14 September, 2025

आज गप्प बसून राहिलो तर पुढच्या पिढीला काय आपण काय देणार?

गेल्या काही दिवसांत सर्जनशील, संवेदनशील आणि सतत तर्काच्या कसोटीवर आपले विचार तपासून घेणाऱ्या लोकांच्या पोस्ट वाचल्या. पॉडकास्ट ऐकलेत. त्यात एका प्रकारची हतबलता आहे. किती दिवस हे फक्त आपण लिहीत राहणार आहोत. बोलत राहणार आहोत. याने काही फरक पडत नाहीय. अशी ती हतबलता आहे. सात्विक संताप आहे. त्यानिमित्ताने ..

विवेकी, सद्सद् बुद्धी आजही जागृत असलेल्या लोकांनी एकत्र यावं, संघटित व्हावं याची गरज दिवसेंदिवस वाढते आहे. विवेकवादी, तर्कनिष्ठ लोक तसे एकेकटेच पडतात. माझ्यासारख्या लोकांना काहीच वावगं खपवून घेता येत नाही. त्यात सगळंच येतं. माणसाच्या सार्वजनिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, राजकीय बाजूतलं सर्वच. जे जे सामान्यतः लोकांना आवडतं त्यावरच प्रश्न उभे करावेत असं सतत मला वाटत असतं.  मेल्यानंतर सगळं इथेच रहाणार; त्यावरुन जिवंत असताना माणसांनी कसलेच घोळ घालू नयेत, हाणामाऱ्या, खून-अत्याचार तर अजिबात करू नये यात वेगळं सांगावं लागायला कशाला पाहिजे असं खुपदा वाटतं.

या *** राजकारणात स्थिर मानसिकतेची, खाऊन पिऊन सुखी आयुष्याची शाश्वती राहिलेली नसताना बायका का म्हणून या पाळी पुढे मागे करायच्या गोळ्या घेतात? जी बाई पहाटे उठून दोन दोन डबे करुन आठ वाजता बाहेर पडत असेल तर ती बाई चार चार दिवसांच्या स्वयंपाकाची तयारी फ्रिजमध्ये ठेवते तर ते शिळं होतं? लगेच तुमच्या घरात भुतं नाचतात??? घराबाहेरचे *** राजकारणी भुतांपेक्षा काय कमी भितीदायक आहेत का? कणीक फ्रिज मध्ये ठेवल्याने यापेक्षा अधिक धोकादायक कुठलं भुत तुमच्या घरात नाचणार आहे? हे एकच उदाहरण झालं, पण सतत अनंत कारणांवरुन कोणाच्या न कोणाच्या भावना दुखावल्या जातात...

मुळात माणसाला घरात देवाची मुर्ती असताना देऊळ हि संकल्पनाच का लागते हा खूप वर्षांपासूनचा माझा प्रश्न आहे. . यावर मी पूर्वीही लिहिले आहे. एकाने त्यावर लिहिलं होतं की पुर्वीच्या काळी चार लोकांना एकत्र यायला जागा हवी. ठीक आहे, काही मिनिटांसाठी आपण हे मान्य करुयात. पण  आजच्या काळात उत्तम कारागीर बोलावून स्थानिक पध्दतीची वास्तुशैली वापरून उत्तम सभागृह उभारावीत. एकत्र येण्यासाठी प्रार्थनास्थळच का? त्या सभागृहात सर्व धर्मातील लोकांनी एकत्र यावं. नृत्य, गायन, संगीत, चित्रकला, वाद्यवादन यांचे नियमित कार्यक्रम करावेत. नाममात्र फी घेऊन मोठमोठी मैदाने सांभाळावीत. तिथे मैदानी खेळ खेळले जावेत. झाडांची जोपासना करावी. वृक्ष म्हणुन पसरले की त्यांना छान लांब, रुंद, ऐसपैस पार बांधावेत. जुन्या वस्तूंची, पुस्तकांची कायमस्वरूपी प्रदर्शन असावीत. हे भविष्यातले स्वप्न रंजन झाले. आज जी मोठेमोठी देवळे आहेत तिथे सरसकट सर्व ठिकाणी असे दर महिन्यातून किमान एक असे बारा महिन्यांचे बारा कार्यक्रम असे कला दर्शनाला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम हवेत. खरे म्हणजे लोकसंख्येचा विचार केलातर आठवड्याला एक कार्यक्रम हवा. तिथेही मोठमोठे वृक्ष पसरलेले हवेत. सार्वजनिक हळदीकुंकू हा पूर्णत: राजकीय अजेंडा आहे. सांस्कृतिक नव्हे. 

