05 August, 2010

पुनाखा गाव (दोचु-ला पास मार्गे)


सकाळी 9.30 वाजता पुनाखाला जायला निघालो. वाटेत दोचु-ला पास लागलं.दोचु-ला पास इथे एक मुख्य बुध्द मंदीर आणि इतर 108 मंदिरांचा समुह आहे. इथुन हवामान स्वच्छ असताना बर्फाच्छादीत शिखरांचे दर्शन होते. तेथुनच पुढे पुनाखा गाव आहे. आम्ही तिथे असताना समोरच्या दरीत पुर्ण धुकं असल्याने आम्हांला एकही शिखर दिसलं नाही. पण धुक्यात गुरफटलेला दोचु-ला पास पहाणं हा एक सुंदर अनुभव होता. तिथुन खुप वेळ हलावसं वाटतच नव्हतं.




पुनाखा येथे एक अतिशय छान असा 16व्या शतकातील किल्ला आहे. हा किल्ला एका बेटासदृश ठिकाणी बांधलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजुंनी फ़ोचु आणि मोचु या दोन नद्या वाहतात आणि थोडं पुढे जाऊन त्यांचा संगम आहे. त्यापैकी एका नदीवर मोठा पुल असुन त्या पुलावरुन ह्या किल्ल्यात प्रवेश करता येतो. पुनाखा किल्ल्याच्या आतील बाजुला छताला, आधाराच्या खांबाला सर्वत्र सोन्याचा मुलामा दिलेला आहे आणि त्यावर भुतानी आणि बुध्द शैलीतील कोरीव काम आहे. पुनाखा मधुन बाहेर पडुन परत थिम्फुला येईपर्यंत संध्याकाळ झाली. थिम्फुला आल्यावर परत एकदा भाजीबाजार आणि कापडबाजाराला भेट दिली आणि मग संध्याकाळी थोडीफार खरेदी केली.

01 August, 2010

राष्ट्रीय संग्रहालय (पारो) आणि थिंफुचा भाजीबाजार

28 तारखेला सकाळी राष्ट्रीय संग्रहालय पाहीलं. भुतान राष्ट्रीय संग्रहालयाची गोलाकार आणि 6 मजली इमारत(बिल्डींग) बाहेरुन एकदम साधी पण आतुन मात्र लाकडावरील कोरीवकामाने नटलेली आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. टेकडीच्या उताराचा कल्पक रीतीने उपयोग करुन घेतल्याने संग्रहालयाची वास्तु बाहेरुन पहाताना भव्य वगैरे वाटत नाही. संग्रहालयात आपण प्रवेशच मुळात तिसर्‍या मजल्यावरुन करतो. तिसर्‍या मजल्यावर प्राचीन वस्तु, निरनिराळ्या समारंभ प्रसंगी वापरायचे आणि निरनिराळ्या प्रांतातील भुतानी वेशभुषेचे प्रकार, दागिने, थांगा चित्रशैलीतील भित्तीचित्रे वगैरे आहे. खाली तीन मजले (तळमजला आणि 2 मजले) आणि वर तीन मजले आहेत.

थांगाचित्र शैली, मोठमोठ्या चहाच्या किटल्या, बांबुचे धान्य साठवण्याचे पेटारे, बांबुचीच अनेकविध हत्यारे, धातुची हत्यारे-बंदुका, लहान मुलांचे खेळ, पेंढा भरुन ठेवलेले भुतानी प्राणी-पक्षी, प्राचीन बुध्द मुर्ती आणि इतर असंख्य बुध्दरुपे, धार्मिक कार्यासाठी वापरले जाणारी खास वेगळ्या घाटाची भांडी, घंटा आणि इतर वाद्ये, प्राचीन छायाचित्रांचा संग्रह हे सगळं अतिशय सुरेख रीतीने मांडुन ठेवलेलं आहे. याशिवाय भुतानचा स्टँपसंग्रह न चुकवता पहावा असा आहे. जगामध्ये प्रथम भुतानने थ्री डायमेंशनल स्टॅम्प काढला. स्टीलवरचा आणि सिल्कवरचा स्टॅम्प काढला. हे सर्व स्टँपस् माहितीपर टीपा देऊन सुंदर रीतीने जतन केलेले आहेत. संग्रहालयातील स्टॅम्पसमध्ये निरनिराळे पशु-पक्षी, फुले, नेते, जागतिक स्तरावर घडलेल्या महत्वाच्या घटना यांची चित्रे असलेली रंगी-बेरंगी स्टॅम्प होते. याशिवाय हिमालयातील गुढ आकर्षण असलेल्या यतीचा स्टॅम्प (यतीचे काल्पनिक चित्र) पहाण्याजोगा आहे.


