16 June, 2010

पारोचा मुक्काम

27 तारखेला बुध्दजयंती निमित्त सरकारी सुट्टी होती म्हणुन पुनाखा गावी जाण्यासाठी लागणार्‍या परमिटचं काम होणं शक्य नव्हतं. म्हणुन आदल्याच रात्री प्रोग्राम बदलुन पारो गावी जायचं ठरवलं.थिम्फुच्या अनुभवावरुन आधी राहण्याची सोय लावली. बॅगा टाकल्या. आणि मग भटकायला बाहेर पडलो. तिथे देखील राष्ट्रीय संग्रहालय बंद!! ते दुसर्‍या दिवशी करायचं ठरवुन बाकीची ठिकाणं पाहीली. तत्संग मोनेस्ट्री, किशु मोनेस्ट्री आणि द्रुगयालचा किल्ला पाहण्यासारखं आहे. मुळातच पारो गाव अतिशय सुरेख आणि कमालीचं शांत.
पारो गावात शिरण्यापुर्वी आम्ही पारो गावाला उंचावरुन वळसा घातला आणि उंचावरुनच पारोचा विमानतळ पाहिला. तीन बाजुंना डोंगर आणि एका बाजुला विमानतळाची धावपट्टी आणि त्याला समांतर असा पारो गावातला रस्ता.
त्यावेळेस तेथे सहजच आकाशाकडे लक्ष गेलं असता निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला. सुर्याभोवती रिंग़ण तयार झालं होतं आणि रिंगणातला भाग काळा होता (की तसा भास होत होता माहीत नाही.) आणि रिंगणाबाहेरचं आकाश मात्र छान निळं होतं. फोटोमध्ये ते टिपण्याचा प्रयत्न तितकासा यशस्वी झाला नाही. फोटोत मात्र दोन्ही ठिकाणी आकाश काळं दिसतंय.

तत्संग मोनेस्ट्री ला ‘Tiger’s Nest’ असंही नाव आहे. तीन हजार फुट उंचीवर असलेल्या या चा खडा चढ चढुन जायला कमीत कमी 3 ते 4 तास लागतात. पद्मसंभव स्वामींनी वाघाच्या पाठीवर बसुन भुतानमध्ये प्रवेश केला ती हीच जागा... अशी आख्यायिका आहे. आयुष्यात एकदा तरी ह्याजागी भेट द्यावी अशी भुतानी लोकांची श्रध्दा आहे.

(नाहीतर आपल्याकडचं काशी-बनारस. तिथे जाऊन काय पुण्य लाभतं माहीत नाही. पण चारधामपैकी एक असलेल्या यमनोत्रीला मात्र खरंच आयुष्यात एकदातरी जावं आणि कोणताही दानधर्म न करता, भरपुर फोटो काढुन, सगळा निसर्ग-हिमालय अनुभवुन, तृप्त मनाने परत यावं तरच आयुष्याचं सार्थक होतं!!!) आम्हांला वारंवार यमनोत्रीची आठवण येत होती. हातात फारसा वेळ नसल्याने आणि तितका उत्साह नसल्याने आम्ही आपले उगाच पाऊण-एक तासाचा चढ चढुन गेलो. इकडे तिकडे फेरफटका मारला. आणि परत आलो.


त्यानंतर असंच मजा म्हणुन द्रुग्यालचा किल्ला पाहिला. द्रुग्यालचा शब्दशः अर्थ “Pride of Bhutan” असा आहे. 1600-1651 मध्ये भुतानमध्ये तिबेटबरोबर झालेल्या अनेक लढाया जिंकल्या आणि वर्चस्व निर्माण केले. त्याची आठवण म्हणुन हा किल्ला बांधला अशी माहीती तेथील एका स्थानिक पर्यटकाने दिली. त्यानंतर किशु मोनेस्ट्री पाहिली. अतिशय प्राचीन आणि मोजक्या मोनेस्ट्री पैकी एक आहे. मग मात्र दुपार झाल्यावर आमचा फिरुन पाहण्याचा उत्साह संपत आला आणि पावसानेपण आपले रंग दाखवायला सुरुवात केली. मग हॉटेलवर आलो आणि थोडावेळ आराम केला. बाहेरचा पाऊस थोडा थांबल्यासारखा वाटल्यावर आम्हांला खोलीवर स्वस्थ बसवेना म्हणुन परत संध्याकाळी बाहेर पडलो आणि एक पायी फेरफटका मारुन आलो... मस्त वाटलं... (असं स्वर्गसुख कोणतीही पर्यटक कंपनी देत नाही...)

