13 April, 2016

भोग

वय वर्षे ??? अं .... काहीही... लहानच आहे पण ती वयात आलेली आहे इतकं पुरेसं आहे. तिच्यानंतरच्या अजुन तिघी... दिसायला तशी बारीकच पण हवी तिथे आणि हवी तशी भरलेली. लोकांनी दिलेल्या ढगळ कपड्यांतुनही ते दिसतंच की वखवखलेल्या नजरांना... आई-बापांच्या जिवाला नस्ता घोर ! मनाने काहीशी अल्लड, लोकांच्या भाषेत अकलेने कमी.

अशातच दुरच्या गावी लग्न ठरलं तिचं. दोन दिर आणि रोजचा आला-गेला... आई-बाप अकाली गेले होते. बिच्चारी तिघं मुलं एकमेकांच्या आधारानेच वाढली. पण एकुणातच भरगच्च कुटुंब(?) तिच्या मनात प्रसंगाला साजेशी उलघाल...

दिवस उजाडला... लग्न लागलं... आणि दिवस मावळला... रात्र आली.


स्वत:शीच लाजत, स्वत:ला जमेल तसं मेहनतीने शृंगार केला. खोलीत आली. खिडकीशी उभी राहिली... पावलं वाजली... दणकट हात पडला... केलेला शृंगार ओरबाडुन काढत हवं तसं ओरबाडलंन त्याने. सारं काही मिळुन काही मिनिटंच... झाल्या प्रकाराने ती हादरलीच. अंगावरच्या कपड्याचं भान केव्हाच सुटलेलं... तो बाहेर गेलेला तिला समजलं पण डोळे देखील उघडुन बघावं इतकीही ताकद नव्हती...



आणि पुन्हा पावलं वाजली... काहीसं भान आलेली ती कपडे सावरणार तोच पुन्हा.... पण यावेळचा स्पर्श वेगळा होता. काहीसा अजुनच राकट. थोडा जास्तच वेळ लागला का? पण त्या चेहर्‍याकडे देखील तिला पाहता आलं नाही. शक्तीपात होऊन तशीच पडुन राहिली. रात्र सरत होती. पण संपली नव्हती. ती स्फुंदत स्फुंदत खोलीच्या एका कोपर्‍यात बसुन राहिली.



बराच वेळ गेला. पुन्हा पावलं वाजली. मान वर करुन बघण्याऐवजी तिने अजुनच पाय जवळ घेतले. हात गुढघ्यांजवळ घट्ट बांधले. आणि मान खाली खुपसली. जणु काही असं केल्याने जवळ येणारी पावलं दुर जाणार होती. तिच्या उघड्या खाद्यांना हातांचा स्पर्श झाला. हा अजुनच निराळा !!! त्या हातांनी तिला धरुन उभं केलं, जणु पडलेली वस्तु उभी करावी अगदी सहजच असं. मग पुन्हा तेच... पण यानंतर थोडं वेगळं काही झालं. त्याने मग तिला समोर बसवलं. तिच्या गालांमध्ये कडक बोटं रुतवुन तो बर्फासारखा थंड आणि धारदार आवाज इतकंच म्हणाला.



“कुठे बोलशील तर मरशील. याचसाठी आलीस तु. लक्षात ठेव, तुझ्यानंतर अजुन तिघी आहेत. आणि हो, दिवसा आमच्या पोटा-पाण्याचं बघा.”

1 comment: