26 August, 2012

आपण परत मागे का जातोय?


आज टिव्हीवरती काकस्पर्शपाहिला... झी टॉकिजचा गाजलेला (की गाजवलेला???) चित्रपट. ज्या लोकांनी जुनं कोकण पाहिलेलं नाही, कथा-कादंबर्‍यांतुन वाचलेलं नाही त्यांच्यासाठी छान छान चित्रीकरण आहे. बाकी आजकाल कोकणाततरी बायका कुठे नऊवारी नेसुन कामं करतात म्हणा. असो. मुद्दा तो नाही. कथा अतार्किक होतीच. कथेचा शेवटही तसाच असणार हे लक्षात आलेलं होतंच... पण तरीही तो अपेक्षेबाहेर अतार्किक झाला. अखेरीस कथेचा नायक हरी म्हणतो... ‘मी कायम तिच्याशी वाईट वागलो. पण तिने माझ्या प्रेमाखातर मी महादेवाला दिलेला शब्द मोडु नये म्हणुन आधीच प्राण सोडला.

कथेचा शेवट असाही होऊ शकतो, ‘महादेव मरतो तेव्हा पिंडाला कावळा शिवला नाही कारण महादेवाचा जीव उमेत अडकला होता... आणि आपल्या भावाने शब्द दिलेला असताना देखील महादेवाचा (म्हणजे त्याच्या आत्म्याचा !!) त्या शब्दावर विश्वास नव्हता. म्हणुनच आपला भाऊ आपल्याला दिलेला शब्द मोडतोय हे समजल्यावर महादेवाच्या आत्म्यानेच उमेला स्वर्गात बोलावुन घेतलं...’ नाहीतरी उमेला काय वाटतंय किंबहुना स्त्रियांना काय वाटतं याला त्या काळी कुठे किंमत होती? मग महादेवाचा आत्मा देखील तसाच विचार करेल नं? मुळात कावळा पिंडाला शिवतो किंवा शिवत नाही याचाच दुसरा अर्थ आत्म्याला विचार करता येतो, त्याला भावना असतात असाही असु शकतो, नव्हे होता आणि आजही आहेच....

आजच्या विज्ञानवादी जगात या अशा आलवणातल्या बायका दाखवण्यामागे, इतर जुन्या रुढी, परंपरा दाखवण्यामागे आणि गाजवण्यामागे (विशेषत: ब्राह्मणांच्या ) नक्की काय अर्थ आहे... या अशा रुढी, परंपरा पाळल्या किंवा मालिका, सिनेमां मधुन गाजवल्या की मगच आपण खरे हिंदुत्ववादी ठरतो का? हिंदुत्वाचा हाच खरा अर्थ आहे का?
हातभर बांगड्या घातल्या, सासु- सुना एकत्र घरात राहिल्या म्हणजेच प्रेम वाढतं हा संदेश मालिकांमधुन का दाखवला जातोय? आज मुंबई मध्ये टीचभर जागेत कोंबुन राहण्यापेक्षा एकाच बिल्डींगमध्ये, एकाच गल्लीत किंवा एकाच गावात दोन वेगवेगळ्या घरांत राहणार्‍या कुंटुबात प्रेम असुच शकत नाही का? काळजी घेतली जाऊच शकत नाही का? ज्यांना शक्य असेल तरी जरूर राहावं पण 300-400 स्क्वे.फुटच्या जागेमध्ये एकत्र राहण्यात काय मजा आहे? आज एकही मालिका किंवा सिनेमा किमान रक्तदानाचं महत्व सांगणारा नाहीय, नेत्रदान, त्वचादान, देहदान वगैरे लांबची गोष्ट आहे... असं का?

चिंता करण्यासारखी गोष्ट आहे!!!

02 August, 2012

वाढदिवस,
दिवाळी नसताना देखील आईकडुन शिकेकाईने धुऊन घेतलेले केस.

वाढदिवस,
आजीने केलेलं मायेचं औक्षण.

