16 June, 2011

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी...
(सालं इथे मी एकटा जरी बाईकवर बसलो तरी ही केकटत असते...एकदा धडपडलास ते पुरे नाही का?)
नी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी.
(महा बावळट ध्यान आहे!)
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !
(ते सांगायला लागत नाही... खिदळखापरीच आहे नाहीतरी...)


एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
(हे स्वप्न कधी पुरं होईल? जाम नखरे आहेत अंगात! काय जगाची उस्तवार करते कोण जाणे?)
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..
(दर दुसर्‍या मिनिटाला होणारी आणि पाचव्या मिनिटाला संपणारी भांडणं!
नाही झालं तरच तो अपवाद! आणि मोठ्या हिरिरीने भांडते...)

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर...

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा...


एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...
(बापरे! इतका विश्वास टाकायचा तिच्यावर? आधीच डोक्यावर बसलीय... अजुन शेफारेल!!)

06 June, 2011

रीलेशनशिप

"... प्रत्येक नात्याची आपली एक डिमांड असते. मागणी असते. किंवा असं म्हण की दोन माणसांच्या सह-अस्तित्वात जेव्हा अपेक्षा, मागणी निर्माण होते तेव्हाच नात्याचा जन्म होतो. त्या मागणीला प्रतिसाद देता तेव्हा तुम्हाला ते माणूस आवडायला लागतं. आणि नात्याची मागणी शंभर टक्के पूर्ण करणं म्हणजे प्रेम करणं. मुख्य म्हणजे हे लक्षात घे रेणू, मी मागणी नात्याची म्हटलं, दुसर्‍या माणसाची नव्हे.

--
नचिकेताचे उपाख्यान.
संजय भास्कर जोशी"


...

सगळं हातातुन निसटत चाललंय असा भास होत असताना हे पुस्तक वाचलं...त्या काळात अनेकदा वाचलेलं हे पुस्तक आज हातात घेतलं की कधी कधी वाटतं सालं काय आहे ह्या पुस्तकात असं खास. फालतु पुस्तक आहे... पण ह्याच पुस्तकाने खुप आधारही दिलाय... नात्यांचे नवीन कंगोरे सापडले... विशेषतः मैत्रीचा नवीन अर्थ सापडला... अरेच्चा! असंही असु शकतं?आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक नात्याचा विचार करताना जाणवत राहतं, की खरंच आपण किती अपेक्षा वाढवुन ठेवतो. लहानपणी आई-वडिलांकडुन, अजुन थोडं मोठं झाल्यावर अगदी शाळेतल्या आपल्या लाडक्या बाईंकडुन देखील... :D मग विश्व विस्तारत जातं आपलं आणि इथेच सारं बिनसत जातं. प्रत्येक नात्याची मर्यादा असु शकते हे त्या फुलपंखी दिवसांत कळत नाही किंवा कळत असलं तरी आपला अहं इतका ताठर असतो की त्यापुढे सगळी सायकॉलॉजी शुल्लक वाटत असते...


मागणी नात्याची असली तरी हे नातं दोन माणसांमध्येच होतं. मग नक्की कोणाची अपेक्षा असते हे नातं समोरच्याने पुर्णार्थाने निभवावं अशी? जो ह्या नात्यात निरपेक्षपणे नकळत गुंतत जातो त्याची की ज्याने फक्त स्वार्थासाठी हे नातं जोडलंय त्याची?? मुळात एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं ही कल्पनाच इतकी वास्ट आहे आणि प्रगल्भही. पण माझ्या कठीण काळात एका अनामिक नात्याने मला भक्कम आधार दिलाय, पुन्हा एकदा आत्मविश्वासाने जगायला बळ दिलंय, जेव्हा आपले म्हणवणारे निष्ठुरपणे तोडलं होतं तेव्हा अनपेक्षितपणे या नात्यात मी गुंतत गेले.
पण आज वरचं वाचताना वाटतं आज जे जगावेगळं, उफराटं नातं मी अनुभवतेय, त्या नात्यामध्ये आम्हांला सह-अस्तित्वाची कधीच गरज लागली नाही, पुढे लागेल असं वाटत नाही. असं असतानाही मी प्रचंड पझेसिव्ह आहे त्याच्याबाबतीत. कोणत्याही क्षणी संपु शकतं हे नातं... हातातुन जितक्या सहजतेने वाळु निसटुन जाते तितक्या सहजतेने.

मग हे नातं नाही का? नाही तर नक्की काय आहे हे?