Always Ask yourself ... Why ?

दरवर्षी श्रावण सुरु झाला की मला पुढे येऊ घातलेल्या संकटांची चाहुल लागते... दरवर्षागणिक मुर्तिपुजेवरचा वाढता विश्वास (की अंध-विश्वास??) पाहुन मन अस्वस्थ होत असतं आणि त्यात प्रत्येक श्रावणी सोमवारपासुन पार दिवाळी संपेपर्यंत कानठळ्या बसवणारे आवाज ऐकावे लागतात. जैवतत्रंज्ञान इतकं पुढे गेलंय की अजुन पर्यंत हवं तेव्हा श्रवणक्षमता बंद करायची सोय माणसाने का केली नाही अशी चिडचिड होत राहते. प्रत्येक छोटा सण साजरा करणं हे नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. पण त्यात तुम्ही कसं सेलिब्रेट केलं आणि आम्ही किती मोठ्ठं सेलिब्रेशन केलं ह्यातच धन्यता मानणारे लोक पाहिले की मला त्यांची दयाच येते. पण हे असं का होतंय?? लोकांचा स्वत:वरचा विश्वास इतका का उडत चाललाय? भाग्योदय होणार्‍या अंगठ्या, लॉकेटस आणि बाबा-महाराजरुपी देवाचे सॉ कॉल्ड दलाल यांना आजकाल भलतंच महत्व येऊ लागलंय... बरं तर बरं. या विरुध्द काही बोलणंदेखील मोठ्या विवेकनिष्ठ विचारी लोकांना धोक्याचं होतं आहे... तेथे सामान्य लोकांची काय पत्रास ! या देवाच्या बाजाराविरुध्द कोणी जाहीर टिका केली रे केली की एकतर ती व्यक्ती जगातुनच गायब होते किंवा तिला देशद्रोही ठरवुन स्वत:च गायब व्हायला भाग पाडलं जातंय... आणि हे हळुवारपणे भिनत जाणारं विष आहे हेदेखील लोकांच्या लक्षात येत नाहीय.

वैयक्तिकरित्या मी कधीच मुर्तिपुजेवर विश्वास ठेवला नाही. ठेवु शकणार नाही. ज्याला लोक नियती, नशीब, देव, अल्ला, कुंडलीत असणारे ग्रह असं काय वाट्टेल त्या नावाने ओळखतात त्याला मी निसर्ग या नावाने ओळखते... जगात प्रत्येक माणसात खरंतर प्रत्येक सजीवात पाच तत्व आहेत आणि त्या पाच तत्वांमधला समतोल बिघडला की वाईट परिस्थिती निर्माण होते. बस्स! हे आणि इतकंच माझ्यापुरतं शाश्वत सत्य आहे. असणार आहे. उदाहरणार्थ, (१) निसर्गातलं एकत्रित असं जलतत्त्व विषम पध्दतीने विभागलं गेलं की एका जागी पुर येतात आणि दुसर्‍या ठिकाणी दुष्काळ पडतो. (२) कामाचा अतिताण घेऊन सतत एसी मध्ये बसणार्‍या लोकांची कायम तक्रार असते की सर्दी आणि अ‍ॅसिडिटी एकदमच कशी होते ते समजत नाही बुवा.. मानवी शरीरातील अग्नीतत्वाचा अतिरेक झाला की पित्त वाढतं. अ‍ॅसिडिटी वगैरे होते. नेमका त्यावर उपाय न करता इनो सारखं काहीतरी पोटात ढकलुन परत अबर-चबर खाणारी लोकं अनेक आहेत.