थिंफु मध्ये परत...
सकाळी संग्रहालय पाहुन आणि जरावेळ गावात फेरफटका मारुन दुपारी थिंफुला परत आलो. हातात वेळ असल्याने प्रथम पुनाखा या गावी जाण्यासाठी प्रवेश पत्रिका( एन्ट्री पास/ परमिट) करायला गेलो आणि संध्याकाळी आठवडा बाजार पाहायला गेलो. भाजीपाला, कडधान्ये, तांदुळ, डाळी, दुध आणि दुधाचे पदार्थ (फक्त याकचे आणि शेळ्या-मेढ्यांचे दुध), कपडे यांची दुकाने होती. या बाजारासाठी खास एक मजली इमारत बांधली आहे. अर्थातच आजु-बाजुला खास पार्कींगसाठी निराळी सोय आहेच. इमारती मध्ये ऐसपैस कट्टे बांधलेले आहेत. हा बाजार शुक्रवार ते रविवार असा तीन दिवस असतो. आजुबाजुचे शेतकरी माल विक्रीस आणतात. थिंफु व जवळपासच्या परीसरातील स्थानिक आठवड्यासाठी खरेदी करतात. कोणताही आठवडी बाजार पहाणं हीच एक मुळात आनंदाची गोष्ट असते.बहुसंख्य भुतानी भाजी विक्रेत्या बायकांना हिंदी येत नव्हतं. तरीही आमच्या ड्रायव्हरच्या मदतीने त्यांच्यांशी संवाद साधताना मजा येत होती. आणि ड्रायव्हरदेखील उत्साहाने आम्हांला सगळं दाखवत होता. मात्र बाजार पाहायला आम्हांला संध्याकाळ झाल्याने आम्ही कापड बाजारात जास्त फिरलो नाही. ती उणीव आम्ही शेवटच्या दिवशी भरुन काढली.

16 June, 2010

पारोचा मुक्काम

27 तारखेला बुध्दजयंती निमित्त सरकारी सुट्टी होती म्हणुन पुनाखा गावी जाण्यासाठी लागणार्‍या परमिटचं काम होणं शक्य नव्हतं. म्हणुन आदल्याच रात्री प्रोग्राम बदलुन पारो गावी जायचं ठरवलं.थिम्फुच्या अनुभवावरुन आधी राहण्याची सोय लावली. बॅगा टाकल्या. आणि मग भटकायला बाहेर पडलो. तिथे देखील राष्ट्रीय संग्रहालय बंद!! ते दुसर्‍या दिवशी करायचं ठरवुन बाकीची ठिकाणं पाहीली. तत्संग मोनेस्ट्री, किशु मोनेस्ट्री आणि द्रुगयालचा किल्ला पाहण्यासारखं आहे. मुळातच पारो गाव अतिशय सुरेख आणि कमालीचं शांत.
पारो गावात शिरण्यापुर्वी आम्ही पारो गावाला उंचावरुन वळसा घातला आणि उंचावरुनच पारोचा विमानतळ पाहिला. तीन बाजुंना डोंगर आणि एका बाजुला विमानतळाची धावपट्टी आणि त्याला समांतर असा पारो गावातला रस्ता.
त्यावेळेस तेथे सहजच आकाशाकडे लक्ष गेलं असता निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला. सुर्याभोवती रिंग़ण तयार झालं होतं आणि रिंगणातला भाग काळा होता (की तसा भास होत होता माहीत नाही.) आणि रिंगणाबाहेरचं आकाश मात्र छान निळं होतं. फोटोमध्ये ते टिपण्याचा प्रयत्न तितकासा यशस्वी झाला नाही. फोटोत मात्र दोन्ही ठिकाणी आकाश काळं दिसतंय.

तत्संग मोनेस्ट्री ला ‘Tiger’s Nest’ असंही नाव आहे. तीन हजार फुट उंचीवर असलेल्या या चा खडा चढ चढुन जायला कमीत कमी 3 ते 4 तास लागतात. पद्मसंभव स्वामींनी वाघाच्या पाठीवर बसुन भुतानमध्ये प्रवेश केला ती हीच जागा... अशी आख्यायिका आहे. आयुष्यात एकदा तरी ह्याजागी भेट द्यावी अशी भुतानी लोकांची श्रध्दा आहे.

