05 December, 2010

शांततेलाही आवाज असतो...

शोजा... हिमालयाच्या कुशीत वसलेलं असंख्य गावांमधलं एक पिटुकलं गाव. पन्नासपेक्षा कमी घरं असलेलं निर्मळ लोकांचं शांत निवांत गाव. मनाली मधली टिपिकल पर्यटकी ठिकाणं पुर्वीच पाहुन झाली होती. नवीन काय? ह्या गहन प्रश्नाचं उत्तर सोडवता सोडवता अचानक एके दिवशी अरुण अग्निहोत्री याचं हिमालयाच्या आडेवाटेवर अशा काहीतरी नावाचं पुस्तक हातात पडलं आणि शोजाचा शोध लागला. पण पुस्तकात सविस्तर असुन ते फार गांभीर्याने वाचलं नाही आणि तिथे गेल्यावर मात्र हे नाव ऐकुन तिथल्या ड्रायव्हर लोकांच्या चेहर्‍यावरचे भाव बघताना करमणुक झाली.

ज्यावेळेस ड्रायव्हरला विचारलं त्यावेळेस तो आधी चक्रावुन गेला. मला ‘औट’ माहिती आहे. पुढचं तुम्ही इथे या मग बघु असं वरवर म्हणाला असला तरी तो मनात मात्र वैतागला असणार हे लगेच लक्षात आलं. हे लोक मॅप्स घेऊन येतात आणि कुठले कुठले स्पॉटस् शोधुन काढतात या गोष्टीची त्याला गेल्यावेळेस नेहमी मजा वाटायची. तसंच यावेळेस झालं. तिथे पोचल्यावर त्याने त्याच्या ‘दोस्तलोगों’ ना विचारल्यावर निम्म्या लोकांना माहिती नव्हतंच आणि ज्यांना माहिती होतं त्या प्रत्येकाने काय विचित्र कस्टमर आहेत असा भाव चेहर्‍यावर दाखवला आणि रस्ता खराब आहे जाऊ नका असंही वर सांगितलं. पण आम्ही मात्र आमच्या निर्णयावर ठाम होतो. ते पाहिल्यावर ड्रायव्हरला हो म्हणावंच लागलं तिथे पोचल्यावर मात्र तोही खुप खुश झाला. ‘बहोत अच्छा लगता है’ असं वारंवार त्याने बोलुन दाखवलं.


सिमला- मनाली रस्त्यावर असलेल्या ‘औट’ गावावरुन शोजाकडे जायला आत एक फाटा फुटतो. सुरुवातीला छान छान असणारा हा 30-35 किलोमीटरचा ब्रिटीशकालीन रस्ता शेवटी मात्र खरोखरच वाईट होता. ड्रायव्हरची गाडी वर चढवताना दमछाक झाली.. आम्हांला पण मग वाटायला लागलं, निर्णय चुकला की काय? आम्हां सर्वांच्या आणि ड्रायव्हरच्या मते ठरलं की ‘दुपार होत आलीय. अजुन एखाद किलोमीटर पुढे जायचं, काही नसेलच तर परत मागे फिरायचं. मग संध्याकाळच्या उजेडात खाली परत गावात पोहोचता येईल. गाडीने एक-दोन वळणं घेतली आणि भली मोठी पाटी दिसली. “राजा गेस्ट हाऊस- शोजा”..... हुश्श.... अखेरीस शोजा आलं.


