15 January, 2016

भिगवण... भाग-०२

सकाळी मात्र ५ च्या आधीच जाग आली. इतकी छान उब सोडुन साधं तोंड धुवायचं जिवावर आलेलं. शिवाय कालचा गारेगार अनुभव होताच ! काल बेसिनला पाणी फार गार नव्हतं तरी ते आताही नसेलच असा विचार करण्यात अर्थ नव्हता. आता नक्की बाहेरच्या गारठ्यात तेही गार पडले असणारच. स्वेटर - कानटोपी अंगात ठेवुनच नॅपकीन- ब्रश हातात घेतला आणि बेसिनजवळ आले. अहो आश्चर्यम! आताही पाणी फार गार नव्हतंच. मग मात्र फटाफट ब्रश केला आणि तोंडावर जुजबी पाणी फिरवुन वारा लागायच्या आधीच घाई-घाईने तोंड कोरडं केलं. मग छान वाफाळता चहा हजर होताच. तो सुद्धा हवा असल्यास दोनदा... दिवसाची सुरुवात तर छान झालेली. आज मात्र आम्ही सर्व एका बोटीत बसणार होतो... काळोखातच बोट सुरु झाली... इथपासुन पहाट होईपर्यंतचा प्रवास अद्भुत होता माझ्यासाठी ... !!! विजेच्या वेगाने अनेक विचार मनात येत होते. काही आठवणी जाग्या होत होत्या. पण त्याबद्दल मात्र स्वतंत्रपणे लिहिण्यासारखं आहे.

उजाडता उजाडता आम्ही एका अगदी लहान अशा बेटाजवळ पोहोचलो. तिथे जात असताना मध्येच एका ठिकाणी चक्रवाक (Ruddy Shelduck) आणि राजहंस (Bar Headed Goose) दिसले. मग आम्ही बेटाजवळ आलो. खरंतर ते बेट इतकं विस्तृत (आकाराने मोठे) नसावंच. या वर्षी पाऊस कमी झाल्याने त्या जलाशयातल्या अनेक लहान जागा पाण्याच्या पातळीपेक्षा काहीशा वर आलेल्या. ही बहुतेक त्यापैकीच एक ! तिथे आपल्या इथे अभावानेच दिसणारा, दुर्मिळ असा श्वेतभाल गजहंस* (Greater White Fronted Goose) होता. *या पक्षाला चितमपल्लींच्या शब्द कोशात मराठी प्रतिशब्द नसला तरी याच जातीच्या मात्र लहान आकाराच्या हंसाबद्दल माहिती आहे. त्यातला गुजराती प्रतिशब्द समर्पक वाटला. गुजराती भाषेत ह्या जातीच्या हंसाला “श्वेतभाल गजहंस” असं म्हटलं जातं. आतापर्यंत ह्या जातीची नोंद महाराष्ट्रात केवळ दोन ठिकाणी झाली आहे; अमरावती आणि भिगवण; असं नंतर व्हॉटस अ‍ॅपवरच्या गप्पांमधुन मला समजलं. त्याच्या आजु-बाजुला कालच तोंडओळख झालेले काळ्या डोक्याची केगो (Black-headed Gull) आणि चिमण केगो (‌Pallas Gull) देखील होते. या शिवाय शेकाट्या (Indian Black-winged Stilt) होता. राजहंसांच्या (Bar headed Gooseच्या) जोड्या होत्या. काही ढोकरी/पाणबगळे (Paddybirds) होते. काठाच्या बाजु-बाजुने पण पाण्यातच असे Little stint होते. पाणकावळा (Little Cormorant) होता. या जत्रेत मला खरंतर आधी बराचवेळ तो हंस (White Fronted Goose) काही दिसलाच नाही. अगदी दोन-दोनदा अविनाशकडे त्याची दुर्बिण मागुनही. शेवटी क्लॅरा मॅम माझ्या बरोब्बर मागे उभ्या राहिल्या. ‘तुला ते सगळ्यात शेवटचं झाड दिसतंय? त्याच्या सरळ रेषेत बरोबर खाली जमिनीवर बघ.’ माझ्या कॅमेर्‍याच्या लेन्समधुन मी पाहिलं. पक्षी दिसला, नीट असा नाही पण काय बघायचं ते लक्षात आलं. पुन्हा अविनाशकडुन दुर्बिण घेतली आणि मग मात्र नीटच दिसला मला तो. माझी लेन्स तिथपर्यंत पोचणार नाही हे माहिती असतानादेखील काही फोटो मी घेतलेत. अपेक्षेप्रमाणे ते चांगले आले नाहीच. अजुन एका नवीन आणि दुर्मिळ पक्ष्याची ओळख झाली. माझ्यासाठी हे अनपेक्षित होतं. नीट उजाडल्यावर बाकीच्यांचे फोटो काढुन झाल्यावर आम्ही तिथुन निघालो ते थेट फ्लेमिंगोज पाहायला.

