15 August, 2019

अच्युत गोडबोले यांची फेसबुकवरील पोस्ट.

स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
वाढदिवस..
आज १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि माझा वाढदिवसही! मला चक्क ७०वं वर्ष सुरु होईल. “तुम्ही एव्हढे मोठे (म्हणजे म्हातारे!) असाल असं वाटत नाही.” असं मला अनेक जणं म्हणतात. पण एव्हढं म्हातारं न दिसण्यामागचं रहस्य केस रंगवण्यात आहे हे अजून लोकांच्या लक्षात आलेलं नाहीये. पण आता थकवा जाणवतो. माझं लिखाण आणि भाषणं यांचा वेग जरी कमी झाला असला तरी ते अजून चालूच आहेत. अजून मला माझी काही ४-५ मुख्य पुस्तकं पुढच्या २-३ वर्षांत पूर्ण करायची आहेत. आणि त्यानंतर काही वर्षं असलीच तर ती वाचनात आणि संगीत ऐकण्यात घालवायची आहेत.
तसं पाहिलं तर आयुष्याकडे मागे वळून पाहाताना मी बरंच कमावलं आणि बरंच गमावलं असं वाटतं. पैसा आणि प्रसिद्धी हे माझे खूप मोठे सोबती कधीच नव्हते, पण मी त्याबाबत खूपच समाधानी आहे. पण यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे मला सामान्य वाचकांकडून प्रचंड म्हणजे प्रचंडच प्रेम मिळालं. अगदी लहान लहान तालुक्यांतल्या खेडयांपासून ते देशापरदेशांतल्या मोठ्या शहरांपर्यंत!आणि विशेष म्हणजे ज्येष्ठांबरोबरच हजारो तरुणांनीही मला खूपच उचलून धरलं. एखाद्या लेखकाला इतकं स्टारडम मिळेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. नाटकं, सिनेमे किंवा ललित साहित्य लिहिणार्‍यांपैकी काहींना असं स्टारडम मिळालेलं आपण जाणतोच. पण विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, गणित आणि अनेक कला अश्या विषयांवर लिहिणार्‍याल्या समाजात इतका मान मिळू शकतो हे बघून मला खूप भारावून जायला होतं. त्यामुळेच मला लिहिण्याचं बळ येतं. मी सगळ्या वाचकांचा ऋणी आहे.
एक खंत मात्र सतत वाटत राहाते. आपण आयुष्यात काय मिळवलं ? मला अजूनही प्रचंड बेचैन करणारी गोष्ट म्हणजे मी ज्या प्रेरणेनं एकेकाळी समाज बदलायला निघालो होतो, त्या तर्‍हेनं समाज किंचितही बदलला नाही. इतकंच नाही तर तो दिवसेंदिवस जास्तच वाईट होत चाललाय. इथे मी कुठलाही इझम किंवा कुठलाही पक्ष यांचा विचार करत नाहीये. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण बघितलं तर गेल्या तीस वर्षांपासून आपण प्रचंड आत्मकेंद्री झालो आहोत. एव्हढंच नव्हे तर तसं होणं चांगलं, असंही म्हणायला लागलो आहोत. आज गुन्हेगारी आणि हिंसा पूर्वीपेक्षा खूपच वाढल्या आहेत. गेल्या ३० वर्षात भ्रष्टाचार प्रचंड वाढला, आतंकवाद वाढला, युद्धं आणि मारामार्‍या वाढल्या, विस्थापितांची संख्याही वाढली, धर्म आणि जातींमधली दरी वाढली, धर्म आणि जातीवरुन खून, मारामार्‍या आणि दंगली व्हायला लागल्या. विषमता वाढली आणि बेकारीही प्रचंड वाढली, सट्टेबाजीही वाढली. तेजी-मंदीचे बुडबुडे आणि अरिष्टंही वाढली. त्याचबरोबर रोजगारातली आणि एकूण आयुष्यातली अस्थिरताही वाढली. मनोविकार वाढले, नैराश्याचं प्रमाण वाढलं, आत्महत्या वाढल्या. शेतकरी, विद्यार्थी अश्या सगळ्यांच्या मिळून रोज भारतात १००० आत्महत्या होतात ! असा समाज माझ्या डोक्यातला आदर्श समाज होता का ? या समाजाला आपण सुखी म्हणायचं का ?
