07 December, 2011

सेल्फ-हेल्प

.... माणसं किती अवास्तव महत्त्व देतात ह्या सेल्फ हेल्प च्या पुस्तकांना.... जसं काही हे पुस्तक वाचलं की लगेच दुसर्‍या दिवशी आपण यशाच्या शिखरावर असणार आहोत असं वाटत असतं. पण त्यासाठी मेहनत करायची मात्र बहुतांशी लोकांची तयारी नसते. न मानसिक, न शारिरीक... आर्थिक वगैरे बाबी फार नंतरच्या गोष्टी!!

आज ह्याच पुस्तकांविषयी! मुळात ही पुस्तकं अशा लोकांसाठी असतात की ज्यांना स्वत:च्या आयुष्याला खरेपणाने सामोरं जाण्याची हिंमत नसते, खरंतर संकटं आणि परीस्थिती माणसाला सगळं शिकवते. पण ते शिकण्याची ताकद हवी. आणि ते त्यावेळेला डोकं शांत ठेवुन समजुन घ्यायला हवं... माणुस निराश केव्हा होतो... जेव्हा त्याच्या हातात काहीच नसतं तेव्हा... पण शंभरपैकी नव्व्याणव वेळा त्याची स्वतःची चुक असतेच. लहान असो किंवा मोठी... आणि म्हणुन त्याच्या हातातुन ते निसटलेलं असतं. हे तो/ती लक्षात घेतो का? मुळात स्वतःची चुक मान्य करतो का?? गरज पडली तर समोरच्या माणसाजवळ... मग तो समोरचा कोणी परीस्थितीवर अवंलबुन असतो. बायको-मुलं/ भाऊ-बहीण/ आई-बाबा/ काका-मामा इथपासुन ते ऑफिसमधला बॉस अगदी शिपाई सुध्दा... गैरसमज झाले असतील तर ते दुर करतो का?? पाया चुकला की कळस हाती कसा लागेल हे तो का लक्षात घेत नाही... आणि स्वतःच्या चुका मान्य केल्या त्यातुन बाहेर पडायचा रस्ताही सापडतोच.

अशी पुस्तकं स्पुन-फिडिंग करतात, सांगतात नेमकं काय करा म्हणजे यशस्वी व्हाल... पण तरीही लोक अयशस्वी का होतात आणि ही पुस्तकं सर्वाधिक खपाची का ठरतात??? संशोधनाचा विषय आहे!! माझ्यामते थोड्या-अधिक फरकाने सगळीच पुस्तकं हेच सांगतात की स्वत:वर विश्वास ठेवा, चुका मान्य करा, काम मन लावुन करा... आणि आयुष्य उत्कटपणे जगा... लोकं अयशस्वी होतात कारण मुळात यांना वाटत असतं ‘हो... हे असं च करायला पाहिजे.’ पण चुका मान्य करायच्या म्हटलं की ह्यांचा इगो आड येतो. मग कामात लक्ष लागत नाही. त्यात पुन्हा नव्याने चुका होतात... दुष्टचक्र सुरु होतं. आयुष्य उत्कटपणे जगायचं म्हणजे नेमकं काय ह्यात ही ह्यांचा गोंधळ उडतो... विकएंडसना मॉलमध्ये जाणं, हजार-पाच हजार उडवणं ह्यात आनंद शोधु पहातात. पण खरंच ह्यातुन आनंद मिळतो? मग सचिन-केसरी सारख्या नामवंत टुर्स बरोबर बाहेर फिरणं... ह्यात पैसा खर्च होतो. नक्की गरज असते का ह्या सगळ्याची? साधं आपल्या परीसराच्या आजुबाजुला फिरणं ह्यांच्यासाठी आनंददायी असु शकत नाही... घरात मुलांबरोबर उश्या-तक्के घेऊन मारामारी करणं, बेसुरं का असेना गाणी म्हणणं.. मुळात आजच्या गॅजेटसना पुर्ण बाजुला ठेवुन बोलणं जमत नाही... स्वतःतल्या ‘मी’ ला पहायला घाबरतात हे लोक. आणि म्हणुन गॅजेटसशिवाय कासावीस होतो ह्यांचा जीव.

मी सेल्फ-हेल्प बुकस च्या विरोधात नाहीय पण हताश झाल्यावर हलकी-फुलकी पुस्तकं वाचली तरी ताजंतवानं वाटतं. आज पुन्हा प्रभाकर पेंढारकरांचं रारंगढांग वाचताना लक्षात आलं. काही पुस्तकं सहजपणे परिस्थितीला सामोरं जायला शिकवतात. त्यापैकीच हे एक पुस्तक. साध्या साध्या वाक्यांमधुन नकळत बरंच काही शिकवणारं, विचार करायला लावणारं हे अप्रतिम पुस्तक!
“...मी कोण? हा विश्वातला सगळ्यात मोठा गहन प्रश्न. स्वतःला पाहणे हाही साक्षात्कार होऊ शकतो. मी हे का करतो या प्रश्नाचे उत्तर शोधणारा माणूस जसा अनावश्यक अनेक गोष्टी करणे टाळतो तसा काही गोष्टी कोणत्याही परिस्थितीत झाल्याच पाहिजेत ह्या निर्धाराने उभे रहायचे ठरवतो. ह्या गोष्टी कोणत्या हा शोध प्रत्येकाने स्वतःच घ्यायचा असतो. त्या एकदा ठरल्या की त्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता झगडणं हाच जीवनाचा उद्देश असतो...”
हा एक... यासारखे असंख्य प्रसंग... सांगता येतील.....

3 comments:

  1. khup kahi patla mala..thanks,i will try to change my habbits...just need ur support..

    ReplyDelete
  2. शेवटचा परिच्छेद खरेच क्लायमॅक्स आहे.आवडला.पण सर्वच बुद्धिवाद्यांनी एक गोष्ट टाळायला हवी असे वाटत आले आहे. जीवन रुक्ष आणि निरस करायची काहीच गरज नाही उलट बुद्धीमुळे ते अधिक रम्यही करता येऊ शकेल. बाकी खुपच छान. वकिलसाहेब !

    ReplyDelete
  3. बुध्दिवादी आयुष्य खरंच रुक्ष आणि निरस जगतात??? उलट असे लोक त्यांच्या जगण्याचा इतरांना हेवा वाटावा इतकं उत्कटपणे जगतात!

    ReplyDelete