लागली.


कविता -२

03 March, 2015

कविता - १

पहिली कविता माझी नाही...दुसरी कविता पहिल्या कवितेचं उत्तर !!! (दुसरी कविता मात्र माझी)