06 March, 2024

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो.

30 December, 2023

Three of us

#movietime 
#moviereview 
#threeofus 
गेल्या काही वर्षांत थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणं खुप कमी झालंय. तरीही मला एकदा कायझालं, सॅमबहादुर, three of us हे असले सिनेमे बघायचे होते. जमलंच नाही. असो. नेटफ्लिक्स वर three of us आल्याचं समजलं. लगेच पाहिला. रिव्ह्यू वाचले नव्हते मुद्दामहून. 

जे करण जोहर, चोप्रा ॲन्ड कंपनी, रोहित शेट्टी ॲन्ड कंपनीचे फॅन्स आहेत त्यांनी हा सिनेमा बघुच नका. 

शैलजा आणि दीपांकर देसाई हे मध्यमवयीन जोडपं. आणि सारीका आणि प्रदीप कामत हे दुसरं जोडपं. या चौघांचेही एकमेकांत असलेले तरल.... उत्कट.... प्रगल्भ .... आणि आणि ... मऊ मऊ उबदार गोधडीसारखं नातेसंबंध ! बास हे इतकंच साधं सोपं आयुष्य होतं... आहे ... असेल यावर विश्वास ठेवायला भाग पडणारा हा सिनेमा. 

शैलजाला विस्मरणाचा आजार जडला आहे. ती अचानक दीपांकरला वेंगुर्ल्याला जाऊया, म्हणून विनवते आणि आठवडाभरासाठी ते जातात. तिथे शैलजाची भेट तिच्या बालमित्राशी - प्रदीप कामतशी होते. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि गतकाळातल्या काही जखमांवरची खपली पुन्हा निघते. उद्गम कविता आणि त्या कवितेचा अर्थ जागोजागी सापडणं हा सिनेमा आहे.

अविनाश अरुण यांचा कॅमेरा चौघांच्या नातेसंबंधांची विचित्र, तरीही अलवार, सुंदर गुंफण टिपत राहतो.
काही संवादातून नात्यात गरजेचा असणारा प्रगल्भपणा दिसतो. 
सारीका मिश्किल पणे प्रदीपला म्हणते, "कवी महोदय, इतक्या वर्षात माझ्यावर कविता लिहावी सुचलं नाही. आज बालपणीचं प्रेम दिसलं तर चार ओळी सुचल्या !" तिच्या या वाक्यावर प्रदीप ज्या उत्कटतेने तिचा हात हातात घेतो, तिला बिलगतो ती कविता त्या क्षणात सारीकाच्या मनात रुजते. तिच्यासाठी नसूनही. ...
किंवा सारिका जेव्हा शैलजाला म्हणते, "अजीब तो लगा, पर अच्छा अजीब लगा" त्या क्षणात या चित्रपटाचा सगळा साधेपणा सामावला आहे. 

एक गंमत आता पोस्ट लिहिताना लक्षात आली. प्रदीप स्वत:ची कविता वाचून दाखवतो आहे आणि कवितेतलं काहीही न कळणारा दीपांकर त्याला 'आगे?' विचारतो. प्रत्यक्षात दीपांकरची भूमिका साकारणारा स्वानंद किरकिरे स्वत: एक उत्तम कवी आणि गीतकार. हा मुद्दाम जुळवून आणलेला गंमतीशीर योगायोग असेल कदाचित, पण आवडला.
एक प्रसंगात आकाशपाळण्यात शैलजा आणि प्रदिप थोडा वेळ वरती असतात तेव्हा त्यांच्यातला संवाद अद्भुत आहे. 
अजुन एका प्रसंगात दीपंकर प्रदीप बद्दल बोलताना म्हणतो की त्याला पुरूषांवर विश्वासच नाहीय. पण तो माझ्यावर विश्वास ठेवू पाहतोय कारण तुझा माझ्यावर विश्वास आहे. वा ! काय सुरेख संवाद आहेत हे.! हे इतकं मोजक्या शब्दांत बायकोबद्दलचं कौतुक कसं कोण मांडु शकेल?
अजुन एक, सहजच वाटेल पण बॉलिवूडच्या टिपिकल पुरूषप्रधान संस्कृतीला हादरे बसतील असा आहे. फिरुन आल्यावर दीपंकर शैलजाच्या केसांना तेल लावतोय आणि एकीकडे ते दोघं मुलाशी गप्पा मारतात. फोन बंद झाल्यावर अचानक शैलजा वळते आणि विचारते मी भरतलाच विसरले तर? दीपंकर काही न बोलता केसांवरच थोपटतो आणि शांतपणे पुन्हा तिच्या डोक्यावर तेल मुरवत राहतो. इन मिन पाच सात मिनिटांचा प्रसंग पण हे असं बायकोने नवर्‍याकडुन तेल लावून घेणं मराठी सिरीयल मध्ये होईल? आणि झालंच तर background ला एखादं दर्दभरं गाणं वाजेल किमान दोन एपिसोड तरी नक्कीच संपतील यात आणि कन्सेप्ट ची पुरी वाट लागेल. असो च ते एक. 

