14 September, 2025

आज गप्प बसून राहिलो तर पुढच्या पिढीला काय आपण काय देणार?

गेल्या काही दिवसांत सर्जनशील, संवेदनशील आणि सतत तर्काच्या कसोटीवर आपले विचार तपासून घेणाऱ्या लोकांच्या पोस्ट वाचल्या. पॉडकास्ट ऐकलेत. त्यात एका प्रकारची हतबलता आहे. किती दिवस हे फक्त आपण लिहीत राहणार आहोत. बोलत राहणार आहोत. याने काही फरक पडत नाहीय. अशी ती हतबलता आहे. सात्विक संताप आहे. त्यानिमित्ताने ..

विवेकी, सद्सद् बुद्धी आजही जागृत असलेल्या लोकांनी एकत्र यावं, संघटित व्हावं याची गरज दिवसेंदिवस वाढते आहे. विवेकवादी, तर्कनिष्ठ लोक तसे एकेकटेच पडतात. माझ्यासारख्या लोकांना काहीच वावगं खपवून घेता येत नाही. त्यात सगळंच येतं. माणसाच्या सार्वजनिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, राजकीय बाजूतलं सर्वच. जे जे सामान्यतः लोकांना आवडतं त्यावरच प्रश्न उभे करावेत असं सतत मला वाटत असतं.  मेल्यानंतर सगळं इथेच रहाणार; त्यावरुन जिवंत असताना माणसांनी कसलेच घोळ घालू नयेत, हाणामाऱ्या, खून-अत्याचार तर अजिबात करू नये यात वेगळं सांगावं लागायला कशाला पाहिजे असं खुपदा वाटतं.

या *** राजकारणात स्थिर मानसिकतेची, खाऊन पिऊन सुखी आयुष्याची शाश्वती राहिलेली नसताना बायका का म्हणून या पाळी पुढे मागे करायच्या गोळ्या घेतात? जी बाई पहाटे उठून दोन दोन डबे करुन आठ वाजता बाहेर पडत असेल तर ती बाई चार चार दिवसांच्या स्वयंपाकाची तयारी फ्रिजमध्ये ठेवते तर ते शिळं होतं? लगेच तुमच्या घरात भुतं नाचतात??? घराबाहेरचे *** राजकारणी भुतांपेक्षा काय कमी भितीदायक आहेत का? कणीक फ्रिज मध्ये ठेवल्याने यापेक्षा अधिक धोकादायक कुठलं भुत तुमच्या घरात नाचणार आहे? हे एकच उदाहरण झालं, पण सतत अनंत कारणांवरुन कोणाच्या न कोणाच्या भावना दुखावल्या जातात...

मुळात माणसाला घरात देवाची मुर्ती असताना देऊळ हि संकल्पनाच का लागते हा खूप वर्षांपासूनचा माझा प्रश्न आहे. . यावर मी पूर्वीही लिहिले आहे. एकाने त्यावर लिहिलं होतं की पुर्वीच्या काळी चार लोकांना एकत्र यायला जागा हवी. ठीक आहे, काही मिनिटांसाठी आपण हे मान्य करुयात. पण  आजच्या काळात उत्तम कारागीर बोलावून स्थानिक पध्दतीची वास्तुशैली वापरून उत्तम सभागृह उभारावीत. एकत्र येण्यासाठी प्रार्थनास्थळच का? त्या सभागृहात सर्व धर्मातील लोकांनी एकत्र यावं. नृत्य, गायन, संगीत, चित्रकला, वाद्यवादन यांचे नियमित कार्यक्रम करावेत. नाममात्र फी घेऊन मोठमोठी मैदाने सांभाळावीत. तिथे मैदानी खेळ खेळले जावेत. झाडांची जोपासना करावी. वृक्ष म्हणुन पसरले की त्यांना छान लांब, रुंद, ऐसपैस पार बांधावेत. जुन्या वस्तूंची, पुस्तकांची कायमस्वरूपी प्रदर्शन असावीत. हे भविष्यातले स्वप्न रंजन झाले. आज जी मोठेमोठी देवळे आहेत तिथे सरसकट सर्व ठिकाणी असे दर महिन्यातून किमान एक असे बारा महिन्यांचे बारा कार्यक्रम असे कला दर्शनाला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम हवेत. खरे म्हणजे लोकसंख्येचा विचार केलातर आठवड्याला एक कार्यक्रम हवा. तिथेही मोठमोठे वृक्ष पसरलेले हवेत. सार्वजनिक हळदीकुंकू हा पूर्णत: राजकीय अजेंडा आहे. सांस्कृतिक नव्हे. 

