11 June, 2015

दार्जिलिंग

दार्जिलिंगला पोचल्यावर पहिली संध्याकाळ आणि रात्र थंडीशी झगडण्यात गेली. सगळे स्वेटर्स, कानटोप्या, हातमोजे, पायमोजे सटासट बाहेर पडले. आणि एक मोठी बॅग रिकामी झाली. लगेच दुसर्‍या दिवशी थोडी खरेदी करुन ती लगेच भरली म्हणा... नंतर मुंबईला जाताना हे गरम कपडे त्याच बॅगेत (खरेदीसकट) कसे भरायचे हा विचार त्यावेळेस सोयीस्करपणे बाजुला ठेवला.


दुसर्‍या दिवशी पहाटे पाचच्या आधी उठुन टायगर-हिल या ठिकाणी थंडीने कुडकुडत सुर्योदय पाहण्यासाठी पोहोचलो खरे... पण निसर्ग दिसण्याआधी तिथली गर्दी पाहुन निराशा झाली... सगळ्या थंड हवेच्या ठिकाणी असते तशी किचाट गर्दी!! त्या गर्दीतही घुसुन काही छान फोटो काढता आले. थंडगार, सुखद हवा, हातात कॅमेरा... एक चाय हो जाये?, पण इथे कोण चहा देणार आहे आपल्याला... असं मनात यायला आणि समोर देवदुतासारखा चहावाला दिसला... वाफाळता चहा पिताना सुर्योदय पाहायला सुरेख वाटत होतं. सुर्योदय झाल्यावर मात्र पटापट गर्दी ओसरत गेली. आम्ही मात्र तिथेच रेंगाळलो. प्रकाश जसजसा पसरत होता तसतसं डोंगरावर ठिकठिकाणी असलेली चिमुकली घरं दिसत होती.






पुढचा टप्पा होता, बतासिया लूप... निरनिराळ्या युध्दांमध्ये शौर्य गाजवलेल्या आणि मुळच्या दार्जिलिंगच्या डोंगररांगांमधील रहिवासी असलेल्या जवानांचे हे स्मारकस्थळ आहे. इथुनही दार्जिलिंग खुप सुरेख दिसत होतं. बतासिया लूपच्या परीसरात एक जुना रेल्वेट्रॅक दिसला. पुर्वी ट्रेन तिथुन जायची. कालांतराने तो रस्ता बंद करण्यात आला. बतासिया लूप पाहुन झाल्यावर मात्र भुकेची जाणीव झाली. हॉटेल वर येऊन भरपेट नाष्टा केला. थोडा आराम केला. सावकाश १० वाजता पुन्हा फिरायला बाहेर पडलो.



      आता दोन महत्वाची, चुकवु नयेत अशी ठिकाणं पाहायची होती. खुप उत्सुकतेने याबद्दल ठिकठिकाणी वाचलं होतं. एक होतं हिमालयीन गिर्यारोहण संस्था अर्थात (Himalayan Mountaineering Institute -HMI)आणि दुसरं पद्मजा नायडु झूऑलिजिकल पार्क. दोन्ही पाहताना आमचा बराच वेळ गेला. पण तो सार्थकी लागला असंच वाटलं (आज दोन वर्षांनंतर ब्लॉगसाठी लिहिताना पुन्हा जसंच्या तसं सारं आठवतं आहे.)

१) HMI- Himalayan Mountaineering Institute (दार्जिलिंग): १९५३ साली एडमंड हिलरी यांनी तेनझिंग नोर्गे यांच्यासह एव्हरेस्ट शिखर सर केले आणि त्या यशस्वी मोहीमेमुळे तरुणाईला या साहसी खेळप्रकाराबाबत अधिक माहिती व्हावी आणि अधिकाअधिक तरुणाईने पुढे यावे असे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना वाटु लागले. त्यांच्याच प्रोत्साहनाने पुढे १९५४ साली हिमालयीन गिर्यारोहण संस्था हि संस्था स्थापन करण्यात आली. पाठोपाठ १९५७ साली संस्थेच्या परीसरात संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. १९२० साली झालेल्या प्रथम मोहीमेपासुन आजतागायत असलेल्या प्रत्येक मोहिमेपर्यंतचे दस्तऐवज आपल्याला इथे पहाता येतो. विविध आकाराची शिल्पे, जुनी, व दुर्मिळ चित्रे, छायाचित्रे, हस्तलिखिते, फक्त एव्हरेस्ट- शिखर मोहीमच नव्हे तर इतर प्रत्येक महत्त्वाच्या शिखर मोहीमेवेळेस वापरलेली हत्यारे तसेच पोषाख अत्यंत काळजीपुर्वक पध्दतीने संग्रहित केले आहेत. मात्र या संग्रहालयात विदेशी पर्यटकच उत्सुकतेने पाहताना दिसत होते. सर्व परीसर पाहाण्यास आणि त्याच परीसरात असलेली तेनझिंग नोर्गे यांचीसमाधी पहाण्यास कमीत कमी दिड तास हाताशी हवाच...