(नाहीतर आपल्याकडचं काशी-बनारस. तिथे जाऊन काय पुण्य लाभतं माहीत नाही. पण चारधामपैकी एक असलेल्या यमनोत्रीला मात्र खरंच आयुष्यात एकदातरी जावं आणि कोणताही दानधर्म न करता, भरपुर फोटो काढुन, सगळा निसर्ग-हिमालय अनुभवुन, तृप्त मनाने परत यावं तरच आयुष्याचं सार्थक होतं!!!) आम्हांला वारंवार यमनोत्रीची आठवण येत होती. हातात फारसा वेळ नसल्याने आणि तितका उत्साह नसल्याने आम्ही आपले उगाच पाऊण-एक तासाचा चढ चढुन गेलो. इकडे तिकडे फेरफटका मारला. आणि परत आलो.


त्यानंतर असंच मजा म्हणुन द्रुग्यालचा किल्ला पाहिला. द्रुग्यालचा शब्दशः अर्थ “Pride of Bhutan” असा आहे. 1600-1651 मध्ये भुतानमध्ये तिबेटबरोबर झालेल्या अनेक लढाया जिंकल्या आणि वर्चस्व निर्माण केले. त्याची आठवण म्हणुन हा किल्ला बांधला अशी माहीती तेथील एका स्थानिक पर्यटकाने दिली. त्यानंतर किशु मोनेस्ट्री पाहिली. अतिशय प्राचीन आणि मोजक्या मोनेस्ट्री पैकी एक आहे. मग मात्र दुपार झाल्यावर आमचा फिरुन पाहण्याचा उत्साह संपत आला आणि पावसानेपण आपले रंग दाखवायला सुरुवात केली. मग हॉटेलवर आलो आणि थोडावेळ आराम केला. बाहेरचा पाऊस थोडा थांबल्यासारखा वाटल्यावर आम्हांला खोलीवर स्वस्थ बसवेना म्हणुन परत संध्याकाळी बाहेर पडलो आणि एक पायी फेरफटका मारुन आलो... मस्त वाटलं... (असं स्वर्गसुख कोणतीही पर्यटक कंपनी देत नाही...)

14 June, 2010

थिम्फु बदलतंय...




ठिकठिकाणी नव्याने होणारी बांधकामं, ड्रील मशीन... कॉक्रींट मिक्सर... आणि कसले कसले शांततेवर ओरखडे उठवणारे आवाज... आणि त्याच वेळेस चारी बाजुंना दिसणार्‍या हिरव्या डोंगररांगा हे काहीसा विरोधाभास असलेलं माझं पहिलं थिम्फु दर्शन!! माझ्या संग्रही असलेल्या 8-10 वर्षापुर्वीच्या प्रवासी कात्रणांवरुन थिम्फु अतिशय शांत देखणं हिरवंगार छोटं शहर असेल असं मला वाटायचं. माझी काहीशी निराशाच झाली. थिम्फु देशाची राजधानी आहे आणि उल्लेखनीय गोष्ट अशी की तिचा नियोजनबध्द विकास होतोय आणि म्हणुनच थिम्फु गावाचा आखीव-रेखीवपणा टिकुन आहे. पण गावाची पुर्वीची शांतता हरवल्यासारखी वाटत होती.



थिम्फुबद्दल.
थिम्फु देशाची राजधानी असल्याकारणाने देशाचा विकास काहीसा याच शहराभोवती केंद्रीत झालाय. इथली हॉटेल्स बर्‍यापैकी महाग आहेत. आम्हांला खोली मिळायलादेखील बराच त्रास झाला. मालबझार रस्त्याच्या दोन्ही बाजुस 1760 हॅन्डीक्राफ्टसची दुकानं आणि वरच्या मजल्यावर हॉटेल्स... याच रस्त्याच्या दुसर्‍या टोकाला आणि याच रस्त्याला समांतर अशा दुसर्‍या रस्त्यावर सरकारी कार्यालयं असा साधा सोपा थिम्फु शहराचा नकाशा!! अर्थात याला बरेच छोटे छोटे उपरस्ते वगैरे आहेतच.. पण तेही फारसं समजायला क़ठीण नाहीय. थिम्फु पायी फिरायला एकदम छान आणि सुरक्षितदेखील... National Handicrafts Museum, Textile Museum, ताज पंचतारांकीत हॉटेल (हॉटेल अर्थातच बाहेरुन), क्लॉक टॉवर चौक, राष्ट्रीय ग्रंथालय आणि पोस्ट ऑफिस पाहण्यासारखं आहे. एकुणएक सगळ्या खाजगी आणि सरकारी कार्यालयांवर/इमारतींवर भुतानी चित्रशैलीचा सुरेख ठसा आहे. अगदी पेट्रोलपंप पण यातुन सुटलेला नाही.