माणसाच्या शरीरामधल्या पाच तत्त्वांचा समतोल सतत ढासळत राहिला की शरीरात असणार्‍या पाचव्या तत्त्वावर-आकाश तत्वावर याचा परीणाम होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर आकाश तत्व विचार शक्तीचं प्रतीक मानलं जातं... म्हणजेच माणुस आपली विवेकनिष्ठ विचारशक्ती गमावण्याच्या दिशेने वाटचाल करु लागतो आणि एकतर त्याच्या स्वभावात आणि कृतीत टोकाची दानवता (म्हणजे हिंसक माथेफिरु वृत्ती) दिसते किंवा टोकाचं देवत्व (म्हणजे अतिचांगुलपणा, भाबडा आदर्शवाद वगैरे) तसं दोन्हीही वाईटच... अशी लोक “संवेदनशील असणं” किंवा आपण एखादी कृती करण्यामागचं कारण शोधायचंच विसरुन बसतात... नेमकं माझ्या आजु-बाजुला हेच होताना दिसतंय... चार लोक करतात म्हणुन आपण करायचं असं काहीसं करत राहतात. नाहीतरी आज तिशी-चाळीशीमधे असलेल्या आमच्या पिढीला आमच्या आई-बापांनी पढवुन ठेवलेलंच आहे... हे असंच करायचं असतं... नाहीतर बाप्पा कान कापेल हा... “बाप्पा कान कापेल” ह्या वाक्यातुनच प्रत्येक मुलाची मुर्तिपुजेवरची आणि आपल्या निरर्थक परंपरा पाळण्यावरची श्रध्दा बळकट होत जाते आणि तो हळुहळु देवस्थानांची तुंबडी भरायच्या मागे लागतो.

मुळात लोकांना घरामध्ये चार-चार मुर्ती असताना वेगळं देऊळ लागतंच कशाला हा मला पडलेला साधा प्रश्न आहे.... यावर मला अनेकांनी उत्तर दिलं की देवळात गेलं की शांत समाधानी वाटतं. ह्या उत्तराने मी अजुनच गोंधळात पडलेय... म्हणजे तुम्हांला तुमच्या घरात समाधानी वाटत नाही का... तर म्हणे घरात टीव्हीचे आवाज -स्वयंपाकघराचे वास वगैरे असतात.. देवळात शांतता असते.. अगदीच पैशाने गरीब असणारी देवळं वगळता सगळ्या मोठ्या देवस्थानांमध्ये प्रचंड कोलाहल असतो... पुजारी हाकलुन लावतात ते दृष्य पाहुन तर मला घाटामध्ये शेळ्या-बकर्‍यांचे कळप हाकलणारे गुराखी लोक आठवतात कायमच. हे मनाने शांत समाधानी असणं हे स्वत:च्या मानसिक ताकदीवर पुर्णत: अवलंबुन असतं.

तशीच एक निरर्थक परंपरा म्हणजे पाळीच्या दिवसांत देवाजवळ न जाणं.... एकीकडे स्त्रियांनी या चार दिवसात देवघराजवळ जाऊ नये हा नियम पुर्वीच्या काळात बायकांना चार दिवस सक्तीची विश्रांती मिळावी ह्यासाठी होता हे मान्य केलं तरी आजही हेच तथाकथित बुध्दीवादी हेच तर्कट पुढे करतात. पाळीच्या दिवसात माझी उपासना करु नका असं कोणता देव आणि कशाप्रकारे ह्या परंपरावादी बायकांना सांगतो, हे माझं कुतुहल आहे. स्त्रियांची पाळी ठराविक कालावधीमध्ये आली नाही तर ती स्वत:च्या गर्भाशयात गर्भ रुजवु शकत नाही. शरीरात होणार्‍या अंतर्गत या प्रक्रियेमुळे एका नवीन जीवाचा जन्म होण्यास मदत होते तीच प्रक्रिया हे धर्ममांतंड अपवित्र का मानतात?
तोच प्रकार पत्रिकेवर अतिविश्वास ठेवुन अंतराळात असणार्‍या कोणत्यातरी ग्रहस्थितीवरुन आपल्या आयुष्यातले प्रश्न सोडवायला बघणं. देव कायम आपल्या भल्याचाच विचार करतो असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे अमुक एक ग्रहस्थिती आहे किंवा साडेसाती आहे किंवा ग्रहण आहे असं असलं की शांत करा, बळी द्या नाहीतर बाप्पा कान कापेल हे ह्या अशा ज्योतिषी नामक जमातीला कसं काय समजतं हे मला न सुटलेलं कोडं आहे. जन्मकुंडल्या पेपर मध्ये पानभर छापुन आणल्या की ह्या समस्याग्रस्त वधु-वरांचं आपापसात अचानक सुखाचा संसार सुरु होतो का या विषयावर रीसर्च करावं ह्या विचारात मी आहे.