Prince of Wales Museum,  Dr. Bhau Daji Lad Museum ICSE किंवा CBSE शाळांच्या ट्रीपमध्ये समाविष्ट केलं जात का?  RBI Monetary Museum, Mumbai सर्वांसाठी खुले आहे, आणि तेही पूर्णपणे मोफत. पण ही साधी माहिती देखील किती शाळांच्या संस्थाचालकांना आहे? दरवर्षी एकाच रिसॉर्टला मुलांना नेलं जातं, पण दरवर्षी संग्रहालयांना न्यावं हा उत्साह किती शाळांमध्ये आहे? संग्रहालयं, जी खऱ्या अर्थाने ज्ञानाचं आणि अनुभवाचं दालन आहेत, त्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. दरवर्षी संग्रहालयांना सहली नेणं ही शाळांची जबाबदारी आहे.

आपल्या भारताच्या परंपरा, दानधर्म, पुजा, नैवेद्य करण्याच्या चालीरीती असंख्य आहेत आणि त्या तशा आहेत म्हणुनच आज हा भारत आहे. गेल्या काही वर्षांपासून जे चालु आहे ते थोडं बाजुला ठेवुन पुर्ण सत्तर ऐंशी वर्षांचा विचार केला तर तो एकमेव निधर्मी आणि सर्वसमावेशक देश होता. भविष्यात असेल का नाही मला माहिती नाही. विविधतेने नटलेल्या या परंपरांचा मला अभिमान आहे ह्या वाक्याचा अर्थ सर्वधर्मीय, सर्वजातीय परंपराचा अभिमान असा होतो. फक्त एकाच विशिष्ठ विचारसरणीच्या चालीरीती नव्हेत. जे अस्सल ग्रामीण भारतीय सण आहेत अर्थातच सर्व धर्मांतले सण; मी महाराष्ट्रापुरतं म्हणेन... तर ते सण, त्या सणांची निर्मिती, मूळ शेतकरी, कुळ यांनी त्यांच्या नैसर्गिक ऋतू, कालचक्र त्यायोगे शेतीविषयक व अलुतेबलुतेदारीच्या कामाच्या विभागणी, सोय आणि सवडीनुसार केलेली आहे. नंतर कालौघात त्यांचं धार्मिकीकरण, व्यापारीकरण करुन व्यवसायिक आणि कर्मठ लोकांनी आर्थिक नफातोट्याची गणितं मांडून आपापलं हित जोपासलं असावं असा एक अंदाज आहे.

डॉ. श्रीराम लागू यांचा "माझं बुध्दी प्रामाण्य" नावाचा जुना लेख आहे.  ते लिहितात, "प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये फरक कुठला असेल, तर माणसाला बुद्धिमत्ता आहे, विचारशक्ती आहे, स्मरणशक्ती आहे. तर प्राण्यात ती नाही. असं सांगतात, माणसाचा चार पंचमांश मेंदू जनावराचा आहे आणि एकपंचमांश मेंदू केवळ माणसाचा आहे. हा माणसात व प्राण्यात असलेला फरक आहे. माणूस आपली विचारशक्ती दुसऱ्या कुणाकडे गहाण टाकतो, तेव्हा तो सबंध माणूसजातीचा अपमान करतो. तो जाणूनबुजून एक बौद्धिक, मानसिक गुलामगिरी पत्करतो. ही गोष्ट फार चिंतेची आहे, असं मला वाटतं. ...  सागराला, सूर्याला नमस्कार करणं हा संस्काराचा भाग आहे. मात्र मी नमस्कार केला नाही, तर अपटीत घडेल, हा श्रद्धेचा भाग झाला. पूजेला माझा विरोध नाही, पण पूजा काही स्वार्थी भावनेनं केली जाते, त्याला माझा विरोध आहे. पूजेला विरोध करण्याचं कारण नाही. त्यामध्ये भावना कुठल्या आहेत, ते महत्त्वाचं आहे. समुद्र ही नियतीची एक शक्ती आहे. ती मला भरपूर देते. त्यावर माझं आयुष्य अवलंबून आहे. आणि असा समुद्र थोडा ओसरला आहे. उद्यापासून माझ्या बोटी मी हाकारणार आहे, तर त्याआधी हा तुला नमस्कार. हा अतिशय सुंदर संस्कार आहे. .. म्हणून पूजा करणं या प्रकाराला माझा विरोध नाही. त्यामागे भावना काय आहे हे महत्त्वाचं आहे. परमेश्वराची पूजा करतात, त्याबद्दल मला आदर आहे. मला तो व्यक्त करावासा वाटतो आणि ती कृतज्ञता व्यक्त करणं, हा सुंदर संस्कार आहे. "