हळुहळु सर्वांचीच पहाट होत होती. कुठे चिमणा कंकर (Glossy Ibis), कुठे टिटवा (Little Ringed Plover). कुठे अजुन काही. असं करत करत अजुन एका लहान बेटाशी येऊन पोहोचलो. तिथे आमचा नावाडी खाली उतरला आणि मासे आणायला गायब झाला. मी आजु-बाजुची गंमत बघत राहिले. आता उडावं की मग असा विचार करत उभे असलेले गायबगळे (Cattle Egrets)होते. ढोक (Open-bill Stork) होते. कोहकाळ (Herons) होते. काठावर जमिनीत चरत असलेला करड्या डोक्याचा धोबी (Yellow Wagtail) दिसला. अजुन एका ठिकाणी पंकोळी पक्षी (Sand Martin) दिसला. पण तो नीट पाहेपर्यंत उडुनही गेला. बोट एकाच जागी स्थिर असल्याने मी कुररी (Indian Whiskered Tern) आणि नदी कुररी (River Tern) चे फोटो काढायचा अयशस्वी प्रयत्न करत होते. तितक्यात आमचा नावाडी अवतीर्ण झाला. बोट पुन्हा पाण्यात ढकलली गेली. पाण्याच्या मध्यावर येताच अविनाशने लांबवर एक-दोन मासे फेकले मात्र; आणि इतका वेळ लांब घिरट्या घालणारे केगो (Gulls) जवळ आले. दोन-पाच मिनिटांनी अविनाशने मासे फेकावेत आणि केगोंनी ते पकडावेत... मासे पकडायची त्यांची गडबड आणि आमची त्यांना कॅमेर्‍यात पकडण्याची धांदल !! हा खेळ बराचवेळ रंगला. त्याच वेळेस रंगीत करकोच्यांनी (Painted Storks) जवळुन दर्शन दिलं. मग फक्त केगो च का, करकोचे का नकोत असा विचार करुन अविनाशने त्यांच्या दिशेला मासे फेकले. एक-दोनदा संधी हुकल्यावर मात्र मग रंगीत करकोच्यांनी देखील ते मासे मटकावले. तेव्हाही मस्तपैकी फोटो काढता आले. करकोच्यांचे फोटो काढत असतानाच मला बोटीच्या मागच्या बाजुला चिमण्या कंकरचा एक थवा (Flock of Glossy Ibis) आणि पांढर्‍या कंकरचा लहान थवा (Flock of Black-Headed Ibis) दिसला. चिमण्या कंकरच्या (Glossy Ibis) पंखांवर असलेली किंचिंतशी हिरव्या रंगांची झाक सकाळच्या कोवळ्या उन्हात सुरेख चमकत होती. सुखनैवपणे पाण्यात लांब-लांब चोची बुडवुन त्यांचा नाष्टा सुरु होता... बोट सावकाश पुढे पुढे सरकत होती. क्षणभर वाटलं हे चित्र असंच राहील आणि आपण त्यांचे जवळुन फोटो घेऊ शकु.... पण हाय !!! जरी ते मन लावुन नाष्टा वगैरे करत असले तरी त्यांचं बरोब्बर आमच्या बोटीकडे लक्ष होतं. बोट जवळ येताच फर्र्... करुन सारे उडुन पुन्हा लांब जाऊन पाण्यात बसले... पण ते लांब असताना काढलेले फोटो अनपेक्षितपणे चांगले आले. अगदी ते उडुन गेले तेव्हा उगवत्या सुर्याच्या पार्श्वभुमीवर त्यांचा उडालेला थवा सुध्दा फोटोमध्ये सुरेख दिसला.

बोट काहीशी पुढे आली... बोटीने डौलदारपणे एक हलकंसं वळण घेतलं. समोर रोहित पक्ष्यांचा थवा (Flock of Greater Flamingos) होता... अहाहा !!! ज्यांच्यासाठी केला होता अट्टहास ते रोहित आमच्यासमोर होते... सुंदर लांब मान, काहीशी मध्यावर मोडल्यासारखी दिसणारी बाकदार लाल चोच, उंचच उंच गुलाबी पाय... आणि तशाच रंगाची पंखांवर खालच्या बाजुस असलेली गुलबट पिसे.... फोटो काढायचं विसरुन कितीतरी वेळ मी फक्त त्यांच्या हालचाली पाहत राहिले. आजु-बाजुला केगोंचा आणि काही इतर पाणपक्ष्यांचा आवाज... बाकी निरव शांतता. सकाळचा कोवळा सुर्यप्रकाश हलके हलके त्यांच्या अंगांवर पसरत होता... आणि त्यांचा गुलाबी-पांढरा रंग अधिकाअधिक खुलुन दिसत होता.... अचानक बोट काहीशी हलली आणि मी भानावर आले. मग जमतील तसे फोटो काढले खरे पण सतत वाटत होतं, फोटो काढण्यापेक्षा यांना हे असं समोरुन न्याह्याळण्यात खरी मजा आहे.