14 June, 2010

थिम्फु बदलतंय...
ठिकठिकाणी नव्याने होणारी बांधकामं, ड्रील मशीन... कॉक्रींट मिक्सर... आणि कसले कसले शांततेवर ओरखडे उठवणारे आवाज... आणि त्याच वेळेस चारी बाजुंना दिसणार्‍या हिरव्या डोंगररांगा हे काहीसा विरोधाभास असलेलं माझं पहिलं थिम्फु दर्शन!! माझ्या संग्रही असलेल्या 8-10 वर्षापुर्वीच्या प्रवासी कात्रणांवरुन थिम्फु अतिशय शांत देखणं हिरवंगार छोटं शहर असेल असं मला वाटायचं. माझी काहीशी निराशाच झाली. थिम्फु देशाची राजधानी आहे आणि उल्लेखनीय गोष्ट अशी की तिचा नियोजनबध्द विकास होतोय आणि म्हणुनच थिम्फु गावाचा आखीव-रेखीवपणा टिकुन आहे. पण गावाची पुर्वीची शांतता हरवल्यासारखी वाटत होती.थिम्फुबद्दल.
थिम्फु देशाची राजधानी असल्याकारणाने देशाचा विकास काहीसा याच शहराभोवती केंद्रीत झालाय. इथली हॉटेल्स बर्‍यापैकी महाग आहेत. आम्हांला खोली मिळायलादेखील बराच त्रास झाला. मालबझार रस्त्याच्या दोन्ही बाजुस 1760 हॅन्डीक्राफ्टसची दुकानं आणि वरच्या मजल्यावर हॉटेल्स... याच रस्त्याच्या दुसर्‍या टोकाला आणि याच रस्त्याला समांतर अशा दुसर्‍या रस्त्यावर सरकारी कार्यालयं असा साधा सोपा थिम्फु शहराचा नकाशा!! अर्थात याला बरेच छोटे छोटे उपरस्ते वगैरे आहेतच.. पण तेही फारसं समजायला क़ठीण नाहीय. थिम्फु पायी फिरायला एकदम छान आणि सुरक्षितदेखील... National Handicrafts Museum, Textile Museum, ताज पंचतारांकीत हॉटेल (हॉटेल अर्थातच बाहेरुन), क्लॉक टॉवर चौक, राष्ट्रीय ग्रंथालय आणि पोस्ट ऑफिस पाहण्यासारखं आहे. एकुणएक सगळ्या खाजगी आणि सरकारी कार्यालयांवर/इमारतींवर भुतानी चित्रशैलीचा सुरेख ठसा आहे. अगदी पेट्रोलपंप पण यातुन सुटलेला नाही.