दोन गुणिले दोन चार आणि दोन अधिक दोन चार हे असंच असणार आहे हा गणिताचा नियम आहे. हा नियम ब्राह्मण शिक्षकाने शिकवला म्हणुन बदलणार नाही की मुस्लिम शिक्षकाने शिकवला म्हणुन बदलणार नाहीय. पण सतत एकमेकांच्या धर्माचा, जातींचा तिरस्कार करुन, द्वेषपुर्ण वाक्यं फेसबुक, ट्विटर वर लिहुन कोणतं भविष्य साध्य करु पाहतो आहोत आपण?

आज विशी-तिशीच्या पिढीसमोर AI tools  वापरुन स्वतःला नोकरी धंद्याच्या जगात survive करायचं सर्वात मोठं आव्हान आहे. ह्यासाठी आज चाळीशी- साठीच्या पिढीतील लोकांकडे ती टुल्स वापरायची टेक्निक्स नाहीयेत पण बहुतांशी लोकांकडे विचारांचे तारतम्य आहे. हे तारतम्य कसे वापरायचे हे तरुणांना तुम्ही शिकवा. ती मुलं तुम्हाला टेक्निक्स शिकवतील. तुम्ही जर तिरस्कार पेरत राहिलात तर तरुण मुलांच्या अंगातील उसळत्या उर्जेला धोकादायकच वळण लागेल. आता काय केलं म्हणजे घराबाहेर अतिरेकी धर्माचा विचार घेऊन येणाऱ्या माठ लोकांना समजेल? त्यांच्या डोळ्यांवरची जातीपातीची झापडं गळुन पडतील याचं उत्तर मीही शोधतेच आहे. 

मी माझ्यापुरता मार्ग शोधलाय. आपण या समाजात बौध्दिक आणि मानसिक पातळीवर एकटे नसलो तरी असंघटित आहोत. हे मी स्वतःपुरतं मान्य केलंय. मी नोकरी करत नाही. माझ्या आसपासचे जग लहान आहे पण त्यांच्या डोक्यात भरवुन दिलेल्या उलटसुलट टोकाच्या विचारांबद्दल सतत स्वच्छ शब्दांत न चिडता प्रश्न विचारत राहते. मत मांडत राहते. एका पिढीत होणारे हे बदल नव्हेत. आपल्या आधीच्या पिढीत बदल घडवणे सर्वार्थाने कठीणच आहे. पण चिऊला ह्यांपासून दूर ठेवायचा प्रयत्न करते. तिला अभ्यासाचं, logic and rationality यांचं महत्व लहान लहान प्रसंगातून सांगत राहायचं इतकं मी माझ्यापुरतं सांभाळते. 

कधी जमतं, कधी गप्प बसते.