तिथुन परत येताना रंगीत करकोच्यांची (Painted Storks) एक गंमत मला पाहायला मिळाली. त्या जागी बरेच रंगीत करकोचे (Painted Storks) होते त्यापैकी चार करकोचे मात्र शिस्तीत एका रांगेत उभं राहावं तसं आपल्या चोची एकाच दिशेला करुन उभे राहिलेले. फोटो काढेपर्यंत हे वेगवेगळे होणार म्हणुन मी आधी फोटो काढलाच नाही. बोट त्यांच्याच बाजुने जशी पुढे सरकत होती तसं चक्क त्यांनी आपली दिशा बदलली ... मग मात्र मला राहावलं नाही. आता इतका वेळ गप उभ्या असलेल्या करकोच्यांनी तसंच उभं राहावं ना... मध्येच एकाला उडायची हुक्की आली. तो फोटोमध्ये आलाच नाही. आणि दुसरा बहुदा त्याला थांबवायला गेला असावा त्यामुळे त्याचा पहिल्या फोटोत एकच पाय वर उचलला गेलाय. पण बापडा निघुन गेलेला चौथा; आपले साथीदार आले नाहीत म्हणून परत येऊन तिथेच उभा राहिला. मग मी त्याचाही फोटो काढला.

नंतर तो फोटो बघत असतानाही मला स्वत:शीच हसु येत होतं. अशी गंमत-जंमत बघता-बघता बोट काठाशी आली सुध्दा !!! मग क्लॅरा मॅम, नयना अमिन, अविनाश वगैरे लोकांबरोबर जमिनीवरचे पक्षी बघणं सुरु झालं. १५-२० मिनिटं इकडे बघ तिकडे बघ करुन झालं आणि अचानक समोर गाडीच दिसली. खरंतर गाडीत बसुन जायला बर्‍याच जणांची मनं नाखुश होती. पण आपल्याला पोटपुजा करुन अजुन एक-दोन जागा बघायच्या आहेत, चिंकारा बघायचाय असं समजल्यावर गाडीत बसलो.

नाष्टा झाला आणि आम्ही लगेच जलाशयाच्या दुसर्‍या बाजुस गेलो. आधी पोहोचलेल्या काहींना तिथे कवड्या खंड्या (Pied Kingfisher) दिसला. मी पोचेपर्यंत महाराज मासा पकडुन तिथुन गायब झालेले. तिथेच पुढे काठावर छोट्या आर्लींचा थवा (Flock of Small Patrincole/Swallow-Plover) होता. हे खरंतर मोठ्या संख्येने एकत्र राहतात. पण इथे असलेला आर्लींचा थवा कमी पक्ष्यांचा होता. त्यांचे फोटो काढत असतानाच मला दुसर्‍या टोकाशी नदी कुररी (River Tern) दिसली. सतत डोक्यावर घिरट्या घालत असतानाच मी तिला पाहिलेली. त्यामुळे नवीन पक्षी म्हणुन मी फोटो काढला. मात्र नंतर फिल्ड गाईड वरुन ओळख पटवताना ती नदी कुररी (River Tern) च आहे हे लक्षात आलं. मधेच एकटा एक चक्रवाकही (Ruddy Shelduck) दिसला. तो तिथेच होता की कुठे भटकुन इथे आलेला कोण जाणे. मग चिंकारा पाहायला निघालो. चिंकारा बघत असताना छोटा खाटीक (Baybacked Shrike) दिसला, आमच्यातल्या एकाला (बहुतेक मनीष नाव त्याचं.) टोई पोपट (Plumheaded Parakeet) दिसला. नाव वेगळंच आहे असं मनात येत असताना क्लॅरा मॅम नी सांगितलंच, तो टोई-टोई असा आवाज काढुन हाक घालतो म्हणुन त्याचं नाव टोई पोपट ! चिंकारा दिसायला लागले. विस्तीर्ण अशा बाभळीच्या उघड्या माळावर एक नव्हे दोन नव्हे तब्बल आठ-नऊ चिंकारा आम्हांला बघता आले. माणसांचा सावट आला तरी आपल्या लांब पायांनी टणाटण उड्या मारत आत निघुनही गेले. 