वाढदिवस,
मैत्रीणींबरोबर खाल्लेली भेळ.


वाढदिवस,
"अहों" नी आणलेल्या भेटीचं अप्रुप.

वाढदिवस,
"हॅप्पी बत्दे अज्जु" म्हणत गळ्यात पडलेले नाजुक हात.

वाढदिवस,
नचिकेताला भेटण्याची तीव्र होत जाणारी ओढ...

--
मृणाल भिडे.
2 ऑगस्ट 2011

28 July, 2012

प्रेम सुकुन गेलंय
बकुळफुला सारखं,
गंध मात्र दरवळतोय...


मैत्री निष्पर्ण झालीय
ग्रीष्माचा तडाखा सोसत,
वठलेलं खोड मात्र उभंच आहे...


वात्सल्य आटुन गेलंय
दुष्काळाची चाहुल घेत
निवडुंग मात्र बहरतोय ....


भावना जळुन गेल्यात
कापरासारख्या,
राख देखील उरली नाही...

नाती संपुन गेलीत,
आयुष्य संपत आलंय,
अस्तित्वाच्या पाऊलखुणा पुसल्या जातील
एका क्षणात!!

--
मृणाल भिडे
28 जुलै 2012




26 March, 2012

पाउस आता निनादणार नाही.

गच्च भरलेला तो बारावीचा कोचिंग क्लासेस चा छोटा वर्ग... टारगट मुलांमध्ये फेमस असलेला तो शिक्षक (??)  नामक प्राणी... त्याच्या तासाला बसायचं  म्हणजे जीवघेणी शिक्षा असायची. पण अचानक कधीतरी ठरलेला विषय रद्द व्ह्यायचा आणि तो न सांगता उगवायचा... कलटी मारायला पण मिळायचं नाही. त्यादिवशी असंच झालं आणि तो प्राणी उगवला... बाहेर पाउस यायला सुरुवात झालेली... तो वर्गात आल्यावर पोरांनी दंगा केला आज पावसावर आणि तिच्यावर बोला म्हणून.... मी शिस्तीत दुसर्या बाकावर डोक टेकून कानात इअरफोन्स घातले... गाण्याचा आवाज वाढवणार इतक्यात पहिली ओळ कानावर आली... ती गेली तेव्हा पाऊस रिमझिम निनादत होता... या माणसाला हि कविता माहिती असेल ही मला अपेक्षाच नव्हती.. इतके दिवस फक्त पहिल्या दोन ओळी कुठल्यान कुठल्या संदर्भात वाचल्या होत्या.. नकळत इअरफोन्स काढले गेले... आणि डोळे मिटून तल्लीन होऊन ती कविता ऐकली... इथेच ग्रेस नावाच्या वादळाशी झालेली पहिली ओळख..

कविता संपल्यावर मलाच त्यावरती बोलायला लावल... काय बोलले ते आठवत नाही आता... पण ती काळ-वेळ आठवते... आणि क्लास मधून बाहेर पडताना चक्क त्या प्राण्याला मी म्हटलं देखील. मला ह्या कवितेची तुमच्या कडून अपेक्षा नव्हती...  बिचारयाचा चेहरा पडला.. कारण त्या माणसालाही समजलेल कानात इअरफोन्स घालून बसणारी ही एकमेव मुलगी चक्क आज इअरफोन्स काढून बसली होती...

आज हे ग्रेस नावाच वादळ शांत झालंय. कॉलेज च्या दिवसात झपाटल्या सारख्या कविता वाचलेल्या... मध्यंतरी त्यांना बरं नसल्याचं समजलं तेव्हा पुन्हा एकदा त्या कविता वाचायला हव्यात असं ठरवलेलं.. राहूनच गेलं... घर थकलेले संन्यासी... भय इथले संपत नाही... पाऊस कधीचा पडतो (हे माझं अजून एक आवडत गाणं)... अशा अनेक कवितांवर लिहायचं ठरवलेलं... आता मात्र नेट लावून लिहायला हवं... हीच खरी त्यांना आदारांजली ठरेल.. 