15 June, 2024

सवाष्ण कादंबरी ( डॉ. क्षमा गोवर्धने-शेलार)

#सवाष्ण

आमच्या काळात अक्कल फुटायच्या वयात रुढार्थाने मुलांच्या हातात पु. ल. देशपांडे, रणजित देसाई वगैरे लेखक हातात दिले जायचे. मला व्यंकटेश माडगूळकर आवडायला लागले. नंतर तुंबाडचे खोत हाती लागलं. गोनीदांचे मृण्मयी वाचलं. या अशा पुस्तकांत वतनदार संस्कृती, ब्राह्मण दलित जातीची उतंरड, सुक्ष्म भेद हे केंद्रस्थानी होते. ठिकठिकाणच्या चालीरिती, परंपरा, बायकांची स्वयंपाकघरापुरती मर्यादित असलेली सत्ता, त्यांची खानदानी आदब, पुरूषांचा बाहेरख्यालीपणा त्यातुन बायकांची होणारी घुसमट बरेच कंगोरे उमगायला लागले. मृण्मयी पुस्तक नायिकाप्रधान आहे. पण गुढ, रहस्यमय नाही. मी वाचलेल्या काही नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी यांच्या गुढकथा/कांदबरी आहेत पण पुरूषसत्ताक संस्कृतीला मध्यभागी ठेवून लिहिल्या गेल्या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर मी नुकतीच वाचलेली #सवाष्ण कादंबरी वेगळी उठून दिसते. म्हटलं तर सरळ सोपी गोष्ट ... ज्यांचं कथा कादंबरी या प्रकारातले वाचन भरपूर आहे त्यांना हि कादंबरी पुढे काय वळणं घेत जाईल याचा अंदाज येऊच शकतो. सहज येऊ शकतो पण ...

पण... हि कथा आहे सर्वार्थाने समाधानी असणाऱ्या "बाजिंदा" ची... आणि तिने वासनांध "नाना"ला दिलेल्या शापाची... सोन्याने मढलेल्या, खानदानी आदब सांभाळून असणाऱ्या सवाष्णींचा घास घेणारा तो शाप ! भरलेले संसार उध्वस्त करणारा तो एक शाप ! 
" या वाड्यात हळद-कुंकवाचे करंडे आ वासून पडून राहतील... "
फक्त एकच प्रकरण तिच्यावर असलेले आणि तरीही तिचं प्रत्येक पानापानांतून जाणवत राहणारं मुक अस्तित्व हि या कादंबरीची खरी नायिका... 

ठिकठिकाणी शापवाणीवर तोडगा फिरत असणाऱ्या दुर्गाआजीला ऐकुन घ्यावं लागलं, "जे पेरलंय तेच उगवणार दुर्गाबाई !!" हि दुसरी नायिका ! नानाची बायको हिरा शापवाणीने जाते पण त्यावर विश्वास न ठेवणारी मध्यमवयीन दुर्गा म्हातारपणी मात्र विजुच्या बायकोला - लताला मात्र कुलदेवीचं अष्टक अखंडित म्हणत शापापासुन जपत राहते... तेव्हा वाड्याचे संस्कार तिच्यात उतरल्याची जाणीव होते.

या सगळ्यात समांतरपणे सुरू होणारी आणि वाड्याच्या भागधेयाशी येऊन थांबणारी विजु-लताची प्रेमकथा. अवखळ लताचं परिपक्व विचारांत रुपांतर होणं याची ही गोष्ट. आपल्या विजुचे प्राण वाचावेत यासाठी तिने केलेले जगावेगळे अग्निदिव्य... हा खरा क्लायमॅक्स !!
हि लता तिसरी नायिका...

तर्क, मानवी विचार, मानसिक परावलंबत्व, अधोगती, अंधश्रद्धा, परंपरा, रितीरिवाज या सर्वाचा परस्परसंबंध दाखवत शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी, वेगवान गावाकडची सुंदर गाणी असणारी ही कादंबरी जरूर वाचावी अशी आहे. 
- मृणाल भिडे (१५ जुन २०२४)

29 April, 2024

अमलताश फिल्म

अमलताश .... पुन्हा एकदा !
 राहुल देशपांडे कलेक्टीव्ह करोनाच्या काळात सुरू झालं. मी बरंच सुरूवातीपासून ते फॉलो करत होते... करते आहे. अचानक फेब्रुवारी महिन्यात "तृषा" गाणं ... अमलताशचे पहिले गाणे आले, ऐकले आणि थरारले... पहिल्यांदा आकर्षण, अचंबा वाटला तो अमलताशच्या फुलांचा उल्लेख गाण्यात. ? प्रकाश नारायण संतांच्या घराचं नाव असलेला अमलताश चक्क गाण्यात? काहीच दिवस फुलून अचानक गायब होणारी हि बहाव्याची घुंगरू वजा फुलं काय म्हणून गाण्यात घ्यावी वाटली असतील? मग एकेक गाणं रिलीज होत गेलं... जोडीला युट्यूब व्हिडीओ कव्हर म्हणून (बहूतेक) water color मधली मयुरेश भायदे समीर कुलकर्णी यांची अप्रतिम illustrations... सिनेमा व्यावसायिक नाही हे तर समजलं होतंच. पण प्रायोगिक नाटकं असतात तसा हा सिनेमा? हा बघायचाच. मी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण ऑडीओ आल्बम स्पोटिफायवर आला. आख्खा दिवस मी "मॅड मॅड मॅड" होऊन तो आल्बम ऐकत राहिले. अगदी ते instrumental pieces ही. 

