03 August, 2019

पक्ष्यांच्या दुनियेत- भाग १ (दयाळ आणि शिंपी)


प्रस्तावना !
झाडे, पक्षी, प्राणी, किटक यांच्याप्रमाणेच मानवजात ही मुलत: निसर्गपरिसंस्थेचा (part of ecosystem) एक भाग आहे. माणसाने मात्र वेगाने विकसित होत जाणार्‍या आकलनशक्त्ती आणि बुध्दीमत्तेच्या जोरावर निसर्गातील सर्वच घटकांचा स्वार्थासाठी वापर करण्यास सुरुवात केली आणि परिणामी आज जैवविविधता (biodiversity) कमी होते आहे आणि त्याचा दृष्य परिणाम तात्काळ पक्ष्यांच्या विविधतेवर दिसुन येतो आहे. पक्षी हे जैवविविधतेचे प्रथम आणि सहजगत्या लक्षात येणारे मापक (Indicator) समजले जाते. एखाद्या परिसरात जितक्या विविध प्रकारचे पक्षी दिसतात तितका तो अधिवास माणसासाठी राहण्यास उपयुक्त असे मानले जाते.
उदाहरणार्थ, वेडे राघु, २-३ प्रकारच्या मैना, कावळे, चिमण्या, पोपट, बुलबुलच्या दोन-तीन जाती, सुर्यपक्षीच्या ३-४ जाती, तांबट, अधुनमधुन दिसणारे घुबड, घारी यासारखे पक्षी जर तुमच्या परिसरामध्ये (३-४ किलोमीटरचा साधारण गोलाकार परीसर) आढळत असतील तर घराच्या आसपास वड-पि‌पळ, गुलमोहर, पळस, पांगारा, उंबर यासारखी झाडे आहेत आणि तुमच्या घराच्या आसपासची ऑक्सिजनची पातळी चांगली आहे हा महत्त्वाचा आणि आपल्यासारख्या सहज सामान्य लोकांना लक्षात येण्यासारखा निर्देशक आहे.
कावळे, कबुतर आणि चिमण्या वगळता ८-१० प्रकारचे पक्षी आपल्या बिल्डिंगच्या आसपास सहज दिसतात. त्यांची संख्या वाढविणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. यातीलच काही पक्ष्यांची माहिती या सदराद्वारे मी देण्याचा प्रयत्न करते आहे. या सदरामध्ये नमुद केलेले जवळजवळ सर्वच पक्षी मी पनवेलमधील व्ही. के. हायस्कुल (बल्लाळेश्वर-वडाळे तलाव) परिसर, नित्यांनद नगर, पनवेल महानगरपालिकेचा गोखले हॉलजवळील अत्यंत रहदारीचा भाग इथे पाहिलेले आहेत. पाहिले आहेत असे म्हणण्यापेक्षा चालत असताना सहज दिसलेले आहेत किंवा त्यांचा आवाज ऐकु आलेला आहे. या सदरामुळे आपल्या सर्वांमध्ये किमान आपल्या जागेआसपासची झाडे जोपासण्याची आणि पर्यायाने पक्ष्यांबद्दलची जागरुकता निर्माण व्हावी अशी सदिच्छा!
- मृणाल भिडे (सोमणी)

दयाळ (Oriental Magpie Robin)

रोज सकाळी अत्यंत सुमधुर आवाजात शीळ घालत मला उठवणारा आणि माझ्या माहेरचा comfort zone इथे पनवेलमध्ये नित्यनियमाने रोज जपणारा हा माझा लाडका दयाळ या सदराचा पहिला मानकरी ठरलाय. सकाळच्या वेळेस घराच्या कोणत्याही खिडकीतुन पाहिलं की चिमणीपेक्षा थोडासाच मोठा, काळ्या पाठीचा आणि पांढर्‍या पोटाचा हा दयाळ झक्कासपैकी तारांवर हेलकावे घेत बसलेला दिसतो. त्याला मध्येच काय हुक्की येते देव जाणो, त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या कावळ्यालाही तो उगाचच हुसकावुन लावतो. ‘बस्स बाबा, तुच एकटा तारेवर’, असं म्हणत कावळा देखील बापडा उडुन जातो. खरंतर पळस, पांगारा अशी फुलांची झाडं याला फार प्रिय. पण माझ्या घरासमोरचा दयाळ मात्र उंबरावर बसुन बहुदा उंबरामधले किडे शोधुन शोधुन खात असतो. किंवा आजुबाजुच्या घरांमधे लावलेली फुलझाडांवरही याचं बारीक लक्ष असतं. कोणी नाहीसं बघुन झपकन त्या झाडात घुसेल, फुलांमधला रस पिईल, पाणी साचलेलं असेल ते पिईल नाहीतर कुंड्यामधल्या अळ्या शोधुन, त्या मटकावुन परत तारेवर हेलकावे घेत राहिल.
या दयाळचा विणीचा हंगाम (breeding season) मार्च अखेरीस सुरु होतो आणि जुलै अखेरीस पिल्लं घरट्याबाहेर येउन उडायला शिकतात. विणीच्या हंगामात एरवी शांत लयीत गाणार्‍या दयाळाला नव्याने गाणी सुचायला लागतात. अशाच एका एप्रिलमधल्या शांत दुपारी माझी झोपमोड करुन अव्याहतपणे हा नेहमीपेक्षा वरच्या पट्टीत कोणाला साद घालतोय हे मी वाकुनवाकुन सगळीकडे शोधत राहिले.. तेवढ्यात मला बर्‍यापैकी दुरच्या बिल्डिंगमधे काहीतरी काळं-पांढरं हलताना दिसलं. दुर्बिणीतुन निरखुन पाहिल्यावर लक्षात आलं की हे मिस्टर दयाळ या विणीच्या हंगामामधली आपली प्रेयसी शोधण्याकामी मग्न आहेत. १-२ दिवसांतच त्यांना यश मिळाल्याचं लगेच दिसुन आलं. कारण नंतर पुढचे काही दिवस तारेवर एका ऐवजी दोन दयाळ पक्षी हेलकावे घेत बसलेले दिसले, दोघेही जण आपल्या चिमुकल्या शेपट्या सतत वरखाली नाचवत अळ्या, किडे शोधुन खाण्यात तल्लीन झालेले होते.