24 February, 2012

कौस्तुभ आमटे यांच्या आवाहनाच्या निमित्ताने


14 जानेवारीला ठाण्यात कौस्तुभ आमटे आले होते. दुर्दैवाने माझ्याजवळ कॅमेरा नव्हता त्यामुळे मोबाईल मधल्या रेकॉर्डींगवरच समाधान मानावं लागलं. ऑडिओ क्लिप्सची क्वालिटी फारशी चांगली नाहीय. तरीही सर्व लिंकस इथे देते आहे.

मी काही वर्षापुर्वी आनंदवन प्रकल्पाला भेट दिली तेव्हा आणि त्यानंतरही आजपर्यंत जेव्हा जेव्हा हा विषय निघतो तेव्हा ज्या परस्पर विरोधी प्रतिकिया ऐकायला मिळाल्या... त्या सहजपणे आठवत राहिल्या..... मॅगसेसे पुरस्कार मिळाला तेव्हा मी पेपर मधली बातमी वाचत होते.. आता काय मॅगसेसे मिळालाय न... फंडिंग सुरु होईल. हा सहजोदगार होता बाजुच्या बायकांकडुन आलेला...
त्यानंतर एकदा असंच दुपारचं प्रवास करत असताना सोशल टुरीझमच्या नावाखाली अकरावी-बारावीचा कॅम्प गेला होता बहुधा... दोन शिक्षिका आपापसात क्रारवजा सुरात बोलत होत्या, आम्ही गेलेलो न... प्रकल्प वगैरे सगळं आवडलं... मुलांनी प्रश्नही खुप विचारले...पण जेवण एकदमच साधं होतं ग.. आणि रात्री लाईट वगैरे नाहीत मग जरा रीस्कीच वाटलं ते...काही चावलं वगैरे तर.. एकतर जंगल आजुबाजुला.. (ह्या वाक्यावर मात्र मला हसु आलं... जसं काय ह्यांची भर जंगलांत झोपायची व्यवस्था केलेली अशा सुरात सुरु होतं)

मी स्वतः गेले तेव्हा आनंदवन प्रकल्प आणि ताडोबा अशी एकत्रित सहल(?) होती. पण काही कारणास्तव ताडोबाला जाणं अचानक रद्द करावं लागलं तेव्हाही थोडा नाराजीचा सुर उमटलाच!

खरंतर आज आयटी अथवा तत्सम ठिकाणी काम करणार्‍या आणि लाखोंनी पगार घेणार्‍या आमच्या तरुण पिढीला काहीच कठीण नाहीय... पण देण्याची वृत्ती हवी... ती कुठेतरी कमी पडतेय. आज महारोगी सेवा समिती जो 55 कोटींचा शाश्वत निधी जमा करतेय त्यासाठी ह्या तरुणाईला फक्त 10 हजार रुपयांची मदत करणं सहज शक्य आहे.
माझ्या लेखी हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनाही हक्क आहेच आपल्यासारखं आनंदी आयुष्य जगण्याचा. फक्त त्यांच्या आणि आपल्या आनंदाच्या व्याख्या निराळ्या असतील. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन मदत करा असं नाही म्हणत मी... पण एक महिना मॉल/सिनेमा/ अनावश्यक खरेदी टाळून तो पैसा तिथे द्या बसं इतकीच अपेक्षा आहे. आणि जे कराल ते मनापासुन करा...
आणि ही मदत तुमच्या Corporate Social Responsibility मध्येही बसेल... कारण आज त्यालाही Annual Personal Appraisal मध्ये महत्व आलंय!!
अर्थात सारं काही निराशाजनक नाहीय. कारण 55कोटींच्या सहयोग निधीसाठी आजपर्यंत 13.50 कोटी जमा झालेत...

बस! इतकंच...बाकी जे काही आहे, ते सारं काही कौस्तुभ आमटेंनी आपल्या गप्पांमधुन सांगितलंच आहे...