लगेच गाडी एका बाजुला लावली. दहा-बारा छान आटोपशीर खोल्यांचं आणि किमान सोयी असलेलं हे हॉटेल अगदी मोक्याच्या ठिकाणी होतं. खोल्यांच्या मागे असलेल्या व्हरांड्यामधुन हिमालयाच्या हिरव्यागार रांगांचं मनसोक्त दर्शन होत होतं. आत एकटाच एक नोकर होता. मालक खालती गावात गेला होता. नोकराजवळच सगळी चौकशी केली. अजुन पुढे पाच किलोमीटर वर ‘जलोरी पास’ नावाचं पहिलं ठिकाण होतं आणि तिथुनच पुढे सर्योलसर लेक ला जाण्यासाठी पायी रस्ता होता. शोजाला राहण्याची विशेष अशी व्यवस्था नाही हे त्याने न सांगताही कळत होतं. आम्ही सगळेच थकलो होतो.मुख्य म्हणजे ड्रायव्हरचा फार अंत पाहण्यात अर्थ नव्ह्ता. शोजाला निघायच्या नादात आम्ही गाडीत पेट्रोल भरलं नव्हतं. ‘औट’ ला विचारलं तर संपलेलं! मग शोजाला पोचल्यावर मात्र लगेच नोकराकरवी हॉटेलच्या मालकाला फोन लावला. कस्टमर आपल्याकडेच उतरणार म्हटल्यावर मी घेऊन येतो असं लगेच सांगितलं. मग लगेच खोली त्याब्यात घेतली. बॅगा ठेवल्या. आख्या हॉटेलमध्ये आम्हीच एकटे!! वरवर निर्धास्त झालो असलो तरी गाडीत पेट्रोल एकदम कमी होतं. दुसर्‍या दिवशी खाली परत जाता येईल ह्याची शाश्वती नव्हती. जलोरी पासचा तर विचार करणं सोडावं लागलं असतं. पण अखेरीस हो नाही करता परत मालकाला फोन केला. त्याने पुन्हा एकदा ठाम सांगितलं मी नक्की पेट्रोल घेऊन येतो. तुम्ही पास पाहुन या. मग मात्र इतका वेळ चिंतीत असलेल्या ड्रायव्हरच्या आवाजात एकदम उत्साह आला.

नोकराला रात्रीच्या जेवणाबद्दल थोडंफार सांगुन जलोरी पास ला जायला निघालो. गेस्टहाऊस पासुन पाच किलोमीटर वर असलेला हा जलोरी पास पुढे सिमल्याला जातो. जलोरी पास ला महाकाली देवीचं छोटं देऊळ आहे. देवळाच्याच बाजुने चेहनी कोठी आणि सर्योलसर लेकला जाण्यासाठी रस्ता होता. 10-12 किलोमीटरचा हा ट्रेक करण्यासाठी मात्र हातात पुर्ण दोन दिवस हवेत. सर्योलसर ला राहायची व्यवस्था होते असं स्थानिकांकडुन समजलं पण त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. तिथेच असलेल्या टपरीवजा हॉटेलमध्ये ‘राजमा-चावल’ खाल्लं. मग निरुद्देश भटकत राहिलो.

थोड्यावेळाने खाली गेस्ट हाऊस ला गेल्यावर मालकाने पेट्रोल आणलं होतं. ते भरुन मोठा सुटकेचा श्वास टाकला. संध्याकाळी मागच्या व्हरांड्यात मालकाशी बोलत असताना खुप मजेशीर माहिती कळली. शोजा हे गाव पर्यटन स्थळ म्हणुन नकाशावर आलं ते ब्रिटीशांमुळे. सिमल्याला राहणारे ब्रिटीश ऑफिसर्स रिकाम्या वेळात आजुबाजुच्या गावांमध्ये भटकत राहायचे. त्यापैकीच एका ब्रिटीश ऑफिसरला हे गाव बेहद्द आवडलं आणि या गावाला डांबरी रस्ता मिळाला. त्याच डांबरी रस्त्याची भारत सरकारने नाममात्र डागडुजी केलेली आहे. आम्ही त्याविषयी हळहळ व्यक्त करताच मालक म्हणाला, “रस्ता चांगला नाहीय तेच उत्तम आहे. म्हणुनच इथली शांतता टिकुन आहे. कारण सिमल्यावरुन मनालीला जाणारा हा रस्ता तुलनेने जवळचा आहे. हा रस्ता नीट झाला तर या रस्त्याला असणारी अवघड वळणं काढुन टाकली जातील आणि हे दिल्ली-पंजाबवाले गाड्या सुसाट सोडतील. त्यापेक्षा आहे हे उत्तम. आणि बर्फाच्या काळात मात्र हा रस्ता बंदच असतो. त्यामुळे तो फार काही नीट होणार नाही असं वाटतंय, निदान लगेचच्या काळात तरी...!!”