या सगळ्यांपेक्षा जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे आपण गेल्या ३० पर्यावरणाची अपरिमित हानी केली. त्यामुळे सतत पूर, दुष्काळ, वादळं, अतिवृष्टी अश्या चित्रविचित्र गोष्टी अवकाळी व्हायला लागल्या आणि त्यातून अब्जावधी रुपयांचं नुकसान व्हायला लागलं; आणि त्यामुळे अनेक लोक मरायला लागले आणि कोट्यवधी बेघर व्हायला लागले. सध्या महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक या राज्यांत एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे पूर याचं जे अमानुष तांडव चाललंय ते या सगळ्याची साक्ष देताहेत. पूर्वीही यातल्या काही गोष्टी व्हायच्या पण त्यांची तीव्रता आणि वारंवारिता आज प्रचंड वाढली आहे. पण हे सगळं अचानक झालेलं नाहीये. या सगळ्यांमध्ये एक सुसूत्रता आहे. या सगळ्या गोष्टी फक्त मानवनिर्मितच नाहीयेत तर त्या आपल्या चुकीच्या समाज-अर्थव्यवस्थेमुळे आणि चुकीच्या विकासनीतीमुळे झालेल्या आहेत. या सगळ्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वाढत्या उत्पादकतेचा फायदा फक्त १५-२० टक्के श्रीमंत लोकांना आणि फारफारतर थोडाफार मध्यमवर्गाला झाला. पण तो खालच्या ५०-६० टक्के लोकांपर्यंत खूपच कमी प्रमाणात पोहोचला. आणि त्यामुळे विषमता भीषण आणि बिभत्स दिसेल एव्हढी वाढली. तरीही ‘जी.डी.पी. वाढतोय, देशाची प्रगती होतेय’, अश्या घोषणा देऊन जगभर अनेक सरकारांनी जनतेला भुलवत ठेवलं. पण या जी.डी.पी. वाढीच्या अतिवेडामुळे (जीडीपीइझम) सतत प्रचंड ऊर्जा खाणारी आणि रोजगार निर्मिती न करणारी यंत्रं आणि रोबोज वापरुन फक्त वरच्या १५-२० टक्के लोकांसाठीच चैनीच्या चंगळवादी वस्तूंचं शहरांमध्ये उत्पादन करणारी एक विकासनीती आपण उभी केली आणि त्यामुळे गेल्या ३० वर्षांमध्ये वाढती विषमता, बेकारी आणि प्रदूषण या तीन राक्षसांची आपणच निर्मिती केली. ही विकासनीती आपण बदलली नाही तर तापमानवाढीमुळे या शतकाअखेरीस पृथ्वीचं आणि माणसाचं काय होईल हे सांगता येत नाही, अशी आज परिस्थिती आहे.
या उद्विग्नतेतूनच मी ‘अनर्थ’ हे पुस्तक लिहिलं. त्याला प्रतिसाद चांगला मिळतोय ही आनंदाची गोष्ट आहे. पण त्याचबरोबर सध्या दुष्काळ आणि पूर यांचं जे तांडव चाललंय ते या पुस्तकातल्या थिअरीला दुजोराच देतंय हे बघून वाईटही वाटतंय.
खरं म्हणजे आपण विकासाची व्याख्याच बदलली पाहिजे. विकास म्हणजे फक्त जीडीपीची वाढ असं न धरता, समाजातल्या प्रत्येकाचे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, कौटुंबिक, सामाजिक आणि पर्यावरणीय असे सर्व विकास झाले पाहिजेत. तंत्रज्ञान वापरू नये असं मुळीच नाही; जीडीपीत वाढ करू नये असंही नाही, पण जेवढी वाढ निसर्गाला, पर्यावरणाला मान्य आहे, त्याचा विद्धंस न होता करता येईल तेवढीच वाढ व्हायला हवी. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, वीज, रस्ते यांकडे लक्ष देऊन निदान सर्वांना समान संधी तरी उपलब्ध करून दिली पाहिजे. अपंग, वृद्ध, रुग्ण आणि अशा अनेकांची काळजी घेणारी शांतताप्रिय, विवेकवादी समाजव्यवस्था निर्माण करणं याला ‘खरा विकास’ म्हणता येईल. यासाठी शांततामय आणि लोकशाही मार्गानं एक चळवळ उभी करायची गरज आहे. त्यासाठीच खरं तर ‘अनर्थ’ लिहिलंय. माझ्या आयुष्यात मी फारसे सामाजिक बदल घडवून आणू शकलो नाही याची मला प्रचंड खंत आहे आणि ती मला सतत बेचैन करत असते. पण आता निदान शेवटी त्यात थोडाफार का होईना आणि जेव्हढा शक्य आहे तेव्हढा बदल घडवण्यासाठी मी माझ्या परीनं त्यात मतं मांडली आहेत. जरुर वाचा आणि वाचल्यावर काय वाटलं ते कळवा.
नमस्कार.
अच्युत गोडबोले.
achyut.godbole@gmail.com