२) पद्मजा नायडु झूऑलिजिकल पार्क: या पार्कमध्ये तिबेटीयन लांडगे, लाल पांडा, हिम-बिबट्या, सायबेरीयन वाघ यासारख्या दुर्मिळ प्राणी-पक्ष्यांची नैसर्गिकरीत्या संख्या वाढवण्याचे प्रयत्न केले जातात. या शिवाय इथे आम्हांला जंगली मांजर, वाघ, आशियाई अस्वल, हिमालयीन ताहर असे विविध प्रकारचे प्राणी- पक्षी दिसले. साधारणत: पार्क म्हटले की आपल्या डोळ्यांसामोर मुंबईचे संजय गांधी पार्क सारखे विस्तृत जागेवार पसरलेले पार्क येते. त्या तुलनेत हे पार्क मात्र लहान आहे. पण भारतातील अत्युच्च उंचीवर असलेल्या ह्या पार्कमध्ये चढ-उतारावर असलेल्या झाडं-झुडुपं यांची काळजीपुर्वक निगा राखली आहे. पुर्व हिमालयीन रांगांमध्ये आढळुन येणार्‍या तब्बल दहा निरनिराळ्या दुर्मिळ प्राणी-पक्ष्यांचे शक्य तितकं नैसर्गिकरीत्या जतन करुन त्यांची संख्या वाढवणारे भारतातील हे एकमेव प्रजनन केंद्र आहे. चुकवु नये असं हे ठिकाण पाहताना आम्हांला बराच वेळ लागला.  



         पार्क पाहुन येताना पोटोबा कोकलायला लागले त्यांना पायांनी साथ दिली... निमुटपणे  हॉटेलवर आलो, जेवुन थोडावेळ आराम केला. संध्याकाळी चारच्या सुमारास परत बाहेर पडलो. छान पावसाळी उबदार वाटत होतं. असं सुख सोडुन पुन्हा बाहेर जायचं माझ्या जिवावर आलं होतं. पण “पशुपती बाजार” पहायचा ठरला... लगेच अस्मादिक तयार!! पशुपती मार्केट मिरिक लेकला जायच्या रस्त्यावर आहे. तिथुन अगदी एक किलोमीटर अंतरावर भारत- नेपाळ सीमा लागते. त्यामुळे नेपाळ सीमा ओलांडायची मज्जा (भले नावापुरते का असेना आम्ही पण फॉरेन रीटर्न्ड !!) वस्तुंची पारख चांगली असेल तर कधी-कधी कमी किंमतीत छान वस्तु मिळुन जाते. नामांकित विदेशी ब्रॅंडसच्या इलेक्ट्रॉनिक वस्तु, बॅगा, कपडे अशा वस्तुंसाठी हा बाजार प्रसिद्ध आहे. आम्हांला अगदी सहजच उत्तम मात्र आकाराने छोटी दुर्बिण फक्त ७५०-८०० रुपयांमध्ये मिळुन गेली. त्याचबरोबर मी एक “कॅमल मांऊट्नची” बॅकसॅक घेतली. गेली तीन वर्ष रोज उन्हापावसात--लोकलच्या प्रवासात--कशीही वापरुन कुठेही फाटली नाही. ती मात्र घेताना महाग वाटली पण आता मात्र तिचे पैसे पुरते वसुल झालेत. माझ्याबरोबर ती सॅक देखील बरंच फिरली.

      तिथुन अर्ध्या-पाऊण तासात निघुन मिरीक लेकच्या वाटेला लागलो. “मिरीक” चहाच्या मळ्यांत आणि डोंगरउतारावर वसलेलं सुरेख गाव! बरंच काही वाचलं होतं. वाट देखील अप्रतिम... अधुन मधुन नैसर्गिकरीत्या राखलेलं देवदार सारख्या व्रुक्षाचं जंगल. त्यातच मधुन दिसणारी बांबुंची बेटं, पक्ष्यांची किलबिल अहाहा!!! वाटलं... हा रस्ताच इतका सुरेख तर तलावाच्या आसपास काय दृष्य असेल... पण ... भ्रमनिरास झाला. 


       मिरिक खोर्‍याच्या मधोमध असलेलं हे तळं आणि त्याच्या आसपासचा परीसर मात्र अगदीच कसातरी होता... लांबा दुरवर जंगल नजरेस येत होतं. परीसर स्वछ होता, बोंटिगची वगैरे सोय होती. पण तो तलाव बराचसा कृत्रिम होता. त्या तलावाची फारशी निगा राखली गेली नव्हती. तलावाच्या बाजुला मोठं मैदान आहे, त्यापलिकडे इतर टिपिकल पर्यटकी ठिकाणी असतात ती दागिने, कपडे वगैरेची दुकानं आणि त्यातच दोन-तीन चहा-पाण्याची दुकानं. थोडा शीण घालवायला म्हणुन एके ठिकाणी कॉफी घेतली. एका छोटी चक्कर मारली, चार-दोन फ़ोटो काढले आणि निघालोच. परत येताना मात्र एके ठिकाणी चहाच्या मळ्याशेजारी थांबलो. पण अंधार होत होता. कमी प्रकाशात फोटो काढायचा फारसा अनुभव त्यावेळेस नव्हता. पण तरीही काही फोटो चांगले मिळाले. आज दोन वर्षांनंतर ते फोटो पाहताना सर्व प्रवास तंतोतंत डोळ्यासमोर उभा राहतो.


1 comment:

  1. Your photos are equally talkative as your words are....

    ReplyDelete