गाडी पार्कींग.
खड्डे नसलेले सरळ आखीव रस्ते... आणि रस्त्यांच्या एका बाजुला सलगपणे खास पार्कींगसाठी ओढलेले पांढरे पट्टे. भुतान देशात फक्त चारचाकी गाड्यांना परवानगी आहे. सायकल, सायकलरिक्क्षा, तीन/सहा आसनी रिक्षा असे बहुविध प्रकार चालवायला तेथे परवानगी नाही. याबाबत माझे निरीक्षण असे की फार पुर्वी सहजपणे गाड्या उपलब्ध होत नसाव्यात. याला कारणं दोन. एक म्हणजे लोकांची तितके पैसे खर्च करण्याची क्षमता नव्हती आणि दुसरं गाड्या परदेशातुन आयात करण्यासाठी भुतान सरकार उत्तेजन देत नसावं. पण बदलत्या जागतिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार त्या उपलब्ध करुन देण्याचा सरकारने निर्णय घेतला तेव्हा सर्वप्रथम रस्त्यांची वाहतुक (म्हणजे वन-वे कुठे आणि टु-वे कुठे) कशी हवी आणि रस्त्यावर येणार्‍या गाड्यांना पार्कींगसाठी जागा हवी याचा विचार करण्यात आला असावा आणि मगच गाड्या विकत घेण्यास उत्तेजन देण्यात आले. आज थिम्फुच्या मालबझार रस्त्यावर वन-वे वाहतुक आहे आणि दुसरी बाजु पुर्णतः पार्कींगसाठी राखुन ठेवली आहे. आणि आखुन दिलेल्या जागेतच गाडी पार्क करणे कायद्याने बंधनकारक आहे. जिथे दोन्ही बाजुंना वाहतुक सुरु असते तेथील रस्ते चांगले रुंद आहेत आणि तेथेही एक बाजु राखुन ठेवली आहे. गाडी विरुध्द दिशेला असेल तर गाडी पुर्ण वळवुन ती पार्कींग च्या रस्त्यावर आणुन तिथे ठेवावी लागते अगदी 5 मिनिटांचं काम असेल तरी. आणि थोड्याफार फरकाने हीच पध्दत सर्व भुतानमधे आहे. (असं आपल्याकडे कधी बरं घडेल???)

आजही ज्या भुतानी लोकांकडे गाडी नाही त्यांच्यासाठी मिनीबसेसची ठराविक वेळेने सेवा आहे आणि ठरलेल्या वेळेस ठरलेली बस येते. (म्हणजे आपल्याकडचा लाल डबा!!पण तो लाल डबा अशी छान सेवा देत नाही हा भाग निराळा). थिम्फु शहरात वेगळी सिटीबस आहे(हिच्याबद्दल फारसं माहीत नाही). पण गाडीचा प्रकार एकच... मिनीबस!! तो तिथे घाटांत चालवायला सोयीस्कर असावा...

अजुन एक चांगली गोष्ट म्हणजे इथल्या ड्रायव्हर्सना सतत हॉर्न वाजवायची सवय नाही. (हे आपल्याकडे होणं अशक्य आहे!!!) आणि हे कायद्याने बंधनकारक देखील आहे. पण त्यांना सवय नाही हे महत्वाचंच!! शिवाय तेथील गाड्यांच्या इजिंनाना सायलेन्सर बसवणं बधंनकारक असावं कारण गाड्या सुसाट वेगात असतील तेव्हा आणि सिग्नलला थांबल्या असतील तेव्हादेखील त्यांचा आवाज येत नव्हता अगदी बाईक असेल तरीसुध्दा जो आपल्याकडे नेहमी येतो.(याच्यात देखील आपल्याकडे सुधारणा होणं अशक्य आहे!!! माझ्याकडे बाईक आहे हे सर्वांना कळायला हवंच आणि आवाज करत नाही ती बाईक कसली...अशी समस्त भारतीय बायकर्सची मनोवृत्ती आहे.मोजके अपवाद असतीलही). यामुळे रात्री उशिरापर्यंत (म्हणजे जास्तीतजास्त 10 पर्यंत) वाहतुकीची वर्दळ असली तरी तिच्या आवाजाचा त्रास असा होतच नाही.

