27 June, 2015

Listening to पाऊस with दिल दोस्ती दुनियादारी

...

आता तुच हो पावसाची सर,
आणि बरस माझ्या अंगणात,
आणि अशीच ये तुझ्या आठवणींसारखी,
न सांगता, मी कुठेही गेली तरी !!!
--- रेश्मा


माझ्या काही मित्रांना खुप काही
कविता होत होत्या,त्या काळाची गोष्ट...
...
...
जमाना तो राहिला नाही...
प्रेमकविता, भुर्जीपाव आणि भजी मिळतील फारफार तर नाक्यावर
तुझ्या नावाची...
--- कैवल्य


आता पड, नाहीतर बघ...
...
माझ्या मायच्या शिलाई मशिनीची शप्पथ सांगतोय,
एकएक ढग ...
एकएक ढग शिवुन तुझी मऊ रजई परत देईन तुला
--- आशु


सध्या झी मराठीवर रात्री उशिरा ‘दिल दोस्ती...’ प्रक्षेपित होतेय. अनेक वर्षांनी, ‘पिंपळपान’, ‘प्रपंच’ सारख्या मालिकांनंतर जवळपास त्याच दर्जाची प्रसारीत होणारी ही पहिलीच मालिका आहे. त्यात झी मराठीने ती रात्री १०.३० वाजता दाखवण्याचं (काही अंशी) धाडस आणि (बर्‍याच अंशी) चतुराई दाखवलीय त्याबद्द्ल झी चं कौतुक करायला हवं.
आजच्या तरुणाईचा दिवसभर कामाने पिट्ट्या पडतो. हे लोक बॉसच्या शिव्या खाऊन, रस्त्यावर, गाडी-बस-लोकल मध्ये लोकांशी भांडुन, गर्दीचे धक्के खाऊन घरी पोचतात... त्यावेळेस त्यांना टीव्हीवर राजकारणातल्या मारामार्‍‍या आणि टीव्हीवरच्या सासु-सुने मध्ये काहीही रस नसतो. नेमकी हिच नस ‘झी’ ने पकडली आणि रात्री उशिराच्या वेळेत ‘फ्रेंडस‍’ ला टक्कर देणारी मालिका आणली.

गेले अनेक महिने मी या मालिकेबद्द्ल, कलाकारांबद्द्ल अनेक ठिकाणी वाचतेय. फेसबुक वर हजारोंनी लाईक्स आणि कमेंट्स येताहेत.. मालिकेचा आशय, संवाद, कलाकारांची कामं सगळ्याचीच छान भट्टी जमलीय. पण त्या मालिकेच्या संगीताबद्द्ल खास कौतुक करणारं असं काहीच मी (निदान मी तरी) वाचलं नाही. आजची ही पोस्ट खास “पंकज पडघन” यांच्याबद्द्ल!
‘टिक टिक वाजते(दुनियादारी)...’ या गाण्यापासुन पंकज पडघन यांचं नाव सर्वांना माहिती झालं. तसंच ‘दाद मी मागू कुठं? गा-हाणं नेऊ कुठं”, ‘स्वप्न चालुन...’(क्लासमेट्स) आणि मितवा या (मला माहित असलेल्या) तीन सिनेमासांठी पंकज पडघन यांनी संगीतदिग्दर्शन केलंय. ‘जय मल्हार’ मालिका बघावी कि नाही हा ज्याच्या-त्याच्या भावनेचा मुद्दा असला तरी एक लक्षात घेण्यासारखं म्हणजे मालिकेचं शीर्षकगीत.. ते मात्र सुरेख आहे. साधारण या प्रकारची गीतं लयबध्द करताना संगीतकाराला फारसे प्रयोग करता येत नसावेत. पण तरीही या गाण्यात मात्र ठेका धरावासा वाटतो. ते सहज गुणगुणता येईल असं आहे. असो. जरासं विषयांतर झालं.