गाडी पार्कींग.
खड्डे नसलेले सरळ आखीव रस्ते... आणि रस्त्यांच्या एका बाजुला सलगपणे खास पार्कींगसाठी ओढलेले पांढरे पट्टे. भुतान देशात फक्त चारचाकी गाड्यांना परवानगी आहे. सायकल, सायकलरिक्क्षा, तीन/सहा आसनी रिक्षा असे बहुविध प्रकार चालवायला तेथे परवानगी नाही. याबाबत माझे निरीक्षण असे की फार पुर्वी सहजपणे गाड्या उपलब्ध होत नसाव्यात. याला कारणं दोन. एक म्हणजे लोकांची तितके पैसे खर्च करण्याची क्षमता नव्हती आणि दुसरं गाड्या परदेशातुन आयात करण्यासाठी भुतान सरकार उत्तेजन देत नसावं. पण बदलत्या जागतिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार त्या उपलब्ध करुन देण्याचा सरकारने निर्णय घेतला तेव्हा सर्वप्रथम रस्त्यांची वाहतुक (म्हणजे वन-वे कुठे आणि टु-वे कुठे) कशी हवी आणि रस्त्यावर येणार्‍या गाड्यांना पार्कींगसाठी जागा हवी याचा विचार करण्यात आला असावा आणि मगच गाड्या विकत घेण्यास उत्तेजन देण्यात आले. आज थिम्फुच्या मालबझार रस्त्यावर वन-वे वाहतुक आहे आणि दुसरी बाजु पुर्णतः पार्कींगसाठी राखुन ठेवली आहे. आणि आखुन दिलेल्या जागेतच गाडी पार्क करणे कायद्याने बंधनकारक आहे. जिथे दोन्ही बाजुंना वाहतुक सुरु असते तेथील रस्ते चांगले रुंद आहेत आणि तेथेही एक बाजु राखुन ठेवली आहे. गाडी विरुध्द दिशेला असेल तर गाडी पुर्ण वळवुन ती पार्कींग च्या रस्त्यावर आणुन तिथे ठेवावी लागते अगदी 5 मिनिटांचं काम असेल तरी. आणि थोड्याफार फरकाने हीच पध्दत सर्व भुतानमधे आहे. (असं आपल्याकडे कधी बरं घडेल???)

आजही ज्या भुतानी लोकांकडे गाडी नाही त्यांच्यासाठी मिनीबसेसची ठराविक वेळेने सेवा आहे आणि ठरलेल्या वेळेस ठरलेली बस येते. (म्हणजे आपल्याकडचा लाल डबा!!पण तो लाल डबा अशी छान सेवा देत नाही हा भाग निराळा). थिम्फु शहरात वेगळी सिटीबस आहे(हिच्याबद्दल फारसं माहीत नाही). पण गाडीचा प्रकार एकच... मिनीबस!! तो तिथे घाटांत चालवायला सोयीस्कर असावा...

अजुन एक चांगली गोष्ट म्हणजे इथल्या ड्रायव्हर्सना सतत हॉर्न वाजवायची सवय नाही. (हे आपल्याकडे होणं अशक्य आहे!!!) आणि हे कायद्याने बंधनकारक देखील आहे. पण त्यांना सवय नाही हे महत्वाचंच!! शिवाय तेथील गाड्यांच्या इजिंनाना सायलेन्सर बसवणं बधंनकारक असावं कारण गाड्या सुसाट वेगात असतील तेव्हा आणि सिग्नलला थांबल्या असतील तेव्हादेखील त्यांचा आवाज येत नव्हता अगदी बाईक असेल तरीसुध्दा जो आपल्याकडे नेहमी येतो.(याच्यात देखील आपल्याकडे सुधारणा होणं अशक्य आहे!!! माझ्याकडे बाईक आहे हे सर्वांना कळायला हवंच आणि आवाज करत नाही ती बाईक कसली...अशी समस्त भारतीय बायकर्सची मनोवृत्ती आहे.मोजके अपवाद असतीलही). यामुळे रात्री उशिरापर्यंत (म्हणजे जास्तीतजास्त 10 पर्यंत) वाहतुकीची वर्दळ असली तरी तिच्या आवाजाचा त्रास असा होतच नाही.

26 तारखेला दुपारी पोचलो त्यादिवशी फारसं काही माहीत नसल्याकारणाने जास्त न फिरता आम्ही मात्र लौकरच जेवुन घेतलं आणि हॉटेलवर परतलो.