26 तारखेला दुपारी पोचलो त्यादिवशी फारसं काही माहीत नसल्याकारणाने जास्त न फिरता आम्ही मात्र लौकरच जेवुन घेतलं आणि हॉटेलवर परतलो.

11 June, 2010

थिम्फुच्या वाटेवर...



26 तारखेला सकाळी 10 वाजता ग़ाडीने थिम्फुला जायला निघालो. फुंटशोलिंग-थिम्फु प्रवास 5 ते 6 तासाचा आहे. सुरेख निवांत रस्ते... क्षणा क्षणाला बदलत जाणारा निसर्ग यामुळे प्रवास फार मजेचा झाला.. भुतानमध्ये जवळपास 70% भागात वनं राखुन ठेवली आहेत. अर्थात त्याला थोडं धार्मिक कारण आहे. तेथील जनतेची भुतं-खेतं, आत्मे, पुर्नजन्म वगैरे गोष्टीवर श्रध्दा आहे आणि तेथील निसर्गाला हात लावला, गरजेपेक्षा जास्त उपयोग केला तर निसर्गात राहाणारे आत्मे दुखावले जातील अशी जुन्या भुतानी लोकांची भावना आहे. “Gross National Happiness” ही तेथील विकासाची मुलभुत संकल्पना मानली जाते. पैशापेक्षा आत्मिक समाधान महत्वाचे!! आणि याच भावनेपोटी आज इतर देशांपेक्षा तेथील वनसंपत्ती अजुन तरी टिकुन राहिली आहे. त्याचा प्रत्यय भुतानमध्ये फिरताना जागोजागी आला. सर्वत्र जमिनीवर आणि डोंगरउतारावर असंख्य जातीची झाडं दिसुन आली. बराचसा प्रवास देखील सावलीमधुनच झाला.

भुतान मधील सर्वच रस्ते भारतीय सेना आणि भारतीय सीमा रस्ते संघटना [Border Road organization (BRO)] यांच्या सहकार्याने बांधण्यात आले आहेत. आणि रस्त्यांच्या देखभालीसाठी देखील भारत सरकारची मदत घेतली जाते. घाटांमधुन प्रवास करताना एक महत्वाचा फरक सातत्याने जाणवला. आपल्या इथे घाटांमध्ये रस्ते तयार करताना पार वरपर्यंत झाडं तोडली जातात. कारण काहीही असो... भुतानमध्ये मात्र जितकी गरज आहे तितक्याच उंचीपर्यंत झाडं तोडली आहेत आणि खालच्या भागाला बहुधा सिमेंटचं आणि मोठ्मोठ्या दगडांचा आधार देणारं बांधकाम केलेलं आहे. (बहुधा अशासाठी की चालत्या गाडीतुन पाहिलं असलं कारणाने नीटसं कळलं नाही.) तिथेही चा प्रश्न आहेच. पण तुलनेने तोडलेला भाग लवकर सेट होतो म्हणजे सुरुंगस्फोटामुळे जिथपर्यंत माती ढासळली आहे तितकीच खाली येते असं ड्रायव्हरच्या बोलण्यावरुन ज़ाणवलं याला माझ्या अंदाजाने अजुन एक कारण असेल ते म्हणजे झाडं पार वरपर्यंत तोडली जात नाहीत. परिणामी खालची माती निसटुन जाते पण वरची माती मात्र झाडांची मुळं धरुन ठेवत असावीत. असो...

निसर्गाने भुतानमधलं स्वागत मात्र अप्रतिम केलं... ढगांचे पुंजके... रिपरिपणारा पाऊस...हिरव्यागार डोंगररांगा... असंख्य पक्ष्यांचा किलबिलाट... प्रवासाचा शीण असा जाणवलाच नाही आणि दुपारी 3 च्या सुमारास थिम्फु आलं सुध्दा.