ह्याविरुध्द बोलायला गेलं म्हणजे कशाला विषाची परीक्षा बघायला जाताय... न जाणो काही बरं-वाईट घडलं तर ... अपशकुन झाले तर... सरळमार्गी विचारांमध्ये हा असा अपशकुनरुपी अडथळा उभा केला की मग त्या विवेकनिष्ठ विचारसरणीवर ठामपणे टिकुन राहण्याची मोठी कसरतच करावी लागते. नेमक्या त्याच वेळेस रोजच्या कामांमध्ये काहीतरी अडचणी उभ्या राहतात, कधी त्या आपणच भुतकाळात केलेल्या चुकांमुळे असतात किंवा आजुबाजुच्या परिस्थितीमुळे असतात... अशावेळेस हे अपशकुनांचा बागुलबुवा करणारे आपली शब्दशस्त्रं घेऊन सज्ज असतातच... “बघा, मी म्हटलं नव्हतं, परंपरा पाळल्या नाही की असंच होतं.” पाळीचं सोवळं न पाळणारी ती स्त्री अडचणीत असेल तर मग आयतं कोलीतच मिळतं. “अति शिकल्या की बाई असाच विचार करते आणि स्वत:बरोबर घरा-दाराला अडचणीत टाकते.” वगैरे वगैरे वाक्यं सटासटा तोंडातुन बाहेर पडतात. अमक्याचा गंडा बांधा, फलाण्याची अंगठी घाला, तमके उपास करा, देवदेवस्की वगैरे सुरु होतं, प्रत्यक्ष अडचण सोडवणं राहतं बाजुलाच आणि नको त्या ठिकाणी पैसा, वेळ आणि श्रम खर्च होतात. इतकं होऊन अडचण सुटली नाही की, “तुम्ही नास्तिक, या गोष्टींवर श्रध्दा नाही.” असं सहजपणे म्हणता येतं. आर्थिक विवंचनेत माणुस असेल की हमखास या गोष्टींचा आधार घेतला जातो. त्यावेळी सल्ला देणारे अतिअभ्यासु स्वयंघोषित ज्योतिषी मात्र स्वत:ची फी मात्र वाजवुन वसुल करतात.

अशा प्रकारचे अनेक अनुभव मी पाहिले आहेत, अनुभवले आहेत. आणि म्हणुन पाच तत्त्वांचा अभ्यास करणं मला माझी वैयक्तिक गरज वाटायला लागली. आकाश तत्व विचारशक्तीचं प्रतीक आहे. असं मानलं तर ते सतत सकारात्मक विचार करत राहणं आणि हे असं का हा प्रश्न रोजच्या असंख्य तात्कालिक अडचणींना तोंड देताना स्वत:ला विचारत राहणं मी अत्यंत गरजेचं मानते. ह्यासाठी मी हळुहळु बाह्यमन(conscious mind) आणि अंर्तमन (sub-conscious mind) ह्याचा परस्परसंबंध शोधते आहे. हे करत असताना स्वत:च्या अंर्तमनाला सतत सकारात्मक स्वयंसुचना देणं (positive self-talk – Next step self hypnosis) आणि दुसर्‍या कोणी सुचना करणं (Actual hypnosis) ह्यातला फरक मला आता हळुहळु लक्षात येतो आहे.