11 June, 2010

थिम्फुच्या वाटेवर...26 तारखेला सकाळी 10 वाजता ग़ाडीने थिम्फुला जायला निघालो. फुंटशोलिंग-थिम्फु प्रवास 5 ते 6 तासाचा आहे. सुरेख निवांत रस्ते... क्षणा क्षणाला बदलत जाणारा निसर्ग यामुळे प्रवास फार मजेचा झाला.. भुतानमध्ये जवळपास 70% भागात वनं राखुन ठेवली आहेत. अर्थात त्याला थोडं धार्मिक कारण आहे. तेथील जनतेची भुतं-खेतं, आत्मे, पुर्नजन्म वगैरे गोष्टीवर श्रध्दा आहे आणि तेथील निसर्गाला हात लावला, गरजेपेक्षा जास्त उपयोग केला तर निसर्गात राहाणारे आत्मे दुखावले जातील अशी जुन्या भुतानी लोकांची भावना आहे. “Gross National Happiness” ही तेथील विकासाची मुलभुत संकल्पना मानली जाते. पैशापेक्षा आत्मिक समाधान महत्वाचे!! आणि याच भावनेपोटी आज इतर देशांपेक्षा तेथील वनसंपत्ती अजुन तरी टिकुन राहिली आहे. त्याचा प्रत्यय भुतानमध्ये फिरताना जागोजागी आला. सर्वत्र जमिनीवर आणि डोंगरउतारावर असंख्य जातीची झाडं दिसुन आली. बराचसा प्रवास देखील सावलीमधुनच झाला.

भुतान मधील सर्वच रस्ते भारतीय सेना आणि भारतीय सीमा रस्ते संघटना [Border Road organization (BRO)] यांच्या सहकार्याने बांधण्यात आले आहेत. आणि रस्त्यांच्या देखभालीसाठी देखील भारत सरकारची मदत घेतली जाते. घाटांमधुन प्रवास करताना एक महत्वाचा फरक सातत्याने जाणवला. आपल्या इथे घाटांमध्ये रस्ते तयार करताना पार वरपर्यंत झाडं तोडली जातात. कारण काहीही असो... भुतानमध्ये मात्र जितकी गरज आहे तितक्याच उंचीपर्यंत झाडं तोडली आहेत आणि खालच्या भागाला बहुधा सिमेंटचं आणि मोठ्मोठ्या दगडांचा आधार देणारं बांधकाम केलेलं आहे. (बहुधा अशासाठी की चालत्या गाडीतुन पाहिलं असलं कारणाने नीटसं कळलं नाही.) तिथेही चा प्रश्न आहेच. पण तुलनेने तोडलेला भाग लवकर सेट होतो म्हणजे सुरुंगस्फोटामुळे जिथपर्यंत माती ढासळली आहे तितकीच खाली येते असं ड्रायव्हरच्या बोलण्यावरुन ज़ाणवलं याला माझ्या अंदाजाने अजुन एक कारण असेल ते म्हणजे झाडं पार वरपर्यंत तोडली जात नाहीत. परिणामी खालची माती निसटुन जाते पण वरची माती मात्र झाडांची मुळं धरुन ठेवत असावीत. असो...

निसर्गाने भुतानमधलं स्वागत मात्र अप्रतिम केलं... ढगांचे पुंजके... रिपरिपणारा पाऊस...हिरव्यागार डोंगररांगा... असंख्य पक्ष्यांचा किलबिलाट... प्रवासाचा शीण असा जाणवलाच नाही आणि दुपारी 3 च्या सुमारास थिम्फु आलं सुध्दा.

10 June, 2010

प्रवास सुरु...

ती दिव्य लेखी परीक्षा... आणि अजुन काय काय... हजार-बाराशे शैक्षणिक सोपस्कार पुर्ण झाले.. आणि मी एकदाची सुटले.... अभ्यासाची हौस पुरेपुर फिटली.

