15 August, 2019

अच्युत गोडबोले यांची फेसबुकवरील पोस्ट.

स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
वाढदिवस..
आज १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि माझा वाढदिवसही! मला चक्क ७०वं वर्ष सुरु होईल. “तुम्ही एव्हढे मोठे (म्हणजे म्हातारे!) असाल असं वाटत नाही.” असं मला अनेक जणं म्हणतात. पण एव्हढं म्हातारं न दिसण्यामागचं रहस्य केस रंगवण्यात आहे हे अजून लोकांच्या लक्षात आलेलं नाहीये. पण आता थकवा जाणवतो. माझं लिखाण आणि भाषणं यांचा वेग जरी कमी झाला असला तरी ते अजून चालूच आहेत. अजून मला माझी काही ४-५ मुख्य पुस्तकं पुढच्या २-३ वर्षांत पूर्ण करायची आहेत. आणि त्यानंतर काही वर्षं असलीच तर ती वाचनात आणि संगीत ऐकण्यात घालवायची आहेत.
तसं पाहिलं तर आयुष्याकडे मागे वळून पाहाताना मी बरंच कमावलं आणि बरंच गमावलं असं वाटतं. पैसा आणि प्रसिद्धी हे माझे खूप मोठे सोबती कधीच नव्हते, पण मी त्याबाबत खूपच समाधानी आहे. पण यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे मला सामान्य वाचकांकडून प्रचंड म्हणजे प्रचंडच प्रेम मिळालं. अगदी लहान लहान तालुक्यांतल्या खेडयांपासून ते देशापरदेशांतल्या मोठ्या शहरांपर्यंत!आणि विशेष म्हणजे ज्येष्ठांबरोबरच हजारो तरुणांनीही मला खूपच उचलून धरलं. एखाद्या लेखकाला इतकं स्टारडम मिळेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. नाटकं, सिनेमे किंवा ललित साहित्य लिहिणार्‍यांपैकी काहींना असं स्टारडम मिळालेलं आपण जाणतोच. पण विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, गणित आणि अनेक कला अश्या विषयांवर लिहिणार्‍याल्या समाजात इतका मान मिळू शकतो हे बघून मला खूप भारावून जायला होतं. त्यामुळेच मला लिहिण्याचं बळ येतं. मी सगळ्या वाचकांचा ऋणी आहे.
एक खंत मात्र सतत वाटत राहाते. आपण आयुष्यात काय मिळवलं ? मला अजूनही प्रचंड बेचैन करणारी गोष्ट म्हणजे मी ज्या प्रेरणेनं एकेकाळी समाज बदलायला निघालो होतो, त्या तर्‍हेनं समाज किंचितही बदलला नाही. इतकंच नाही तर तो दिवसेंदिवस जास्तच वाईट होत चाललाय. इथे मी कुठलाही इझम किंवा कुठलाही पक्ष यांचा विचार करत नाहीये. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण बघितलं तर गेल्या तीस वर्षांपासून आपण प्रचंड आत्मकेंद्री झालो आहोत. एव्हढंच नव्हे तर तसं होणं चांगलं, असंही म्हणायला लागलो आहोत. आज गुन्हेगारी आणि हिंसा पूर्वीपेक्षा खूपच वाढल्या आहेत. गेल्या ३० वर्षात भ्रष्टाचार प्रचंड वाढला, आतंकवाद वाढला, युद्धं आणि मारामार्‍या वाढल्या, विस्थापितांची संख्याही वाढली, धर्म आणि जातींमधली दरी वाढली, धर्म आणि जातीवरुन खून, मारामार्‍या आणि दंगली व्हायला लागल्या. विषमता वाढली आणि बेकारीही प्रचंड वाढली, सट्टेबाजीही वाढली. तेजी-मंदीचे बुडबुडे आणि अरिष्टंही वाढली. त्याचबरोबर रोजगारातली आणि एकूण आयुष्यातली अस्थिरताही वाढली. मनोविकार वाढले, नैराश्याचं प्रमाण वाढलं, आत्महत्या वाढल्या. शेतकरी, विद्यार्थी अश्या सगळ्यांच्या मिळून रोज भारतात १००० आत्महत्या होतात ! असा समाज माझ्या डोक्यातला आदर्श समाज होता का ? या समाजाला आपण सुखी म्हणायचं का ?