Cafe Coffee Day: एक कप कॉफीने अनेकांचं आयुष्य बदलवलं !


#repost from my facebook wall:


व्यवसायातील अनेक गणिते चुकली असतीलही... पण "त्याने" अस्सल भारतीय brand तयार केला ! #CCD मध्ये भेटुयात असं सहजपणे म्हणायला "त्याने" शिकवलं... "Lot of things can happen over a cup of coffee" हा प्रेमाचा मुलमंत्र कळत-नकळत त्याने भारतीय तरुणाईला दिला. दोष दाखवणंं सहजशक्य असतं पण समानतेच्या नवीन कल्पना टिपिकल महान आणि सोवळ्या (?) भारतीय संस्कृतीमध्ये रुजवणं, त्या फुलवणं तितकंच कठीण !!!


#CCDMemories It was not our "First Romantic Date" It was not his first time to be in CCD. But It was my first time to go in CCD. सीएसटीला सगळे बोर्ड आणि जाणार्‍या-येणार्‍या गाड्या बघत २०-२५ मिनिटं वेळ घालवला होता. अनेकवेळा फोना-फोनी झाल्यावर त्याने सांगितलं, "CCD मध्ये बस. मी आता १५-२० मिनिटात येतोय... ट्रेनमध्येच आहे." स्टेशनच्या बाहेर पडुन उजवी-डावी वळणं घेत मी CCD समोर येऊन थांबले. समोरच्या झुलत्या काचेच्या दरवाजातुन आत जावं न जावं या संभ्रमात दोन क्षण उभी राहिले. इतर वेळेस कायम जीन्स- टीशर्टमध्ये असणारी मी त्याच दिवशी सैलसर पंजाबी ड्रेस घालुन ऑफिसवरुन डायरेक्ट तिथे थडकले होते. टिपिकल काकुबाईचा अवतार ! महाबावळट वाटत होतं. त्यात आमचं भांडणांचा अखेरचा फैसला करायचा असल्याने मी फार उत्साही नव्हतेच.
अचानक दार उघडलं आणि हसत-खिदळत दोन मुली बाहेर पडल्या. थंडगार वार्‍याचा झोत अंगावर आला आणि नकळत मी आत शिरले. आत गेल्यावर कॉफी कुठे मागायची असते हेही तेव्हा मला माहित नव्हतं. क्षणभर असंही मनात आलं, इतक्या पॉश ठिकाणी कॉफी प्यायची आणि मुळात ती कशी सांगायची, काहीच माहिती नाही... किती बावळट दिसतो आहोत आपण या सर्व माहोलमध्ये... तितक्यात CCD ची मुलगी समोर आली आणि शुध्द मराठीत म्हणाली, मॅडम कोणी येणार आहे का? माझा नकळत आ वासला गेला असावा आणि काही समजायच्या आत मी होकारार्थी मान हलवली. असाच काही वेळ गेल्यावर कंटाळुन मी पुन्हा मन लावुन त्यांचं मेन्युकार्ड वाचायला सुरुवात केली. अचानक दाणकन कोणी समोर येउन उभं राहिलं. मान वर करुन पाहिली. "तो" आला होता. क्षणार्धात आजुबाजुचं सगळं जग फ्रीज होऊन सगळा फोकस त्याच्या चेहर्‍यावर आला. तो बसला आणि मला विचारलं, कॉफीची काय ऑर्डर दिलीस. मी म्हटलं, मला समजत नाही, सीसीडी मध्ये पहिल्यांदा आलेय. आधी हसला पण तोच मला घेऊन काऊंटर जवळ गेला, तिथे जाऊन मला लहान मुलाला सांगावं तसं समजावुन सांगितलं. आम्ही ऑर्डर दिली. आम्ही परत कोचवर येऊन बसलो... आणि ..... बोलत राहिलो.... बोलत राहिलो.... कॉफीचे मग बराचवेळ तसेच हातात धरुन.
On that evening, LOT of things changed in my life over a cup of cappuccino... Big decisions taken for our professional and personal life. We became best friends, soulmates and beyond that.