सतत कुठे रिलीज होतोय कधी रिलीज होतोय याची वाट पाहत होते. "एकदा काय झालं?" सिनेमा मी अशाच आळसापायी चुकवला होता. नंतर तो अजुनही OTT वरही आलेला नाहीय. हा मात्र मी काही झालं तरी चुकवणार नव्हते. म्हणतात न, "पुरी शिद्दत से चाहो तो .. " वगैरे .... तसंच झालं. मी रविवारच्या शो चं तिकीट बुक केलं. थिएटर ला जाऊन जागेवर बसले आणि दीर्घ श्वास घेतला. सिनेमा पाहिला... being a passionate photographer म्हणून तो सिनेमा बेहद आवडला. राहुल देशपांडेची फॅन म्हणून गाणी आवडली. छान त्याच मुडमध्ये तरंगत तरंगत घरी आले.

साधी सोपी (खरंतर चारच ओळीत संपणारी आणि अत्यंत predictable अशी 😉 😀 ) राहुल-किर्तीची प्रेमकथा ... राहुल(राहुल देशपांडे),पवन (भुषण मराठे) आणि त्याचे दोन मित्र अशा चौघांचा Cinnamon Chai नावाचा अस्सल पुणेकरांचा रॉक बँड. आणि दुसरीकडे किर्ती नावाची मुळची भारतीय पण आता कॅनेडियन शेतकरी मुलगी ...

राहुल पुणेकर त्यातही सदाशिवपेठी असल्याकारणाने त्यांचा ऐसपैस स्टुडिओ असुनही गिचमिड जागेत"च" ( च महत्वाचा) रंगणारी jamming sessions... आणि आख्ख्या सिनेमाभर फिरणारे शेंगदाण्याचे लाडुचे हास्यास्पद प्रसंग... ते दाण्याच्या लाडवांचे लाडे लाडे प्रसंग म्हणजे अस्सल रेशमी माहेश्वरीला जुन्या गाऊनची ठिगळं लावल्यासारखे वाटतात. मी तिच्या जागी असते तर दाण्यांची उसाभर करण्यापेक्षा येईल त्या किमतीला दाणे किराणामालाच्या दुकानात विकुन आले असते. तो वेळ दुसरं काही अधिक creative केलं असतं. माझ्यासारख्या नको तितक्या minimalist attitude आणि practical मुलीला ते लाडु खटकलेच. 

तर ते असो.... सिनेमा फक्त दोन कारणांमुळे बघावा.
 1. अप्रतिम अशी सिनेमॅटोग्राफी. तेही तुम्ही जर फोटोग्राफी आणि चित्रकला या दोन्ही कलेच्या बाबतीत aggressively passionate असलात तर आणि तरच हा सिनेमा बघताना तुम्हाला मज्जा येईल. त्या अर्थाने हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहिला त्याचं सार्थक झालं. पुणं हे माझं वैयक्तिक नावडतं असलं तरी शहराच्या प्रेमात असलेली माणसं जेव्हा शहराची फक्त देखणी बाजूच चित्रित करतात तसंच ह्या सिनेमाचं आहे. आणि म्हणुन मी माझी मतं बाजूला ठेवली, मला सिनेमा पाहताना छान वाटलं.