या सगळ्यांपेक्षा जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे आपण गेल्या ३० पर्यावरणाची अपरिमित हानी केली. त्यामुळे सतत पूर, दुष्काळ, वादळं, अतिवृष्टी अश्या चित्रविचित्र गोष्टी अवकाळी व्हायला लागल्या आणि त्यातून अब्जावधी रुपयांचं नुकसान व्हायला लागलं; आणि त्यामुळे अनेक लोक मरायला लागले आणि कोट्यवधी बेघर व्हायला लागले. सध्या महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक या राज्यांत एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे पूर याचं जे अमानुष तांडव चाललंय ते या सगळ्याची साक्ष देताहेत. पूर्वीही यातल्या काही गोष्टी व्हायच्या पण त्यांची तीव्रता आणि वारंवारिता आज प्रचंड वाढली आहे. पण हे सगळं अचानक झालेलं नाहीये. या सगळ्यांमध्ये एक सुसूत्रता आहे. या सगळ्या गोष्टी फक्त मानवनिर्मितच नाहीयेत तर त्या आपल्या चुकीच्या समाज-अर्थव्यवस्थेमुळे आणि चुकीच्या विकासनीतीमुळे झालेल्या आहेत. या सगळ्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वाढत्या उत्पादकतेचा फायदा फक्त १५-२० टक्के श्रीमंत लोकांना आणि फारफारतर थोडाफार मध्यमवर्गाला झाला. पण तो खालच्या ५०-६० टक्के लोकांपर्यंत खूपच कमी प्रमाणात पोहोचला. आणि त्यामुळे विषमता भीषण आणि बिभत्स दिसेल एव्हढी वाढली. तरीही ‘जी.डी.पी. वाढतोय, देशाची प्रगती होतेय’, अश्या घोषणा देऊन जगभर अनेक सरकारांनी जनतेला भुलवत ठेवलं. पण या जी.डी.पी. वाढीच्या अतिवेडामुळे (जीडीपीइझम) सतत प्रचंड ऊर्जा खाणारी आणि रोजगार निर्मिती न करणारी यंत्रं आणि रोबोज वापरुन फक्त वरच्या १५-२० टक्के लोकांसाठीच चैनीच्या चंगळवादी वस्तूंचं शहरांमध्ये उत्पादन करणारी एक विकासनीती आपण उभी केली आणि त्यामुळे गेल्या ३० वर्षांमध्ये वाढती विषमता, बेकारी आणि प्रदूषण या तीन राक्षसांची आपणच निर्मिती केली. ही विकासनीती आपण बदलली नाही तर तापमानवाढीमुळे या शतकाअखेरीस पृथ्वीचं आणि माणसाचं काय होईल हे सांगता येत नाही, अशी आज परिस्थिती आहे.
या उद्विग्नतेतूनच मी ‘अनर्थ’ हे पुस्तक लिहिलं. त्याला प्रतिसाद चांगला मिळतोय ही आनंदाची गोष्ट आहे. पण त्याचबरोबर सध्या दुष्काळ आणि पूर यांचं जे तांडव चाललंय ते या पुस्तकातल्या थिअरीला दुजोराच देतंय हे बघून वाईटही वाटतंय.
खरं म्हणजे आपण विकासाची व्याख्याच बदलली पाहिजे. विकास म्हणजे फक्त जीडीपीची वाढ असं न धरता, समाजातल्या प्रत्येकाचे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, कौटुंबिक, सामाजिक आणि पर्यावरणीय असे सर्व विकास झाले पाहिजेत. तंत्रज्ञान वापरू नये असं मुळीच नाही; जीडीपीत वाढ करू नये असंही नाही, पण जेवढी वाढ निसर्गाला, पर्यावरणाला मान्य आहे, त्याचा विद्धंस न होता करता येईल तेवढीच वाढ व्हायला हवी. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, वीज, रस्ते यांकडे लक्ष देऊन निदान सर्वांना समान संधी तरी उपलब्ध करून दिली पाहिजे. अपंग, वृद्ध, रुग्ण आणि अशा अनेकांची काळजी घेणारी शांतताप्रिय, विवेकवादी समाजव्यवस्था निर्माण करणं याला ‘खरा विकास’ म्हणता येईल. यासाठी शांततामय आणि लोकशाही मार्गानं एक चळवळ उभी करायची गरज आहे. त्यासाठीच खरं तर ‘अनर्थ’ लिहिलंय. माझ्या आयुष्यात मी फारसे सामाजिक बदल घडवून आणू शकलो नाही याची मला प्रचंड खंत आहे आणि ती मला सतत बेचैन करत असते. पण आता निदान शेवटी त्यात थोडाफार का होईना आणि जेव्हढा शक्य आहे तेव्हढा बदल घडवण्यासाठी मी माझ्या परीनं त्यात मतं मांडली आहेत. जरुर वाचा आणि वाचल्यावर काय वाटलं ते कळवा.
नमस्कार.
अच्युत गोडबोले.
achyut.godbole@gmail.com

No comments:

Post a Comment