ह्या विषयी वाचत असताना, आणि त्याच्या आजुबाजुच्या बदलत्या समाजव्यवस्थेशी संबंध लावत असताना मला एक गोष्ट लक्षात आली आणि माझी मलाच गंमत वाटली. हे असे आजुबाजुचे फुकट सल्ले देणारे आधी मुळात स्वत: मनात कुढत असतात म्हणजेच नकारात्मक स्वयंसुचना देत राहतात आणि मग त्या विचारांचं प्रतिबिंब त्यांच्या बाह्यविचारांमध्ये उमटतं. ह्या परिस्थितीमध्ये समोरचा गोंधळलेला असेल तर नकारात्मक भावनेला पटकन प्रतिसाद देतो. आणि आपल्या अपयशाचा भार स्वत: न घेता कोणत्यातरी ग्रहावर सोपवुन मोकळा होतो आणि त्यातुन बाहेर पडायचा मार्ग तो एका अंगठी/लॉकेट वगैरे घालण्यातुन शोधतो... पण जी समोरची व्यक्ती आपल्याला अडचण आल्यावर ती कशा पध्दतीने सोडवायची आहे हा विचार करते म्हणजेच सकारात्मक स्वयंसुचना देत राहते. त्या व्यक्तींवर असे फुकट अतार्किक सल्ल्यांचा परिणाम होत नाही आणि कालांतराने ती अडचण सोडवते देखील किंवा भुतकाळात केलेल्या चुकांमुळे होणार्‍या परिणामांना शांतपणे सामोरं जाते. मग सल्ला देणारी व्यक्तीला मात्र अडचणीतुन मार्ग काढणार्‍या व्यक्तीचा हा शांतपणा बोचत राहतो आणि ती अशावेळेस स्वत:वरच चडफडत राहते, की हे मला का जमत नाही.... आहे की नाही गंमत?

ह्या विचारप्रक्रियेचा अजुन एक पैलु म्हणजे जेव्हा मी सतत सकारात्मक स्वयंसुचना देणं गरजेचं मानलं त्याचा परीणाम माझ्या शरीरावर झाला. फुटकळ सर्दी-ताप-डोकेदुखी, आळस येणं असल्या आजारांचं प्रमाण कमी झालं. जग गेलं तेल लावत, माझी सलग सात तास झोप झाली नाही तर ते जग मला बरं व्ह्यायला मदत करणार नाहीय. हा विचार केल्याने कितीही शारीरिक-मानसिक ताण असला तरी कमीतकमी ६-६.३० तास झोप लागते. शरीरातील इतर चार तत्वांचा समतोल आपसुकच साधला जातो. त्याचा उलट फायदा अजुनच सकारात्मक राहण्यात होतो.

ह्या सगळ्या विचार प्रक्रियेला मानसशास्त्रातील काही उपचार पध्दतीचा (Rational Emotive & Cognitive-Behaviour Therapy) आधार असावा असंही मला वाटतं... आता त्याविषयी वाचन सुरु करुन शरीरात असणार्‍या तीन (कफ-वात-पित्त) प्रकृतींचा पंचतत्वांशी असणारा संबंध आणि त्याचा समतोल साधण्यासाठी ह्या थेरपीचा मला माझ्यापुरता कसा उपयोग करता येईल हा विचार सुरु आहे..

तात्विक बाजु वगैरे सगळं बाजुला ठेवलं तर व्यावहारीक आयुष्यात मात्र मला आता अशा लोकांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया अनुभवायला मज्जा येते. मात्र कधी कधी उगाचच कोणालातरी अशा परंपरा कशा चांगल्या-वाईट अशी पिन मारायची आणि सतावत राहायचं. पण अशा बोलण्यातुन स्वत:च्या चुकांची स्वत: जबाबदारी घ्या असं सांगायला मला बरं समाधान मिळतं...

2 comments:

  1. अप्रतिम

    ReplyDelete
  2. छानच लिहिलंय. योग्य तेच.

    ReplyDelete