30 October, 2010

मनाली-रोहतांग पास


सिमला-कुलु-मनाली अशी टुर 4-5 वर्षापुर्वी केली असली तरी त्यावेळेस अम्ही एप्रिल महिन्यात गेलो होतो. त्यामुळे रोहतांग पास पर्यंत वर जाता आलं नाही.म्हणुन खास रोहतांग पास साठी जुन मध्ये जायचं ठरवलं.हिमाचलमधल्या केलॉंग/लाहोल-स्पिती जिल्ह्याचं प्रवेशद्वार म्हणुन ओळखला जाणारा 50 किलोमीटर लांबीचा हा पास मनाली-लेह या हायवेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. वर्षातुन फक्त जुन ते ऑक्टोबर मध्ये सुरु राहणारी वाहतुक इतर महिन्यात मात्र पुर्ण ठप्प होऊन जाते. रोहतांग पास मधुन वाहतुक नेमकी कधी सुरु होते याबाबत हिमाचल प्रदेशच्या सर्व सरकारी साइटस् आणि आमचा माहितीतला तिथला ड्रायव्हर सर्वांना चार-चारदा विचारुन मगच जुन महीन्याची तिकीटं काढली... अशी बातमी वाचली आणि सर्वांनाच तिथे जाण्याचे वेध लागले.

शहर सोडुन बाहेर पडलो. घाटामधुन गोलाकार वळणं घेत घेत गाडी वर वर जाऊ लागली. ठिकठिकाणचा बर्फ वितळलेला दिसत होता. आणि हिवाळ्यात बर्फाने झाकलेले डोंगर हिरवेगार झालेले होते. पाच वर्षापुर्वी आम्ही जिथे स्नो-पॉईट म्हणुन थांबलो होतो... आणि तिथलं गोठलेलं तळं पाहिलं होतं तो भाग ही पुर्ण हिरवागार झाला होता आणि तिथल्या तळ्यात चक्क रिव्हर क्रॉसिंग सारखा काहीतरी खेळ सुरु होता!!

रोहतांग पास मध्ये आल्यावर मात्र स्वर्ग दोन बोटं उरला... चारही बाजुंनी हिमशिखरं... अधिका अधिक थंड आणि बोचरी होत जाणारी हवा... सोसाट्याचा वारा...वळणं घेत घेत केलोंग कडे (लाहोल-स्पिती) जाणारा रस्ता... उतारावरुन उतरत जाणार्‍या मेंढ्या... थोड्या-थोड्या वेळाने दिसणारे आर्मी-ग्रेफ चे ट्रक्स्... अप्रतिम वाटत होतं. प्रभाकर पेंढारकर यांनी लिहिलेल्या रारंग-ढांगाचं, किन्नोर-कैलास शिखराचं वर्णन सतत डोळ्यासमोर येत होतं... रोहतांगपास ही त्याची झलक होती. दोन-तीन तास थांबुन, मनसोक्तपणे निसर्ग डोळ्यात साठवुन परत निघालो...

28 October, 2010

परतीचा प्रवास

आज थिम्फु मध्येच भटकायचं असल्याने सावकाश उठलो... धोबीघाट उघडला... रविवार असल्याकारणाने सगळी पर्यटकी स्थळं बंदच होती. भुतानचं राष्ट्रीय ग्रंथालय पहाण्याची खुप उत्सुकता होती. मात्र तेही बंदच होतं. मग काय असंच गावात भटकलो. आणि खोलीवर परतुन गाढ झोपलो.
भुतान वरुन परत येताना भारत-भुतान सरहद्दीवरचं गारुमारा नॅशनल पार्क पाहिलं... मस्त निवांत दोन दिवस जंगलात राहिलो... भटकलो... पाहायला खास असं काही मिळालं नाही.. अर्थातच अपेक्षा नव्हतीच! येताना गारुमारा-हावडा बस प्रवास, हावडा-मुंबई विमान प्रवास आणि घरी... सोबत सुंदर आठवणी!!!