सगळं पाहुन होईपर्यंत दुपारचा एक वाजलेला. सर्वांच्याच पोटात भुका लागलेल्या. शिवाय जेऊन लगेच निघायचंदेखील होतं. परत मागे फिरलो. पुन्हा खोलीवर आलो. हात -तोंड धुऊन जेवायला बसलो. टेबलवर देखील तु काय पाहिलं-मी काय पाहिलं ह्याच्या चर्चा रंगल्या. मला वैयक्तिकरित्या आज पाहिलेल्या सर्वच पक्ष्यांची नीट ओळख व्हायची होती. माझ्यासाठी एक शेकाट्या आणि एक गायबगळा वगळता सारेच नवीन होते. मनात पक्ष्यांची आठवण आणि त्यांची नावे यांचा गोंधळ असला तरीदेखील मन तृप्त होतं. भीमाशंकरची ट्रीप काहीशी वायाच गेल्याने ह्या वेळेस मात्र दामदुपटीने मला निरखता आलेलं. प्रत्येकाचा फोटो नसला तरी खुप काही शिकता आलं. ४०-४५ पक्ष्यांची पक्की ओळख पटलेली. आपल्याला कायम घडणार्‍या प्रत्येक पहिल्या गोष्टीचं अप्रुप असतं... कौतुक असतं. इतरांना तो पोरकटपणा वाटला तरी आपल्यासाठी मात्र तो कायमस्वरुपी आनंदाचा ठेवा असतो... तशीच माझी ही भिगवणची सहल... पहिली-वाहिली पक्षीनिरीक्षण भटंकती!

भिगवण - भाग ०१

नोंद: पक्ष्यांच्या मराठी नावांसाठी संदर्भ : पक्षिकोश - लेखक: मारुती चितमपल्ली ; प्रथम आवृत्ती: २००२
Bird List only What I have seen.
1. Asian Openbill
2. Bar-headed Goose
3. Black Drongo
4. Black-headed Gull
5. Black-headed Ibis
6. Black-Shouldered Kite
7. Black-Winged Stilt
8. Brown-headed Gull
9. Cattle Egret
10. Glossy Ibis
11. Greater Flamingo
12. Greater White-fronted Goose
13. Green Bee-eater
14. Grey Heron
15. Indian Cormorant
16. Indian Pond Heron
17. Little Egret
18. Little Ringed Plover
19. Long-tailed Shrike
20. Marsh Sandpiper
21. Northern Shoveller (Male/Female)
22. Paddyfield Pipit
23. Painted Stork
24. Pallas Gull
25. Pied Bushchat
26. River Tern
27. Ruddy Shelduck (Male/Female)
28. Rufous-tailed Lark
29. Spotted Dove
30. Streak throated Swallow
31. Whiskered Tern
32. White-throated Kingfisher
33. Wood Sandpiper
34. Yellow Wagtail
35. Yellow Wattled Lapwing
36. Little Stint
37. Plum-headed Parakeet
38. Common Moorhen
39. Sand Martin

2 comments:

 1. मृणाल, त्या दिवशी मला प्रतिसाद लिहायला वेळ नव्हता. आज थोडा मिळालाय.
  तुझे लेखन चांगलेच आहे. कदाचित् त्याहून चांगले फोटो आहेत. लेखाला फोटोंमुळे ताजेपणा आलेला आहे. पुन्हा पुन्हा वाचून, पाहून स्मरणानंद घ्यावा.
  पक्षी निरीक्षणातून आपण शुध्द निसर्गाच्या जवळ जातो. निसर्गातील घडामोडींचा हा एक पैलू आहे. पक्ष्यांचे जीवन पाहताना नकळत मानवी मन स्वतःच्या वागण्याशी तुलना करू लागते व आपले वागणे कुठल्या वाटेवर चालले आहे, ते कळते. अशा ठिकाणी वावरताना इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या जगापासून आपण किती दूर असतो. इलेक्ट्रॉनिक जग किती घडीव आहे, हे कळते. पक्षी व त्यांचे व्यवहार किती सहज वाटतात.
  मारुती चितमपल्ली हे अगदी योग्य नाव आहे तुझ्या एकंदर अभ्यासासाठी. इतरांना कितीही पोरकटपणा वाटला तरी आपल्याला हवं ते करता येणं महत्त्वाचं.
  इसी बातपर एक शेर अर्ज है-- दुनियाकी निगाहमें भला क्या, बुरा क्या
  ये बोझ अगर दिलसे उतर जाए तो अच्छा..
  ReplyDelete
 2. Very well written .. loved photographs ..

  ReplyDelete