13 June, 2016

अंधार

चार दिवसानंतर कोणी घरात नसेलच या अंदाजाने स्वत:जवळच्या चावीने दार उघडलं. त्याला जमेल इतपत घर आवरलेलं तिला अर्धवट अंधारात दिसलं. ‘चला... म्हणजे मुड बरा आहे म्हणायचा.’ बॅगा ठेवत आतल्या खोलीत आली आणि लाईट लावणार त्याआधी तिथेच खिळुन राहिली... गुडघ्यात डोकं खुपसुन हमसाहमशी तो रडत होता. धसकुन जवळ जात शक्य तितक्या शांतपणे विचारलं, ‘काय झालं’ तिच्या अनपेक्षित चाहुलीने तो दचकला,

गुदमरल्या आवाजात म्हणाला, ‘तु लौकर कशी? मला वाटलं, जेवुनच येशील’.

‘तुला हे असं एकदम रडायला काय झालं पण?’
‘ते असंच...  ...’
‘... अरे पण मी काय परगावी गेले होते का?’


नजर टाळीत तो कुशीत शिरला, ‘हो, पण तरीही...’

आधी सुट्ट्या कमी त्यात प्रोजेक्ट्स, शुभकार्यं, आजारपणं यात वेळ मिळाला नाही. लग्नानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदा इतकं राहिलो. माहेरच्या घरी पुन्हा जायचं तर... पुढे काय या विचारानेच ती हैराण झाली.