26 March, 2012

पाउस आता निनादणार नाही.

गच्च भरलेला तो बारावीचा कोचिंग क्लासेस चा छोटा वर्ग... टारगट मुलांमध्ये फेमस असलेला तो शिक्षक (??)  नामक प्राणी... त्याच्या तासाला बसायचं  म्हणजे जीवघेणी शिक्षा असायची. पण अचानक कधीतरी ठरलेला विषय रद्द व्ह्यायचा आणि तो न सांगता उगवायचा... कलटी मारायला पण मिळायचं नाही. त्यादिवशी असंच झालं आणि तो प्राणी उगवला... बाहेर पाउस यायला सुरुवात झालेली... तो वर्गात आल्यावर पोरांनी दंगा केला आज पावसावर आणि तिच्यावर बोला म्हणून.... मी शिस्तीत दुसर्या बाकावर डोक टेकून कानात इअरफोन्स घातले... गाण्याचा आवाज वाढवणार इतक्यात पहिली ओळ कानावर आली... ती गेली तेव्हा पाऊस रिमझिम निनादत होता... या माणसाला हि कविता माहिती असेल ही मला अपेक्षाच नव्हती.. इतके दिवस फक्त पहिल्या दोन ओळी कुठल्यान कुठल्या संदर्भात वाचल्या होत्या.. नकळत इअरफोन्स काढले गेले... आणि डोळे मिटून तल्लीन होऊन ती कविता ऐकली... इथेच ग्रेस नावाच्या वादळाशी झालेली पहिली ओळख..

कविता संपल्यावर मलाच त्यावरती बोलायला लावल... काय बोलले ते आठवत नाही आता... पण ती काळ-वेळ आठवते... आणि क्लास मधून बाहेर पडताना चक्क त्या प्राण्याला मी म्हटलं देखील. मला ह्या कवितेची तुमच्या कडून अपेक्षा नव्हती...  बिचारयाचा चेहरा पडला.. कारण त्या माणसालाही समजलेल कानात इअरफोन्स घालून बसणारी ही एकमेव मुलगी चक्क आज इअरफोन्स काढून बसली होती...

आज हे ग्रेस नावाच वादळ शांत झालंय. कॉलेज च्या दिवसात झपाटल्या सारख्या कविता वाचलेल्या... मध्यंतरी त्यांना बरं नसल्याचं समजलं तेव्हा पुन्हा एकदा त्या कविता वाचायला हव्यात असं ठरवलेलं.. राहूनच गेलं... घर थकलेले संन्यासी... भय इथले संपत नाही... पाऊस कधीचा पडतो (हे माझं अजून एक आवडत गाणं)... अशा अनेक कवितांवर लिहायचं ठरवलेलं... आता मात्र नेट लावून लिहायला हवं... हीच खरी त्यांना आदारांजली ठरेल.. 

3 comments:

 1. खुपदा असे होते, खूप बोलायचे असते अन शब्दच सुचत नाहीत.. खूप लिहायचे असते अन शब्द रुसून बसतात कुठेतरी जाऊन. मृणाल तरीही तू खूप छान लिहिले आहेस. पण एकदा त्याच्या जाण्याने मधेच थांबलेला पाउस पुन्हा संततधार पडायला लागेल आठवणीच्या रुपाने तेंव्हा खूप लिही, आम्हाला तुझे क्रिस्टल क्लीअर त्याच्याविषयीही अजून वाचायचे आहे.

  ReplyDelete
 2. खरं म्हणजे ते कधीही

  अचानकच ठरलं असतं.

  ग्रेसचे हे असं न रिमझिमता

  बंद पडणं !  काही गोष्टी शाश्वत आहेत

  असच आपण गृहीत धरलेलं असतं.

  जसं लता मंगेशकरच गाणं...

  कोजागिरीचा चंद्र....

  अंगावर येणारा आणि अनावर !

  आईचं आपल्या सगळ्या चुका

  मुकाट पोटात घेणं

  आणि वडीलांच

  तेव्हढ्यापुरतं रागावण..

  हे सगळं गृहीतच नसतं का ?
  तसेच होते ग्रेसचे

  कुठेतरी कागदावर गुणगुणत असणे,

  जगणं दिवसेंदिवस शुष्क होत जाताना

  ह्याचे शब्द अधिक आर्द होत जाणं

  वनांची वाळवंटे फुलत जाताना

  ह्याची बाग मात्र दहीवरत राहणं,

  हृदयांचे जीवाश्म बनत असताना

  ह्याचे मात्र सतत गहिवरत जाणे,

  हे किती सरळपणे

  शाश्वत मानू लागलो होतो आपण,

  किती गृहीतच बनले होते हे स्वप्न !
  अन त्याच्या जाण्याची बातमी,

  पाऊस अचानक थांबावा तशी !

  सगळं भावविश्वच डीमिमिस्टीफाय करणारी !
  आता खरचं पाऊस थांबलाय,

  कदाचीत तो नंतर सुरूही होईल,

  त्याच्या आठवणीमुळे संततधार.  पण आता पाऊस

  निनादणार नाही...... हे मात्र नक्की !
  -श्रीनिवास बेलसरे

  २६ मार्च २०१२

  ReplyDelete
 3. पोस्ट आवडली.

  आपण ग्रंथपाल आहात का ?

  ReplyDelete