13 April, 2016

सभ्य (?)स्नेहाला आपल्या बुध्दीमत्तेचा तसा सुप्त अहंकारच होता. कधीतरी तो शब्दांतुन व्यक्त व्हायचादेखील. तयार होता होता ती नकळत पुन्हा स्वत:कडे पाहत राहिली.

...

लहानपणी काळा-सावळा रंग आणि उंच मान यामुळे अनेक नावांनी तिला चिडवायचे ते आठवुन तिचंच तिला हसु आलं. आणि आज... आज तिच्या कॉर्पोरेट विश्वात तिला जरा बाचकुनच असतात. आई-बाबांच्या रोजच्या कटकटीमुळे तिने बर्‍याच ठिकाणी अर्थातच ऑनलाईन नाव नोंदवलं होतं आणि अधुन मधुन जमेल तसं मुलांना भेटायचं कामही करत होती. अशातच तिला त्याचं नाव दिसलं. अमृत ! नाव असलेल्या कंपनीत नोकरी करुन पोटा-पाण्यापुरतं कमवत होता. स्वत:चं घर होतं. बाकी सारेच रकाने रिकामे होते. जात-धर्म आणि आई- बाबांच्या रकान्यात मात्र “नॉट अ‍ॅप्लिकेबल” होता. तिला कुतुहुल वाटुन तिने त्याचा स्वत:विषयीचा रकाना वाचला. तिथे फक्त एक ओळ होती. “मुलगी कोणत्याही जाती-धर्माची चालेल.” तिचं कुतुहल अजुन चाळवलं गेलं. तिने त्याला फोन लावला आणि स्वत:बद्दल जुजबी बोलुन घाईने आपण भेटुयात का असंच विचारलं. जागा-वेळ ठरली.

...

आईची हाक ऐकायला आली आणि ती भानावर आली. घाई-घाईने निघुन ती कॉफीशॉपमध्ये पोचली. अमृत आलाच. त्याला ती क्षणभर पाहतच राहिली. रापलेला ओबड-धोबड चेहरा, हॅंगरला अडकवावा तसा धुवट टी-शर्ट आणि तशीच जिन्स, लक्षात येण्याजोगी कमी उंची आणि अतिशय कृश अंगकाठी... त्याला बहुदा अशा नजरेची सवय असावी. ‘अगदीच पाप्याचं पितर आहे हा. सांगितलेली पगाराची रक्कम तरी खरी असेल का?’ तिच्या मनात आलं. पुढच्या औपचारीक गप्पांमध्ये तो अनाथ आहे आणि काहीसा चाचरत, इकडे-तिकडे बघत बोलतो हेही तिच्या लक्षात आलं. अखेरीस इतका वेळ दाबुन ठेवलेला प्रश्न तिने विचारलाच. “पण अमृत, समजायला लागलं आणि तु आश्रमातुन बाहेर पडलास. मग तु इतका मोठ्ठा कसा झालास? शिक्षण वगैरे?”
प्रश्नामागचा तिचा काहीसा खोचक स्वर त्याला उमजला. तो चमकला. मनात उसळलेल्या अनेक भावनांवर ताबा ठेवत शक्य तितक्या स्थिर ठाम आवाजात म्हणाला, “रस्त्यावर कुत्र्यांची पिल्लं जन्माला येतात आणि मोठी होतात. कोणाचं लक्ष देखील जात नाही त्यांच्याकडे. थेट बोलायचं तर लहान अर्भकाला वेळेवर दुध-पाणी मिळालं तर तेही मोठं होतंच. निसर्गनियम आहे हा.” खाडकन मुस्काटात बसल्यासारखी ती बसुन राहिली. क्षणभराने भानावर आली तेव्हा अमृत समोर नव्हता. पण त्याने दोघांच्या कॉफीचे पैसे दिले होते आणि स्नेहाच्या सभ्य म्हणवल्या जाणार्‍या समाजाचा नियम पाळला होता.

2 comments:

  1. अतिशय ह्रुदय निवेदन. सुन्दर कथा. अगदी थोड्या शबदातही सगळा आशय पोहोचविण्याची क्षमता कौतुकास्पद. शेवटचे वाक्य तर वाचकालाही एक तडाखा देतेच. रेटिंग ***

    ReplyDelete