31 May, 2018

खामोशी : The Loudest Noise


मेरी खामोशी में सन्नाटा भी है,
शोर भी है।
तुने देखा ही नही,
आखों में कुछ और भी है।

गप्प राहुन समुद्राची गाज ऐकतेय ती... तिचं अस्फुट हसु पाहतोय तो... लाटांचं पाणी उडवुन तिचा समुद्र स्वत:कडे खेचु पाहतोय... ती पायाखालची वाळु सरकत असताना तिथेच उभी आहे एका निर्धाराने... जणू आव्हान देतेय नियतीला, ‘कर तुला हवं ते, तु तुझ्याच मर्जीने मला जगायला लावणार हे मलाही माहितीय पण कसं जगायचं, आणि कसं मरायचं हे मात्र मी ठरवणार.’

तिचं सर्वस्व, तिचा सखा, तिचा समुद्र आहे तिच्यासोबत... ती गप्प असली तरी मनातला कल्लोळ ओळखतो बरोबर... सहस्त्र लाटांची गाज ऐकवत राहतो तिला... मग तिच्या विचारांचा कल्लोळ देखील विरुन जातो... तिचा सखा तिला आयुष्याचं शहाणपण शिकवतो...



ती असते काहीशी अंर्तमुख
तिचा बाळपणीचा मित्र मात्र मस्तमौला, फकीर.

ती असते निरागस, अल्लड वगैरे
तो मात्र असतो व्यवहारी, बिलंदर वगैरे.

उध्वस्त होतं जातं तिचं बालपण
तो मात्र खेळण्याच्याच नादात.

दुखावलं जातंय तिचं मन
ज्याची त्याला जाणीवच नाही.

आर्तता आहे तिच्या नजरेत
जी त्याला उमजत नाही.

तिच्या डोळ्यांतल्या स्वप्नांच्या ठिकर्‍या उडाल्यात.
त्याची पहाटेची स्वप्नं मात्र खरी होतात.

स्वत:च्याच कोशात गुरफटुन जातेय ती
त्याला मात्र आकाशाचे वेध लागलेत.


वरवर मात्र हे सारं सहजपणे घेत, तुटल्या-फुटल्या मनाला सांभाळत ती येते तिच्या सख्याजवळ... लाटा झेपावत राहतात तिच्या पायांशी.. ती बसुन राहते त्याला लगटुन... गाज ऐकता ऐकता तिच्या मिटल्या डोळ्यांतुन पाणी वाहु लागतं.... क्षणार्धात लाटा तिला आपल्याजवळ खेचुन घेतात. माणसांच्या जगात माझं कोणी नसलं तरी माझा सखा माझ्याजवळ आहे हे ती जाणून असते... तिचा सखा तिचं सारं काही ऐकुन घेतो. तिच्या दुखल्या-खुपल्या मनाला गाजेचं मलम लावतो... खार्‍या वार्‍याची फुंकर घालतो. तिचा सखा तिला व्यवहारी कोरड्या माणसांच्या जगात अलिप्त राहायला शिकवतो.
.
.
.
.
.

आता मात्र तिला माणसांचं जग नकोच आहे. तिला ओढ लागलीय तिच्या सख्याची... तिची आजवरची सारी गुपितं त्याच्याच पोटात तर आहेत. तिचे आसु त्यानेच तर आपल्या लाटांकरवी पुसलेत. पण ती मात्र आता बेभान झालीय, उन्मुक्त... आसुसलीय... बेफाट, बेताल वागतेय.... तिचा सखा, तिचा समुद्र तिला सर्वार्थाने तिच्याजवळ हवाय... तो मात्र ओहोटीला जाऊन आयुष्यात अलिप्त राहायला शिकवतोय... भरतीला येऊन तिला काठाजवळ सोडतोय, तिच्या माणसांच्या जगात....







एका रात्री... 
ती अशीच बेभान होते... बसते तिच्या सख्याला लगटुन.. अंधाराची गोधडी पांघरुन तिच्या सख्यामध्ये अलगद एकरुप होऊन जाते.

तोही तसाच उधाणलेल्या लाटांनी घट्ट कवळुन घेतो तिला स्वत:जवळ...


दुसर्‍या पहाटे...
तिचं तृप्त, थकलं-भागलं शरीर सापडतं किनार्‍यावर.
लोक म्हणतात, काल रात्री समुद्राच्या लाटा खवळलेल्या... एक वेडी मुलगी त्यात बुडुन मेली...


व्यवहारी जगाने इतकीच दखल घेतलेली... बस्स! इतकंच...

खरं नादीष्ट कोण ते तिच्या सख्यालाच माहिती !