पण. .. लेख लांबेल खरंतर. पण लिहितेच. निम्मा वेळ कॅमेरा पुण्यातल्या रस्त्यावरून आणि खासमखास जागांमधून फिरतो तरीही पुणे शहर एक स्वतंत्र पात्र म्हणुन सिनेमात दिसत नाही. ( In reality Old Pune is itself a good cinematic character. ) सिनेमातली पात्र टिपिकल पुणेरी गोष्टी करतात. उदाहरणार्थ वाडेश्वर भुवन., टेकडीवर जाणे, अमृततुल्य चहा इत्यादी... हे पुणे स्पॉटिंग खुद्द पुणेकरांना कितपत आवडलं असेल कोण जाणे... 

2. राहुल आणि त्यांच्या मित्रांचा बँड कालांतराने बंद झाला असला ( किंवा नाईलाजाने बंद केला असला ) तरी राहुल स्वतः पवनबरोबर वाद्यांचे दुकान चालवतो. बरोबरीने गाणी कंपोझ करणं सुरू असतंच. त्यामुळं संगीत, कविता सिनेमाचा गाभा असला तरी ते हळुवारपणे येत राहतं. अमलताश आल्बम हा एक स्वतंत्र आहे. त्यात असलेली गाणी सिनेमात जशीच्या तशी आलेली नाहीत. शान्ता शेळके यांचे शब्द असलेलं 'सरले सारे तरीही मागे शपथ गळ्याची उरते' हे गाणं आणि मयुरेश वाघ यांचं तृषा हे गाणं फार काळ सोबत राहणार आहे. अमलताश आल्बम ऐकुन सिनेमा बघाल तर भ्रमनिरास होईल. आल्बम जितका श्रवणीय आहे तितक्या ताकदीने कथा उत्तम सुरात, नाट्यमयरित्या पडद्यावर आलेली नाहीय..

आता कथेविषयी... इथे खरंतर फारसं बरं बोलावं असं नाहीय. पण तरीही जे आवडलं तितकंच लिहिते.

बहावा तसा कमी काळासाठी बहरणारा त्यातही सृजनाची चाहूल देणारा वृक्ष मानला जातो. पण बहरतो असा की बघणाऱ्याचा जीव वेडापिसा व्हावा. प्रत्येक पानापानांतून लखलखीत सोनपिवळ्या फुलांचे घोस लटकू लागतात. आणि एकदिवस अचानक बहर ओसरत जातो... बहर ओसरत आला की पावसाची चाहूल लागते. 

राहुल आणि किर्तीची प्रेमकथाही तशीच काहीशी! एका वळणावर दोघे एकत्र येतात. हसतात, गाणी गातात, एकमेकांचे लाड करतात, भरभरून जगतात.. एका कातर क्षणी त्यांना उमगतं हा प्रवास असाच संपणार आहे आणि ... आणि किर्तीला सृजनाची चाहूल लागते. कुठे कॅनडा आणि कुठे सदाशिवपेठ !

जे प्राक्तन आहे, जसं आहे ते स्थितप्रज्ञ राहून स्विकारलेला राहूल पाहताना मीच अस्वस्थ झाले. OT , pre-operative tests मला काही नवीन नाहीत. (इथेही ते शॉट्स विनाकारण लांबवलेत.) मी यातुन गेलेय. मी स्वतः आणि मग आई म्हणुनही ... डोक्यावरचे केस भादरताना पाहणं मला फार रिलेट झालं ... आणि त्याच क्षणार्धात "अमलताश " नावाचा अर्थ काळजात सपकन् घुसला ! खूप कमी वयात मरण जवळून पाहिलेल्या आणि एक स्वल्पविराम आयुष्याला लागल्यावरही पुन्हा उठून उभ्या राहणाऱ्या मला प्रेमाची खुप किंमत आहे. मी निस्वार्थपणे प्रेम करणं हे काय असतं अनुभवलंय आणि हे मी फक्त आज नाही माझ्या पार टीनएजपासुनच्या अनुभवातून म्हणतेय... यात एकतर्फी निखळ प्रेम ते प्रेमाला बसलेले व्यवहाराचे चटके या सगळ्याला हे लागू पडतं. सोबत आणि स्वीकार या दोन्हीकडून मी डील करायला शिकले. अजुनही शिकते आहे. तसंही प्रेमाला व्यवहाराचं, समाजाच्या so called hypocritic बंधनाचं लॉजिक कळत नाही आणि प्रेम करताना फार लॉजिक लावू ही नये. कारण प्रेम करणं ही एकाचवेळी अत्यंत वैयक्तिक आणि वैश्विक गोष्ट आहे. कारण पुर्ण जगात बरंच काही भलंबुरं घडत असताना त्या दोघांच्याच आयुष्यात एक छोटीशीच पण खुप पॉझिटिव्ह गोष्ट होत असते. अशी भावना जी व्यावहारिक पातळीवर ruthlessly competitive आयुष्यात जगायला अर्थ देते.