शिंपी (Common Tailorbird)

च्युईट, च्युईट असा सलग न थकता सकाळचा गजर लावुन मला उठविणारा दुसरा पक्षी म्हणजे शिंपी.... सर्वप्रथम मी गेल्यावर्षी अर्धवट झोपेत पहाटे याचा खणखणीत स्वर ऐकला तेव्हा माझी उरली सुरली झोप देखील उडाली.. मला क्षणभर वाटलं, हा जणु खिडकीच्या बाहेरच बसुन ओरडतोय, इतका जवळुन याचा आवाज ऐकु येत होता. एकतर हा रंगाने पोपटी-हिरवा आणि आकाराने चिमणीइतका पिटुकला असल्याने पटकन झाडांच्या पानांत मिसळुन जातो. तेव्हाही त्याला शोधुन काढताना माझी दमछाक झाली आणि प्रत्यक्षात हे राजे खालच्या झाडाऐवजी घराबाजुला असलेल्या शेजारच्या सदाफुलीच्या रोपात बसुन साद घालत होते. काही दिवस गेले आणि अचानक एकाऐवजी दोन-तीन आवाज ऐकु लागले. निरखुन पाहिलं तर तब्बल ७-८ पक्षी एकत्र कौलांवर बसुन उन्हं खात खात; माश्या, लहान सुंरवट, अळ्या, चिलटं वगैरे किडेमकोडे शोधत होते आणि एकीकडे खणखणीत च्युईट, च्युईट स्वरात एकमेकांशी गप्पा मारत होते. आंब्याचा मोहोर, त्याभोवती फिरणारे किडे, पळस, पांगारा या फुलांचा मध हेदेखील यांचं आवडतं खाणं. ज्या अर्थी ७-८ जण एकत्र दिवसभर मला अधुनमधुन दिसतातच त्या अर्थी त्यांची घरटी देखील जवळपास कुठेतरी असावीत. मला मात्र ती अजुन पाहायला मिळालेली नाहीत. सहसा रुंद पानांचे झाड किंवा बारमाही हिरवे राहणारे वड-आंबा यासारखे झाड शिंपी पक्षी शोधतात. दोन पानांच्या कडा बाजुबाजुने एकमेकांत गुंतवत किंवा एकच मोठे रुंद पान गोल वळवुन त्याचे लहान बोगद्यासारखे देखणे घरटे बांधण्याचे कसब बघण्यासारखे असते. शहरात मात्र मोठी झाडे कमीकमी होत असल्याने शिंपी पक्षी सोनटाका, क्रदळ (कर्दळ), रुंद पानांचे पामट्री अशा झाडांमध्ये देखील घरटे बांधताना आढळुन येतात.
थोडे विषयांतर करुन सांगायचे तर ज्यांच्याकडे पाळीव प्राणी नसतील आणि सोनटाका/कर्दळीच्या जोडीला जाई-जुई, जास्वंद, अनंत, झेंडु अशी फुलझाडे असतील आणि गॅलरीला बर्डनेट नसेल त्यांनी पाण्याचे पसरट भांडे जरुर ठेवावे. सुरुवातीला काही दिवस फक्त कावळे आणि कबुतरं येऊन घाण करतील पण एकदा चिमण्या आणि बुलबुल यांना पाण्याचा सुगावा लागला की आपोआप बाकीचे छोटे पक्षी निर्धास्त होतात आणि त्यांचा किलबिलाट दिवसभर सुरु राहतो. मांजर, कुत्रा घरात असेल तर मात्र कावळा, कबुतरं सोडुन सहसा कोणी पक्षी येत नाही. सलग दोन अडीच वर्षं हे सारे पक्षी येत राहिले की त्यातल्याच कोणीतरी आपली नजर चुकवुन ठराविक काळासाठी आपला संसार थाटतात. (आणि बरेचदा तो पक्षी शिंपी किंवा बुलबुलच असतो.)

No comments:

Post a Comment