06 September, 2016

कॅलिडोस्कोप

“उठ आता... मग आवरायला उशीर होईल आणि मग मला घाई करत राहशील... ....”

कानावर शब्द पडत असतात ... घरंगळत असतात.

ब्रशवर टुथपेस्ट लावली जाते, ब्रश तोंडात आणि हॉलमधल्या खुर्चीवर बसुन अर्धमिटल्या डोळ्यांना काळसेकरांचं "पायपीट" दिसतं.... अॅटलास दिसतो...
मनात गाणं वाजत राहतं... “बर्फ़िली सर्दियों मे किसी भी पहाड पर वादी मे गुंजती हुयी, खामोशियां सूने...”

तोंडावर पाण्याचे हबके मारुन उरली-सुरली झोप उडवताना अंग शहारतं आणि गोमुखची हाडं गोठवणारी थंडी आठवते.

घड्याळ मात्र वास्तवाचं भान आणून देतं आणि रोजची लोकल पकडण्याचं युद्ध सुरु होतं.

नेहमीच्या जागी उभं राहायला मिळतं. गर्दीचे धक्के खात असताना बाहेरच्या आकाशाचा निळा तुकडा दिसतो. आणि घारी दिसतात. मन म्हणतं अरेच्च्या ... मुलुंड गेलं सुध्दा. आता विक्रोळी येईलच.. बघु खंड्या दिसतोय का... बरेच दिवसात दिसला नाही.. पण तितक्यात पोपट उडुन जाताना दिसतात आणि अचानक कोकणातली सकाळ आठवते. उतरायचं ठिकाण येईपर्यंत मन कोकणात फिरुन येतं.... जंगलाचा ओला वास, ओले कपडे, काळ्याभोर दगडी मुर्तीसमोर असलेला धुपाचा वास. कौलारु देऊळ, भाताची शेतं, मध्येच उडणारे चतुर...आणि पागोळ्या.
मधुनच निळ्या तुकड्यामध्ये दिसणार्‍या पावसाच्या ढगाला म्हणतं, असाच भेटत राहा अधुन मधुन...


“एक्सक्युज मी, आर यु गेटींग डाऊन नाऊ?”

वास्तवाचं भान येतं. दिवस कामाच्या रगाड्यात संपुन जातो... बाहेर संध्याकाळ झाली हेदेखील कंम्प्युटर सांगतो... नाही म्हणायला शिंजीरच्या जोडीने ठरलेल्या वेळी येऊन आवाजाची चाहुल दिलेली असते... पण तरीही स्क्रीनसमोरुन नजर हलतच नाही... पुन्हा तो ट्रेनचा प्रवास... आणि मग आपल्या स्टेशनवर उतरतानाची गर्दी पाहुन मन मात्र कलकत्त्याच्या हावडा स्टेशनवर उतरतं.

बुद्धी मात्र मनाला खेचुन खेचुन घरी आणते आणि दमलाभागला दिवस संपुन जातो... मिटल्या डोळ्यांत स्वप्नं मात्र छांगु लेकवरुन वाहणार्याल थंडगार वार्‍याची असतात... पिल्लांसाठी शोधुन शोधुन खाणं आणणार्‍या ग्रीन बी-इटरची असतात... आणि थंडीच्या रात्री वांगणीला पाहिलेल्या तार्‍यांचीही असतात...

पुर्वप्रसिद्धी : नुक्कड/बुकहंगामा . कॉम