शेफाली छायाने शैलजा ची भूमिका फारच अप्रतिम साकारली आहे. She is class apart... तिच्या चेहऱ्यावर वरचे हावभाव, बोलके डोळे पाहणं म्हणजे भारी अनुभव ठरतो. जयदीप अहलावत हा माझा आवडता अभिनेता आहे. मी पहिल्यांदा त्याला गब्बर इज बॅक मध्ये पाहिला. छोटा रोल होता. पण लक्षात राहिला. नंतर गँग ऑफ वासेपुर मध्ये... मग आवडतच गेला. He is versatile. Good underplay acting ! स्वानंद किरकरे चा किंचित काही काळ जेलस होऊन स्वतःच दुखावलेला नवरा आणि शैलजासोबत नव्याने नातं घट्ट झाल्यावर समंजस नवरा छान आहे. 

आता गेल्या काही वर्षांत अचानक कुठेतरी हरवल्यासारखं वाटू लागलं होतं, ते आज कितीतरी दिवसांनी पुन्हा अनुभवायला मिळालं. मन तृप्त झालं, शांत झालं, कुणाच्यातरी मांडीवर डोकं असावं आणि त्या व्यक्तीचा प्रेमळ स्पर्श आपल्याला काहीच सुचवत नाहीय, ती वासना नाही, सहानुभूती नाही काहीच नाही... फक्त कपाळावर, चेहर्‍यावर फिरणारे त्याचे हात आपल्या आत त्याचं प्रेम झिरपवत नेतात, मुरवत नेतात, मनाच्या दुखऱ्या अवघड जागेवर खपली धरु पाहतेय असं काहीतरी अनुभवायला मिळालं.

19 December, 2022

मौनमुद्रा

मी देसाईंची श्रीमानयोगी तर असंख्य वेळा वाचली आहे. आतु बाबा तर चिडवायचे देखील... आमच्या बाईंनी पोथी लावलीय. बायका देवाच्या पोथी लावतात आमची मृणाल तशी ही श्रीमान योगीची पोथी लावते. पण इतकं असलं तरी मी कथा-कांदबऱ्यात मनाने इतकी घुसत नाही. पण तसं माझं कवितेच्या बाबतीत होत नाही. 

कविता मात्र माझ्या मनात रेंगाळत राहतात... खुप दिवस, महिने, वर्ष देखील... म्हणूनच मी कविता सहसा वाचायलाच जात नाही. 

मोबाईल डिक्लटरींग करताना हा फोटो सापडला. आवडलेल्या कवितांचं फोटो मध्ये कोलाज करणं हा ही एक माझा आवडता प्रकार होता... आजही आहे.
हि कविता पहिल्यांदाच वाचली तेव्हा कॉलेजमध्ये होते. तेव्हा वाटलं हि कविता ब्रेकअप झाल्यानंतरची आहे 🙄 आज लक्षात येतं हि प्रत्येक लग्न झालेल्या, न झालेल्या प्रत्येकीची गोष्ट आहे. 🙂

"दिवसाच्या चोवीस मात्रा संसाराच्या दहा फुटी खोलीत चपखल बसवणारी विंदाच्या नजरेतली प्रसन्न स्त्री " (झपताल) आणि " प्रचंड कल्लोळ प्राणांत सावरून, ओठांवरची मौनमुद्रा उकलून मोजकं बोलणारी शांताबाई यांच्या नजरेतली ती रुक्ष स्त्री" (मौनमुद्रा) हि दोन्ही तिचीच तर रुपं.... पण एका लेखकानं लिहिलेली कविता आणि लेखिकेनं केलेली कविता याच्यातला मुलभूत फरक तो हाच असेल का?


04 December, 2022

माणसं

पंधरावीस नातेवाईकांच्या गर्दीत 
आपल्या माणसाकडे हळूच पाहणारी माणसं...

आसपासचं जग विसरून
एकमेकांत गुरफटलेली माणसं...

तरूणांच्या उत्साहासोबत
थकली भागली पावलं खेचणारी माणसं...

चुकूनमाकून मिळालेला घराबाहेरचा उजेड
नजरेत भरून घेणारी बुरख्याआडची माणसं....