03 August, 2019

पक्ष्यांच्या दुनियेत- भाग १ (दयाळ आणि शिंपी)


प्रस्तावना !
झाडे, पक्षी, प्राणी, किटक यांच्याप्रमाणेच मानवजात ही मुलत: निसर्गपरिसंस्थेचा (part of ecosystem) एक भाग आहे. माणसाने मात्र वेगाने विकसित होत जाणार्‍या आकलनशक्त्ती आणि बुध्दीमत्तेच्या जोरावर निसर्गातील सर्वच घटकांचा स्वार्थासाठी वापर करण्यास सुरुवात केली आणि परिणामी आज जैवविविधता (biodiversity) कमी होते आहे आणि त्याचा दृष्य परिणाम तात्काळ पक्ष्यांच्या विविधतेवर दिसुन येतो आहे. पक्षी हे जैवविविधतेचे प्रथम आणि सहजगत्या लक्षात येणारे मापक (Indicator) समजले जाते. एखाद्या परिसरात जितक्या विविध प्रकारचे पक्षी दिसतात तितका तो अधिवास माणसासाठी राहण्यास उपयुक्त असे मानले जाते.
उदाहरणार्थ, वेडे राघु, २-३ प्रकारच्या मैना, कावळे, चिमण्या, पोपट, बुलबुलच्या दोन-तीन जाती, सुर्यपक्षीच्या ३-४ जाती, तांबट, अधुनमधुन दिसणारे घुबड, घारी यासारखे पक्षी जर तुमच्या परिसरामध्ये (३-४ किलोमीटरचा साधारण गोलाकार परीसर) आढळत असतील तर घराच्या आसपास वड-पि‌पळ, गुलमोहर, पळस, पांगारा, उंबर यासारखी झाडे आहेत आणि तुमच्या घराच्या आसपासची ऑक्सिजनची पातळी चांगली आहे हा महत्त्वाचा आणि आपल्यासारख्या सहज सामान्य लोकांना लक्षात येण्यासारखा निर्देशक आहे.
कावळे, कबुतर आणि चिमण्या वगळता ८-१० प्रकारचे पक्षी आपल्या बिल्डिंगच्या आसपास सहज दिसतात. त्यांची संख्या वाढविणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. यातीलच काही पक्ष्यांची माहिती या सदराद्वारे मी देण्याचा प्रयत्न करते आहे. या सदरामध्ये नमुद केलेले जवळजवळ सर्वच पक्षी मी पनवेलमधील व्ही. के. हायस्कुल (बल्लाळेश्वर-वडाळे तलाव) परिसर, नित्यांनद नगर, पनवेल महानगरपालिकेचा गोखले हॉलजवळील अत्यंत रहदारीचा भाग इथे पाहिलेले आहेत. पाहिले आहेत असे म्हणण्यापेक्षा चालत असताना सहज दिसलेले आहेत किंवा त्यांचा आवाज ऐकु आलेला आहे. या सदरामुळे आपल्या सर्वांमध्ये किमान आपल्या जागेआसपासची झाडे जोपासण्याची आणि पर्यायाने पक्ष्यांबद्दलची जागरुकता निर्माण व्हावी अशी सदिच्छा!
- मृणाल भिडे (सोमणी)