मी अगदी सुरूवातीला लिहिलंय तसं हे कथानक साधं चार ओळीत संपेल आणि अपेक्षित शेवट असणारं आहे. तरीही हि प्रेमकथा एकाचवेळेस श्वास कोंदुन टाकणारी आहे आणि प्रवाही आहे. असं निखळ, निस्वार्थी प्रेम कि ज्याला कोणत्याही सामाजिक संकेतांचे ओझे नाही की आवश्यकता नाही. प्रेम पूर्णत्वाने न मिळण्याचं दुःख नाही. आणि तरीही वर्तमानात जगत असलेला क्षण उत्कट आहे. जन्म मृत्यूच्या पलिकडचा हा प्रवास आहे.
सिनेमात अनेक रुपकं आहेत, काही कातर, काही अस्फुट काही अबोध क्षण आहेत जे खऱ्या आयुष्यातही असतात असे क्षण फक्त स्पर्श आणि श्वास यांनी भरून काढता येतात. 
You liberate me ...हे फार अर्थपुर्ण गाणं आहे. ज्यांना समुद्र किनाऱ्यावर बसून रहायला आवडतं, शांतता आवडते त्यांना अमलताश आवडेल.

06 March, 2024

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो.

30 December, 2023

Three of us

#movietime 
#moviereview 
#threeofus 
गेल्या काही वर्षांत थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणं खुप कमी झालंय. तरीही मला एकदा कायझालं, सॅमबहादुर, three of us हे असले सिनेमे बघायचे होते. जमलंच नाही. असो. नेटफ्लिक्स वर three of us आल्याचं समजलं. लगेच पाहिला. रिव्ह्यू वाचले नव्हते मुद्दामहून. 

जे करण जोहर, चोप्रा ॲन्ड कंपनी, रोहित शेट्टी ॲन्ड कंपनीचे फॅन्स आहेत त्यांनी हा सिनेमा बघुच नका. 

शैलजा आणि दीपांकर देसाई हे मध्यमवयीन जोडपं. आणि सारीका आणि प्रदीप कामत हे दुसरं जोडपं. या चौघांचेही एकमेकांत असलेले तरल.... उत्कट.... प्रगल्भ .... आणि आणि ... मऊ मऊ उबदार गोधडीसारखं नातेसंबंध ! बास हे इतकंच साधं सोपं आयुष्य होतं... आहे ... असेल यावर विश्वास ठेवायला भाग पडणारा हा सिनेमा. 

शैलजाला विस्मरणाचा आजार जडला आहे. ती अचानक दीपांकरला वेंगुर्ल्याला जाऊया, म्हणून विनवते आणि आठवडाभरासाठी ते जातात. तिथे शैलजाची भेट तिच्या बालमित्राशी - प्रदीप कामतशी होते. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि गतकाळातल्या काही जखमांवरची खपली पुन्हा निघते. उद्गम कविता आणि त्या कवितेचा अर्थ जागोजागी सापडणं हा सिनेमा आहे.

अविनाश अरुण यांचा कॅमेरा चौघांच्या नातेसंबंधांची विचित्र, तरीही अलवार, सुंदर गुंफण टिपत राहतो.
काही संवादातून नात्यात गरजेचा असणारा प्रगल्भपणा दिसतो. 
सारीका मिश्किल पणे प्रदीपला म्हणते, "कवी महोदय, इतक्या वर्षात माझ्यावर कविता लिहावी सुचलं नाही. आज बालपणीचं प्रेम दिसलं तर चार ओळी सुचल्या !" तिच्या या वाक्यावर प्रदीप ज्या उत्कटतेने तिचा हात हातात घेतो, तिला बिलगतो ती कविता त्या क्षणात सारीकाच्या मनात रुजते. तिच्यासाठी नसूनही. ...
किंवा सारिका जेव्हा शैलजाला म्हणते, "अजीब तो लगा, पर अच्छा अजीब लगा" त्या क्षणात या चित्रपटाचा सगळा साधेपणा सामावला आहे. 