हळुहळु काळोख व्हायला लागला आणि मग आम्ही सर्वचजण निःशब्दपणे बसुन राहिलो. खुप सुंदर वाटत होतं.... समोरच्या हिरव्यागार रांगा सावकाशपणे काळ्या रंगात बुडुन जात चालल्या... आकाशात एक एक करत तारा उगवायला लागला.. किती वेळ गेला समजलंच नाही. खाली- आजुबाजुला शोजा गावातली माणसं केव्हाच काळोखात बुडुन गेली होती. कुठे कुठे लांबवर एखाद-दुसरा प्रकाशाचा ठिपका दिसत होता. रात्री उशीरा 8.30 ला जेवणासाठी नोकराने हाक मारली... तेव्हा भान आलं... आणि जाणवलं... आपण आता कोणताच विचार करत नव्हतो.... मनात कसलाही कोणाचाही विचार न येणं... निर्विचार राहणं हे किती अलगदपणे जमुन गेलं??? आणि एकदम हलकं सुखद वाटलं. गरम गरम वाफाळतं जेवण आणि बाहेरुन दरीतुन वर येणारा थंडगार वारा... पटापट जेवलो. काही वेळाने अलगद झोप डोळ्यांवर उतरली... तेव्हा एखाद दुसरा ठिकाणी दिसणारा प्रकाशही विझुन गेला होता... शोजा गाव शांत झोपलं होतं. आणि आकाशात तार्‍यांचा पाठशिवणीचा खेळ रंगला होता...

30 October, 2010

मनाली-रोहतांग पास


सिमला-कुलु-मनाली अशी टुर 4-5 वर्षापुर्वी केली असली तरी त्यावेळेस अम्ही एप्रिल महिन्यात गेलो होतो. त्यामुळे रोहतांग पास पर्यंत वर जाता आलं नाही.म्हणुन खास रोहतांग पास साठी जुन मध्ये जायचं ठरवलं.



हिमाचलमधल्या केलॉंग/लाहोल-स्पिती जिल्ह्याचं प्रवेशद्वार म्हणुन ओळखला जाणारा 50 किलोमीटर लांबीचा हा पास मनाली-लेह या हायवेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. वर्षातुन फक्त जुन ते ऑक्टोबर मध्ये सुरु राहणारी वाहतुक इतर महिन्यात मात्र पुर्ण ठप्प होऊन जाते. रोहतांग पास मधुन वाहतुक नेमकी कधी सुरु होते याबाबत हिमाचल प्रदेशच्या सर्व सरकारी साइटस् आणि आमचा माहितीतला तिथला ड्रायव्हर सर्वांना चार-चारदा विचारुन मगच जुन महीन्याची तिकीटं काढली... अशी बातमी वाचली आणि सर्वांनाच तिथे जाण्याचे वेध लागले.

शहर सोडुन बाहेर पडलो. घाटामधुन गोलाकार वळणं घेत घेत गाडी वर वर जाऊ लागली. ठिकठिकाणचा बर्फ वितळलेला दिसत होता. आणि हिवाळ्यात बर्फाने झाकलेले डोंगर हिरवेगार झालेले होते. पाच वर्षापुर्वी आम्ही जिथे स्नो-पॉईट म्हणुन थांबलो होतो... आणि तिथलं गोठलेलं तळं पाहिलं होतं तो भाग ही पुर्ण हिरवागार झाला होता आणि तिथल्या तळ्यात चक्क रिव्हर क्रॉसिंग सारखा काहीतरी खेळ सुरु होता!!