दयाळ (Oriental Magpie Robin)

रोज सकाळी अत्यंत सुमधुर आवाजात शीळ घालत मला उठवणारा आणि माझ्या माहेरचा comfort zone इथे पनवेलमध्ये नित्यनियमाने रोज जपणारा हा माझा लाडका दयाळ या सदराचा पहिला मानकरी ठरलाय. सकाळच्या वेळेस घराच्या कोणत्याही खिडकीतुन पाहिलं की चिमणीपेक्षा थोडासाच मोठा, काळ्या पाठीचा आणि पांढर्‍या पोटाचा हा दयाळ झक्कासपैकी तारांवर हेलकावे घेत बसलेला दिसतो. त्याला मध्येच काय हुक्की येते देव जाणो, त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या कावळ्यालाही तो उगाचच हुसकावुन लावतो. ‘बस्स बाबा, तुच एकटा तारेवर’, असं म्हणत कावळा देखील बापडा उडुन जातो. खरंतर पळस, पांगारा अशी फुलांची झाडं याला फार प्रिय. पण माझ्या घरासमोरचा दयाळ मात्र उंबरावर बसुन बहुदा उंबरामधले किडे शोधुन शोधुन खात असतो. किंवा आजुबाजुच्या घरांमधे लावलेली फुलझाडांवरही याचं बारीक लक्ष असतं. कोणी नाहीसं बघुन झपकन त्या झाडात घुसेल, फुलांमधला रस पिईल, पाणी साचलेलं असेल ते पिईल नाहीतर कुंड्यामधल्या अळ्या शोधुन, त्या मटकावुन परत तारेवर हेलकावे घेत राहिल.
या दयाळचा विणीचा हंगाम (breeding season) मार्च अखेरीस सुरु होतो आणि जुलै अखेरीस पिल्लं घरट्याबाहेर येउन उडायला शिकतात. विणीच्या हंगामात एरवी शांत लयीत गाणार्‍या दयाळाला नव्याने गाणी सुचायला लागतात. अशाच एका एप्रिलमधल्या शांत दुपारी माझी झोपमोड करुन अव्याहतपणे हा नेहमीपेक्षा वरच्या पट्टीत कोणाला साद घालतोय हे मी वाकुनवाकुन सगळीकडे शोधत राहिले.. तेवढ्यात मला बर्‍यापैकी दुरच्या बिल्डिंगमधे काहीतरी काळं-पांढरं हलताना दिसलं. दुर्बिणीतुन निरखुन पाहिल्यावर लक्षात आलं की हे मिस्टर दयाळ या विणीच्या हंगामामधली आपली प्रेयसी शोधण्याकामी मग्न आहेत. १-२ दिवसांतच त्यांना यश मिळाल्याचं लगेच दिसुन आलं. कारण नंतर पुढचे काही दिवस तारेवर एका ऐवजी दोन दयाळ पक्षी हेलकावे घेत बसलेले दिसले, दोघेही जण आपल्या चिमुकल्या शेपट्या सतत वरखाली नाचवत अळ्या, किडे शोधुन खाण्यात तल्लीन झालेले होते.

