06 September, 2016

जवळीक

‘ह्या अनंताला पण आख्खी कॉलनी सोडुन हेकट्या, खडु आजीचींच जागा सापडली. बाप्पा आजतरी अनंता असु देत रे....’ पुटपुटत, झपाझपा चालत झाडाजवळ आला. दबकत चाहुल घेत पुढे झाला, फांदीआडचं फुल त्याचीच वाट पहात होतं. खुदकन हसु उमललं.


‘आयडु, सगळ्यांना घेतलं बरं का, डब्बा, पाणी आणि अनंता देखील. पण अम्मा रागावली आणि दिसलीच नाही तर? हेडबाईपण जाम सतावतात तिला’

‘आज या पोराच्या हातात फुल नसेल तर त्याला वर्गात बसु देत मगच जाईन मजल्यावर बसायला.’ जाळीआड अधीर नजरेने अम्मा वाट पहात होती.


धडाधडा लांब उड्या मारत चिन्या गेटमधुन आत आला आणि दाराशीच हेडबाईंना धडकला. त्याच्या हाताकडे पाहुन हेडबाईंनी जाळीकडे नजर टाकली आणि हसु दाबीत त्या बाजुला झाल्या.


“माझी आयडु.... अम्मा काय भाषा बोलते कळत नाही पण ती तुझ्यासारखंच गोड हसते आणि मग फुल डोक्यात घालत अगदी तुझ्याचसारखं अनंता बोलते बघ. अनंत नाही... मग ना, कडाकडा बोटं मोडते ते पण तुझ्याचसारखं. मला आपलं सगळं घरच इथे असल्यासारखं वाटतं बघ एकदम त्या राखेच्या खमंग वासासकट.”

पुर्व प्रकाशित: नुक्कड