रोहतांग पास मध्ये आल्यावर मात्र स्वर्ग दोन बोटं उरला... चारही बाजुंनी हिमशिखरं... अधिका अधिक थंड आणि बोचरी होत जाणारी हवा... सोसाट्याचा वारा...वळणं घेत घेत केलोंग कडे (लाहोल-स्पिती) जाणारा रस्ता... उतारावरुन उतरत जाणार्‍या मेंढ्या... थोड्या-थोड्या वेळाने दिसणारे आर्मी-ग्रेफ चे ट्रक्स्... अप्रतिम वाटत होतं. प्रभाकर पेंढारकर यांनी लिहिलेल्या रारंग-ढांगाचं, किन्नोर-कैलास शिखराचं वर्णन सतत डोळ्यासमोर येत होतं... रोहतांगपास ही त्याची झलक होती. दोन-तीन तास थांबुन, मनसोक्तपणे निसर्ग डोळ्यात साठवुन परत निघालो...

28 October, 2010

परतीचा प्रवास

आज थिम्फु मध्येच भटकायचं असल्याने सावकाश उठलो... धोबीघाट उघडला... रविवार असल्याकारणाने सगळी पर्यटकी स्थळं बंदच होती. भुतानचं राष्ट्रीय ग्रंथालय पहाण्याची खुप उत्सुकता होती. मात्र तेही बंदच होतं. मग काय असंच गावात भटकलो. आणि खोलीवर परतुन गाढ झोपलो.
भुतान वरुन परत येताना भारत-भुतान सरहद्दीवरचं गारुमारा नॅशनल पार्क पाहिलं... मस्त निवांत दोन दिवस जंगलात राहिलो... भटकलो... पाहायला खास असं काही मिळालं नाही.. अर्थातच अपेक्षा नव्हतीच! येताना गारुमारा-हावडा बस प्रवास, हावडा-मुंबई विमान प्रवास आणि घरी... सोबत सुंदर आठवणी!!!

05 August, 2010

पुनाखा गाव (दोचु-ला पास मार्गे)


सकाळी 9.30 वाजता पुनाखाला जायला निघालो. वाटेत दोचु-ला पास लागलं.दोचु-ला पास इथे एक मुख्य बुध्द मंदीर आणि इतर 108 मंदिरांचा समुह आहे. इथुन हवामान स्वच्छ असताना बर्फाच्छादीत शिखरांचे दर्शन होते. तेथुनच पुढे पुनाखा गाव आहे. आम्ही तिथे असताना समोरच्या दरीत पुर्ण धुकं असल्याने आम्हांला एकही शिखर दिसलं नाही. पण धुक्यात गुरफटलेला दोचु-ला पास पहाणं हा एक सुंदर अनुभव होता. तिथुन खुप वेळ हलावसं वाटतच नव्हतं.




पुनाखा येथे एक अतिशय छान असा 16व्या शतकातील किल्ला आहे. हा किल्ला एका बेटासदृश ठिकाणी बांधलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजुंनी फ़ोचु आणि मोचु या दोन नद्या वाहतात आणि थोडं पुढे जाऊन त्यांचा संगम आहे. त्यापैकी एका नदीवर मोठा पुल असुन त्या पुलावरुन ह्या किल्ल्यात प्रवेश करता येतो. पुनाखा किल्ल्याच्या आतील बाजुला छताला, आधाराच्या खांबाला सर्वत्र सोन्याचा मुलामा दिलेला आहे आणि त्यावर भुतानी आणि बुध्द शैलीतील कोरीव काम आहे. पुनाखा मधुन बाहेर पडुन परत थिम्फुला येईपर्यंत संध्याकाळ झाली. थिम्फुला आल्यावर परत एकदा भाजीबाजार आणि कापडबाजाराला भेट दिली आणि मग संध्याकाळी थोडीफार खरेदी केली.

01 August, 2010

राष्ट्रीय संग्रहालय (पारो) आणि थिंफुचा भाजीबाजार

28 तारखेला सकाळी राष्ट्रीय संग्रहालय पाहीलं. भुतान राष्ट्रीय संग्रहालयाची गोलाकार आणि 6 मजली इमारत(बिल्डींग) बाहेरुन एकदम साधी पण आतुन मात्र लाकडावरील कोरीवकामाने नटलेली आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. टेकडीच्या उताराचा कल्पक रीतीने उपयोग करुन घेतल्याने संग्रहालयाची वास्तु बाहेरुन पहाताना भव्य वगैरे वाटत नाही. संग्रहालयात आपण प्रवेशच मुळात तिसर्‍या मजल्यावरुन करतो. तिसर्‍या मजल्यावर प्राचीन वस्तु, निरनिराळ्या समारंभ प्रसंगी वापरायचे आणि निरनिराळ्या प्रांतातील भुतानी वेशभुषेचे प्रकार, दागिने, थांगा चित्रशैलीतील भित्तीचित्रे वगैरे आहे. खाली तीन मजले (तळमजला आणि 2 मजले) आणि वर तीन मजले आहेत.