वारंवार लिपस्टीक/ भांगेचा सिंदुर 
निरखणारी घुंगटाआडची माणसं... 

झाडां-फुलांची नावं लिहीणारी
शोधक नजरेची माणसं... 

पिंजऱ्यातले प्राणी बघताना 
आकाशातले पक्षी उत्सुकतेने पाहणारी माणसं...

जिथे ऐसपैस जागा दिसेल तिथे
खाऊच्या पुड्या उघडणारी माणसं... 

पोराबाळांचा उदंड उत्साह बघून
उद्याच्या काळज्या विसरलेली माणसं...

प्रत्येक वळणावर सेल्फी घ्यायला
उभी राहिलेली माणसं...

लेकीसाठी एक फॅन्टा विकत घेताना
चारचारदा खिसा चाचपणारी माणसं...



...

हि सारीजणं
भविष्यात येऊ घातलेल्या 
धर्म-शीतयुद्धात करपवलेली स्वप्नं घेऊन
कुठे जातील?

काय करतील?

...
...
...
न जाणो
कोणी काय सांगावं
...

हि माणसं एक होतील आणि
पाय रोवून उभी राहतील
माणुसकी आणि अहिंसेच्या कातळावर !
  

16 November, 2022

चिऊची डायरी

Multi vitamins and calcium etc drops घेणं हा एक रोजचा धमाल कार्यक्रम असतो. ते ड्रॉप्स मोजूनच द्यावे लागतात. ते मात्र मी काढून देते. पंधरा मिनिटांत आटोपणारा खेळ. अर्थात हे रोज असंच होतं असं नाही. त्याचीच हि गंमतजंमत. 

आई खाली बसताना किंवा डायनिंग टेबलवर पाणी, त्या ड्रॉप्सच्या बाटल्या, चमचा, ड्रॉपर सगळं साहित्य घेऊन बसतेय का यावर चिऊचं बारकाईने लक्ष असतं. माझ्याही अंगात किडे भारी ! मुद्दाम मी एखाद दुसरी गोष्ट देतच नाही. मग चिऊपण काय विसराळू मिळालीय अशा नजरेने बघते. 😂
कॅल्शियम मोजून वाटीत दिलं रे दिलं की प्यायच्या आधीच प्रश्न, " आदून देनाल?" (अजून देणार?) मी नाही म्हणणार माहितेय तरी दरवेळेस विचारेल, मग मिस्कील हसेल... (मी मनातल्या मनात, अग चेंगटा, आधी दिलंय ते तर पी. 🤪)  त्यानंतर मात्र ते जेमतेम दोन-तीन चमचे कॅल्शियम पोटात जायला पाच ते पंधरा मिनिटं कितीही वेळ लागू शकतो... depends upon her mood.  बयेची गाडी फारच रंगात असेल तर वाटीतला शेवटचा थेंब पण कसा बोटावर येत नाहीय याबद्दल स्वतःशीच बडबड करून होते. कॅल्शियम चाटून पुसून पिऊन झालं की तिरक्या नजरेनं आईकडे बघायचं आणि डी व्हिटामिनची बाटली आपल्या पाठीमागे लपवायची..  अशावेळेस आईने, 'अरेच्या बाटलू कुठे गेलीस तु' असे काहीतरी डायलॉग्स म्हणणे शास्त्र असते! मग त्या बाटलीतून आधीच तयार असलेला ड्रॉपर बाहेर येऊन तो तोंडात जातो... (आपोआपच बरं का !) मग आई समोर बसलेली नसली तर आईच्या नावानं जप करायचा. आई मग वरून ड्रॉपरचं रबरी फुगा दाबणार. (मनातल्या मनात : बाई सगळंच तुम्ही करा. फक्त तोंडात ड्रॉपर दाबायला मला ठेवा कामाला. 😂😂😉)
मग येतो फॉलिक ॲसिडचा नंबर ! मोजून 8 थेंब द्यायचे असलेली काचेची बाटली आई तिरकी करते. चिऊनं धरलेल्या चमच्यात ड्रॉप पडतात. हे सवयीचं असलं तरी दरवेळेस चिऊ मात्र अद्भुत काहीतरी घडतंय असला शुद्ध नाटकी आव आणत काहीतरी बडबडते. (ती काय बोलते ते अजूनही समजलेलं नाही.) मग चमचा तोंडात धरून चाटत बसते. मग एकदाचे ड्रॉप संपले की पाणी पिऊन सगळं सिंकमध्ये ढकललं की आई समोर असो - नसो, एकदम थाटात चिऊ ओरडते "झायंऽऽऽ"

चिऊ कसली, तिची आईच सुटकेचा निश्वास टाकते...