एक गंमत आता पोस्ट लिहिताना लक्षात आली. प्रदीप स्वत:ची कविता वाचून दाखवतो आहे आणि कवितेतलं काहीही न कळणारा दीपांकर त्याला 'आगे?' विचारतो. प्रत्यक्षात दीपांकरची भूमिका साकारणारा स्वानंद किरकिरे स्वत: एक उत्तम कवी आणि गीतकार. हा मुद्दाम जुळवून आणलेला गंमतीशीर योगायोग असेल कदाचित, पण आवडला.
एक प्रसंगात आकाशपाळण्यात शैलजा आणि प्रदिप थोडा वेळ वरती असतात तेव्हा त्यांच्यातला संवाद अद्भुत आहे. 
अजुन एका प्रसंगात दीपंकर प्रदीप बद्दल बोलताना म्हणतो की त्याला पुरूषांवर विश्वासच नाहीय. पण तो माझ्यावर विश्वास ठेवू पाहतोय कारण तुझा माझ्यावर विश्वास आहे. वा ! काय सुरेख संवाद आहेत हे.! हे इतकं मोजक्या शब्दांत बायकोबद्दलचं कौतुक कसं कोण मांडु शकेल?
अजुन एक, सहजच वाटेल पण बॉलिवूडच्या टिपिकल पुरूषप्रधान संस्कृतीला हादरे बसतील असा आहे. फिरुन आल्यावर दीपंकर शैलजाच्या केसांना तेल लावतोय आणि एकीकडे ते दोघं मुलाशी गप्पा मारतात. फोन बंद झाल्यावर अचानक शैलजा वळते आणि विचारते मी भरतलाच विसरले तर? दीपंकर काही न बोलता केसांवरच थोपटतो आणि शांतपणे पुन्हा तिच्या डोक्यावर तेल मुरवत राहतो. इन मिन पाच सात मिनिटांचा प्रसंग पण हे असं बायकोने नवर्‍याकडुन तेल लावून घेणं मराठी सिरीयल मध्ये होईल? आणि झालंच तर background ला एखादं दर्दभरं गाणं वाजेल किमान दोन एपिसोड तरी नक्कीच संपतील यात आणि कन्सेप्ट ची पुरी वाट लागेल. असो च ते एक. 

शेफाली छायाने शैलजा ची भूमिका फारच अप्रतिम साकारली आहे. She is class apart... तिच्या चेहऱ्यावर वरचे हावभाव, बोलके डोळे पाहणं म्हणजे भारी अनुभव ठरतो. जयदीप अहलावत हा माझा आवडता अभिनेता आहे. मी पहिल्यांदा त्याला गब्बर इज बॅक मध्ये पाहिला. छोटा रोल होता. पण लक्षात राहिला. नंतर गँग ऑफ वासेपुर मध्ये... मग आवडतच गेला. He is versatile. Good underplay acting ! स्वानंद किरकरे चा किंचित काही काळ जेलस होऊन स्वतःच दुखावलेला नवरा आणि शैलजासोबत नव्याने नातं घट्ट झाल्यावर समंजस नवरा छान आहे. 

आता गेल्या काही वर्षांत अचानक कुठेतरी हरवल्यासारखं वाटू लागलं होतं, ते आज कितीतरी दिवसांनी पुन्हा अनुभवायला मिळालं. मन तृप्त झालं, शांत झालं, कुणाच्यातरी मांडीवर डोकं असावं आणि त्या व्यक्तीचा प्रेमळ स्पर्श आपल्याला काहीच सुचवत नाहीय, ती वासना नाही, सहानुभूती नाही काहीच नाही... फक्त कपाळावर, चेहर्‍यावर फिरणारे त्याचे हात आपल्या आत त्याचं प्रेम झिरपवत नेतात, मुरवत नेतात, मनाच्या दुखऱ्या अवघड जागेवर खपली धरु पाहतेय असं काहीतरी अनुभवायला मिळालं.