थांगाचित्र शैली, मोठमोठ्या चहाच्या किटल्या, बांबुचे धान्य साठवण्याचे पेटारे, बांबुचीच अनेकविध हत्यारे, धातुची हत्यारे-बंदुका, लहान मुलांचे खेळ, पेंढा भरुन ठेवलेले भुतानी प्राणी-पक्षी, प्राचीन बुध्द मुर्ती आणि इतर असंख्य बुध्दरुपे, धार्मिक कार्यासाठी वापरले जाणारी खास वेगळ्या घाटाची भांडी, घंटा आणि इतर वाद्ये, प्राचीन छायाचित्रांचा संग्रह हे सगळं अतिशय सुरेख रीतीने मांडुन ठेवलेलं आहे. याशिवाय भुतानचा स्टँपसंग्रह न चुकवता पहावा असा आहे. जगामध्ये प्रथम भुतानने थ्री डायमेंशनल स्टॅम्प काढला. स्टीलवरचा आणि सिल्कवरचा स्टॅम्प काढला. हे सर्व स्टँपस् माहितीपर टीपा देऊन सुंदर रीतीने जतन केलेले आहेत. संग्रहालयातील स्टॅम्पसमध्ये निरनिराळे पशु-पक्षी, फुले, नेते, जागतिक स्तरावर घडलेल्या महत्वाच्या घटना यांची चित्रे असलेली रंगी-बेरंगी स्टॅम्प होते. याशिवाय हिमालयातील गुढ आकर्षण असलेल्या यतीचा स्टॅम्प (यतीचे काल्पनिक चित्र) पहाण्याजोगा आहे.


थिंफु मध्ये परत...
सकाळी संग्रहालय पाहुन आणि जरावेळ गावात फेरफटका मारुन दुपारी थिंफुला परत आलो. हातात वेळ असल्याने प्रथम पुनाखा या गावी जाण्यासाठी प्रवेश पत्रिका( एन्ट्री पास/ परमिट) करायला गेलो आणि संध्याकाळी आठवडा बाजार पाहायला गेलो. भाजीपाला, कडधान्ये, तांदुळ, डाळी, दुध आणि दुधाचे पदार्थ (फक्त याकचे आणि शेळ्या-मेढ्यांचे दुध), कपडे यांची दुकाने होती. या बाजारासाठी खास एक मजली इमारत बांधली आहे. अर्थातच आजु-बाजुला खास पार्कींगसाठी निराळी सोय आहेच. इमारती मध्ये ऐसपैस कट्टे बांधलेले आहेत. हा बाजार शुक्रवार ते रविवार असा तीन दिवस असतो. आजुबाजुचे शेतकरी माल विक्रीस आणतात. थिंफु व जवळपासच्या परीसरातील स्थानिक आठवड्यासाठी खरेदी करतात. कोणताही आठवडी बाजार पहाणं हीच एक मुळात आनंदाची गोष्ट असते.बहुसंख्य भुतानी भाजी विक्रेत्या बायकांना हिंदी येत नव्हतं. तरीही आमच्या ड्रायव्हरच्या मदतीने त्यांच्यांशी संवाद साधताना मजा येत होती. आणि ड्रायव्हरदेखील उत्साहाने आम्हांला सगळं दाखवत होता. मात्र बाजार पाहायला आम्हांला संध्याकाळ झाल्याने आम्ही कापड बाजारात जास्त फिरलो नाही. ती उणीव आम्ही शेवटच्या दिवशी भरुन काढली.