शिंपी (Common Tailorbird)

च्युईट, च्युईट असा सलग न थकता सकाळचा गजर लावुन मला उठविणारा दुसरा पक्षी म्हणजे शिंपी.... सर्वप्रथम मी गेल्यावर्षी अर्धवट झोपेत पहाटे याचा खणखणीत स्वर ऐकला तेव्हा माझी उरली सुरली झोप देखील उडाली.. मला क्षणभर वाटलं, हा जणु खिडकीच्या बाहेरच बसुन ओरडतोय, इतका जवळुन याचा आवाज ऐकु येत होता. एकतर हा रंगाने पोपटी-हिरवा आणि आकाराने चिमणीइतका पिटुकला असल्याने पटकन झाडांच्या पानांत मिसळुन जातो. तेव्हाही त्याला शोधुन काढताना माझी दमछाक झाली आणि प्रत्यक्षात हे राजे खालच्या झाडाऐवजी घराबाजुला असलेल्या शेजारच्या सदाफुलीच्या रोपात बसुन साद घालत होते. काही दिवस गेले आणि अचानक एकाऐवजी दोन-तीन आवाज ऐकु लागले. निरखुन पाहिलं तर तब्बल ७-८ पक्षी एकत्र कौलांवर बसुन उन्हं खात खात; माश्या, लहान सुंरवट, अळ्या, चिलटं वगैरे किडेमकोडे शोधत होते आणि एकीकडे खणखणीत च्युईट, च्युईट स्वरात एकमेकांशी गप्पा मारत होते. आंब्याचा मोहोर, त्याभोवती फिरणारे किडे, पळस, पांगारा या फुलांचा मध हेदेखील यांचं आवडतं खाणं. ज्या अर्थी ७-८ जण एकत्र दिवसभर मला अधुनमधुन दिसतातच त्या अर्थी त्यांची घरटी देखील जवळपास कुठेतरी असावीत. मला मात्र ती अजुन पाहायला मिळालेली नाहीत. सहसा रुंद पानांचे झाड किंवा बारमाही हिरवे राहणारे वड-आंबा यासारखे झाड शिंपी पक्षी शोधतात. दोन पानांच्या कडा बाजुबाजुने एकमेकांत गुंतवत किंवा एकच मोठे रुंद पान गोल वळवुन त्याचे लहान बोगद्यासारखे देखणे घरटे बांधण्याचे कसब बघण्यासारखे असते. शहरात मात्र मोठी झाडे कमीकमी होत असल्याने शिंपी पक्षी सोनटाका, क्रदळ (कर्दळ), रुंद पानांचे पामट्री अशा झाडांमध्ये देखील घरटे बांधताना आढळुन येतात.
थोडे विषयांतर करुन सांगायचे तर ज्यांच्याकडे पाळीव प्राणी नसतील आणि सोनटाका/कर्दळीच्या जोडीला जाई-जुई, जास्वंद, अनंत, झेंडु अशी फुलझाडे असतील आणि गॅलरीला बर्डनेट नसेल त्यांनी पाण्याचे पसरट भांडे जरुर ठेवावे. सुरुवातीला काही दिवस फक्त कावळे आणि कबुतरं येऊन घाण करतील पण एकदा चिमण्या आणि बुलबुल यांना पाण्याचा सुगावा लागला की आपोआप बाकीचे छोटे पक्षी निर्धास्त होतात आणि त्यांचा किलबिलाट दिवसभर सुरु राहतो. मांजर, कुत्रा घरात असेल तर मात्र कावळा, कबुतरं सोडुन सहसा कोणी पक्षी येत नाही. सलग दोन अडीच वर्षं हे सारे पक्षी येत राहिले की त्यातल्याच कोणीतरी आपली नजर चुकवुन ठराविक काळासाठी आपला संसार थाटतात. (आणि बरेचदा तो पक्षी शिंपी किंवा बुलबुलच असतो.)