दुनियादारी, मितवा, क्लासमेट्स असे लागोपाठ तीन प्रेम, दोस्ती वगैरेंशी संबंधित चित्रपट करुन त्यातील कोणतीही जिंगल/ ट्युन पंकजने ‘दिल,दोस्ती...’ साठी वापरली नाहीय. “दिल,दोस्ती...”चं संगीत अस्सल आहे. सहज गुणगुणता येणारं आहे. सतत ऐकावसं वाटणारं आहे. “दिल,दोस्ती...” चा एकही भाग मी चुकवत नाही हा मुद्दा वेगळा... पण एपिसोडस पाहताना एक लक्षात येतं की, अ‍ॅना -आशु किंवा कोणाच्याही टिंगलीचा मुड असेल की पार्श्व-संगीत मिश्किल असतं. एकदम हलकं-फुलकं!! गंभीर किंवा हळव्या मुडचं असेल (शुध्द मुंबई-मराठीत कोणी सेंटी मारत असेल ! ) तर नेहमीच्या सिग्नेचर ट्युनचाच एक निराळी स्टाईल ऐकायला मिळते... हे सगळं आता सवयीचं होत होतं... पण परवाचा पावसाळी एपिसोड मात्र अप्रतिम झाला. आणि एकाहुन एक सुंदर अशा कवितांबरोबरच पार्श्व-संगीताला पण फुल मार्क्स... !!!! गेल्या आठवड्यात धो-धो पाऊस पडत असताना माझ्या सहज मनात आलं की, “दिल- दोस्ती...”ची सिग्नेचर ट्युन पावसाच्या आवाजाच्या बॅकग्रांऊड वर ऐकायला मज्जा येईल आणि पुढच्याच दोन-तीन दिवसात ‘दिल-दोस्ती’ मध्ये पाऊस पडला... आजपर्यंत “दिल- दोस्ती...” मध्ये न ऐकलेली ट्युन ऐकायला मिळाली. सगळे कविता म्हणत असताना पाठीमागे पाऊस वाजतो आहेच... भिजल्याने सर्वांच्या आवाजात किंचिंत कापरेपणा आलाय तो देखील रेकॉर्ड झालाय. सर्वांच्या कवितेच्या मुडप्रमाणे नेहमी वाजत असणार्‍या ट्युन्स आहेत. पण...

पण आशुची कविता सुरु होण्याआधी नीट लक्ष देऊन ऐकलं तर एक-दोन सेंकदांसाठी काहीच आवाज नाहीय. कविता पुढे सरकत जाते. पार्श्वसंगीत सुरु होतं... आशु म्हणत असतो...‘ आता पड, नाहीतर बघ’... बस्स, इथेच! पुर्ण मुड बदलतो... सलग एका लयीत (बहुदा) सिंथेसायझर वाजत राहतो आणि ठराविक अंतराने ड्रमबीट्स वाजत राहतात... कविता संपते. कोणीच बोलत नाही... फक्त पावसाचा आवाज... थोड्या वेळाने आशुच म्हणतो, ‘नाही, मी ओके आहे...’ आपण भानावर येतो. कैवल्य शायरी म्हणतो. पुढे मिनिटभर नेहमीची हळुवार ट्युन वाजत राहते... आणि मुख्य पाहुणा पाऊस, तो कोसळत राहतो. पावसाचा आवाज ठळक होतो. एपिसोड संपतो...

बस्स! एपिसोड संपला त्याक्षणी काय वाटलं ते शब्दांत व्यक्त करण्यापलिकडचं आहे... हा भाग फक्त ऐकण्याचा होता. बघण्याचा नाही...

मला साधं गाणं सुद्धा सुरात गुणगुणता येत नाही. मोठ्याने म्हणणं तर लांबची गोष्ट. पण मला सुर आवडतात, गाणं ऐकायला आवडतं... आज मी ‘दिल, दोस्ती..’ची जिंगल मनाशी म्हणते.... आणि हेच "डि3" चं यश आहे.


ता.क.: मी ही पोस्ट लिहिली तेव्हा संगीतकार म्हणुन  फक्त 'पंकज पडघन' याचं नाव येत होतं. पण आता मात्र अधुनमधुन 'गंधार संगोराम' याचंही नाव दिसतंय. त्यामुळे शीर्षकगीत एकाने आणि मालिका-भागांमधील (एपिसोडस) जिंगल्स गंधार संगोराम याने केल्या असाव्यात.... (१७-०१-२०१६)

1 comment:

  1. God have blessed you an ear for music....develop it ....

    ReplyDelete