24 मे ते 2 जुन असा 10 दिवसाचा प्रोग्राम ठरवला होता.. पण जास्त वेळ प्रवासात घालवायची इच्छा नसल्याने मुंबई-कोलकाता विमान प्रवास आणि कोलकाता-न्युअलिपुरदुआर हा प्रवास रेल्वेने केला. न्युअलिपुरदुआर हे स्टेशन न्युजैलपैगुडी या स्टेशनच्या पुढे आहे. या स्टेशनला उतरुन सिक्किम वगैरेसाठी जाता येतं. त्यामुळे काहीजण सिक्किम वगैरे करुन तिथुनच भुतान साठी जातात. पण त्यासाठी हातात किमान 15 दिवस हवेत आणि प्रोगाम व्यवस्थितपणे आखायला हवा. कारण भुतान मध्ये प्रवेश करताना आधी सिक्किम वरुन खाली NJPला (न्युजैलपैगुडी) यावं लागतं आणि तिथुन फुंटशोलिंगला (भारत-भुतान हद्दीवरील भुतान मधील गाव) जावं लागतं. तिथे प्रवेश परवाना तयार केला जातो आणि या सगळ्यासाठी किमान एक दिवस तरी जातोच.
आम्ही हे असे काही तिरपागडे उद्योग न करता सरळ न्युअलिपुरदुआरला उतरलो. आणि तिथुन स्थानिक बसने जॉयगावला (भारत-भुतान हद्दीवरील भारतामधील गाव) गेलो. कोलकाता-न्युअलिपुरदुआर (कामरुप एक्सप्रेस) रेल्वेप्रवासात काय वाटेल ते विकायला येत होतं. दुर्बिणीपासुन सिंथेसायजर पर्यंत....मोबाईल चार्जरपासुन रुबी जिगॅसा पझलपर्यंत आणि शहाळ्यापासुन उकडलेल्या अंड्यांपर्यत वाटेल ते. एका शर्टविक्रेत्याला आणि एका पानवाल्याला आमच्या शेजारच्या लोकांनी प्रश्न विचारुन मस्त भंडावलं... त्यामुळे मस्त करमणुक झाली. पहाटे (म्हणजे माझी पहाटच !!) 6.30ला NJP आलं आणि 9.25ला न्युअलिपुरदुआर.

6 पासुनच सगळा बाहेरचा परीसर छान हिरवागार दिसायला लागला होता. छोटी बांबुच्या चटयांची टुमदार घरं आणि घरासमोर किंवा शेतात एका कडेला असलेली तळी... मधुनच बांधाकडेला फुललेली रानफुलं... एकुण सगळा माहोल मस्त ओला गच्च हिरवा होता. हिरव्या रंगाच्या अगणित छटा... कुठे करडा-हिरवा, कुठे पोपटी, क़ुठे गडद हिरवा... लांबवर पसरलेली शेतं. भरुन आलेलं आभाळ. काही ठिकाणी पडुन गेलेला पाउस आणि निरभ्र झालेलं आकाश. रस्त्याकडेला आलेली ओल....हा असाच माहोल पार पुढपर्यंत म्हणजे जॉयगावपर्यंत टिकुन होता... जॉयगावला आता आलेला शहरी बकालपणा जाणवत होता. तिथुनच पाच मिनिटाच्या अंतरावर भुतानच्या हद्दीत असलेलं फुंटशोलिंग गाव मात्र छान आखीव-रेखीव आहे आणि हाच आखीव रेखीवपणा भुतानला आम्ही पाहिलेल्या तिन्ही शहरांमध्ये दिसला. घरगुती परिचयातील एक स्नेहींच्या ओळखीने तेथील स्थानिक व्यक्तीशी मुंबईमधुनच फोनवर बोलणं झालं होतं. त्यानुसार त्यांनी फुंटशोलिंगच्या हॉटेलमध्ये राहायची व्यवस्था केली होती. केवळ त्यांच्याच ओळखीने इमिग्रेशन ऑफिस बंद झाल्यावर देखील प्रवेश परवाना मिळाला. अर्थात आपण भारतीय असल्याचा हा अजुन एक फायदा!! त्यांनीच पुढील 7-8 दिवसांसाठी गाडीची व्यवस्था करुन दिली.

09 June, 2010

दिल ढूंढता है.फिर वहीं.. फुरसत के चार दिन...

वर्षभर नको इतकी (जरा जास्तच्) मेहनत केल्यावर (अभ्यासाची!!) मला गुलजारचं गाणं फारच आठवायला लागलं आणि फेब्रुवारीत भुतानचा विचार पक्का झाला...

आता भुतानच का? सगळ्यात पहिलं आनि अतिशय महत्वाचं कारण म्हणजे ते टिपिकल पर्यटकी ठिकाण नाहीय. त्यामुळे हवीहवीशी वाटणारी शांतता आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य अशा दोन महत्वाच्या (म्हणजे माझ्या दृष्टीने महत्वाच्या) गोष्टींसाठी भुतान प्रसिध्द आहे. थिम्फु, पारो, पुनाखा, भुम्थांग ही गावं सोडली तर पाहण्यासारखं काही नाही. पारोचं राष्ट्रीय संग्रहालय आणि तत्संग मॉनेस्ट्री, पुनाखाची मॉनेस्ट्री, थिम्फु शहरातील पर्यटकी ठिकाणं... बास!! यादी इथेच संपते. भुतानचं सुती कापड, मास्क वगैरे गोष्टी विकत घेण्यासारख्या आहेत. पण त्यासाठी आपल्या खिशात भरपुर पैसा हवा. बाकी बरंच काही विकत घेण्यासारखं आहे. मोहात पाडणारं आहे. पण त्या सर्वच गोष्टी चीन, बांगलादेश आणि भारतामधुन आयात होतात. साहजिकच त्यांची किंमतदेखील वाढते. अन्यथा या गोष्टींचं नेत्रसुख अतिउत्तम!! पण ही यादी ज्यांना काय काय बघितलं आणि काय काय खरेदी केली ह्याचा गावगोंगाट करायचा मोह असतो... हौस असते त्या लोकांसाठी....

आणि ज्यांना निरर्थक भटकायचं आहे... मन मानेल तसं... आणि घरी परतल्यावर “हं,जरा फिरुन आलो.. नवीन प्रदेश पाहीला.. नवीन माणसं ‘वाचली’...” इतकंच सांगायचंय... त्यांना भुतान फिरायला 1 महीना सुध्दा कमी पडेल...

भुतानला जाताना आपल्या भारतीयांना फक्त मतदार ओळखपत्र असणं अत्यंत गरजेचं असतं. त्याआधारे फुंटशोलिंगला (भारत-भुतान हद्दीवरील भुतान मधील गाव) फक्त थिम्फु आणि पारो या दोनच गावांसाठी प्रवेश परवाना तयार केला जातो. इतर गावांसाठी प्रवेश परवाना थिम्फु वरुन केला जातो. मतदार ओळखपत्र नसेलच तर ड्रायविंग लायसन्स, पॅन ओळखपत्र आणि शासकीय नोकरीत असाल तर तेथील ओळखपत्र असणं गरजेचं असतं. लहान आणि कॉलेजवयीन मुलांसाठी देखील छायाचित्र असलेलं ओळ्खपत्र लागतं. पासपोर्ट असलाच पाहीजे असं काही नाही... विसा लागत नाही.... तिथे फिरायला भुतान सरकारने ठरवुन दिलेल्या दराप्रमाणे गाड्या उपलब्ध असतात. लहान मोठ्या सगळ्या प्रकारच्या. साधारणपणे 7-8 दिवसाचे 10 ते 14 हजार असे भाडे आकारले जाते (सिटींग कपॅसिटीप्रमाणे). थिम्फु, पारो शहरात बरीच हॉटेल्स आहेत. 500 ते 1400 असे दर आहेत... थोडक्यात भटक्या जमातीच्या सहपरीवार- सहकुटुंबाची फिरण्याची छान सोय आहे... हा फक्त शाकाहारी आणि दारुला न शिवणार्‍या लोकांची जरा पंचाईत होते ती म्हणजे त्यांना झक मारत बार असलेल्या हॉटेलमध्येच जेवावं लागतं... आणि जेवताना खाण्या-पिण्याचे फारसे चोचले करुन चालत नाहीत... प्रत्येक हॉटेलला बार आहेच. असे असले तरी तेथील स्थानिक लोक झिंगुन मात्र फिरताना मात्र आढळले नाहीत...