Prince of Wales Museum,  Dr. Bhau Daji Lad Museum ICSE किंवा CBSE शाळांच्या ट्रीपमध्ये समाविष्ट केलं जात का?  RBI Monetary Museum, Mumbai सर्वांसाठी खुले आहे, आणि तेही पूर्णपणे मोफत. पण ही साधी माहिती देखील किती शाळांच्या संस्थाचालकांना आहे? दरवर्षी एकाच रिसॉर्टला मुलांना नेलं जातं, पण दरवर्षी संग्रहालयांना न्यावं हा उत्साह किती शाळांमध्ये आहे? संग्रहालयं, जी खऱ्या अर्थाने ज्ञानाचं आणि अनुभवाचं दालन आहेत, त्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. दरवर्षी संग्रहालयांना सहली नेणं ही शाळांची जबाबदारी आहे.

आपल्या भारताच्या परंपरा, दानधर्म, पुजा, नैवेद्य करण्याच्या चालीरीती असंख्य आहेत आणि त्या तशा आहेत म्हणुनच आज हा भारत आहे. गेल्या काही वर्षांपासून जे चालु आहे ते थोडं बाजुला ठेवुन पुर्ण सत्तर ऐंशी वर्षांचा विचार केला तर तो एकमेव निधर्मी आणि सर्वसमावेशक देश होता. भविष्यात असेल का नाही मला माहिती नाही. विविधतेने नटलेल्या या परंपरांचा मला अभिमान आहे ह्या वाक्याचा अर्थ सर्वधर्मीय, सर्वजातीय परंपराचा अभिमान असा होतो. फक्त एकाच विशिष्ठ विचारसरणीच्या चालीरीती नव्हेत. जे अस्सल ग्रामीण भारतीय सण आहेत अर्थातच सर्व धर्मांतले सण; मी महाराष्ट्रापुरतं म्हणेन... तर ते सण, त्या सणांची निर्मिती, मूळ शेतकरी, कुळ यांनी त्यांच्या नैसर्गिक ऋतू, कालचक्र त्यायोगे शेतीविषयक व अलुतेबलुतेदारीच्या कामाच्या विभागणी, सोय आणि सवडीनुसार केलेली आहे. नंतर कालौघात त्यांचं धार्मिकीकरण, व्यापारीकरण करुन व्यवसायिक आणि कर्मठ लोकांनी आर्थिक नफातोट्याची गणितं मांडून आपापलं हित जोपासलं असावं असा एक अंदाज आहे.

डॉ. श्रीराम लागू यांचा "माझं बुध्दी प्रामाण्य" नावाचा जुना लेख आहे.  ते लिहितात, "प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये फरक कुठला असेल, तर माणसाला बुद्धिमत्ता आहे, विचारशक्ती आहे, स्मरणशक्ती आहे. तर प्राण्यात ती नाही. असं सांगतात, माणसाचा चार पंचमांश मेंदू जनावराचा आहे आणि एकपंचमांश मेंदू केवळ माणसाचा आहे. हा माणसात व प्राण्यात असलेला फरक आहे. माणूस आपली विचारशक्ती दुसऱ्या कुणाकडे गहाण टाकतो, तेव्हा तो सबंध माणूसजातीचा अपमान करतो. तो जाणूनबुजून एक बौद्धिक, मानसिक गुलामगिरी पत्करतो. ही गोष्ट फार चिंतेची आहे, असं मला वाटतं. ...  सागराला, सूर्याला नमस्कार करणं हा संस्काराचा भाग आहे. मात्र मी नमस्कार केला नाही, तर अपटीत घडेल, हा श्रद्धेचा भाग झाला. पूजेला माझा विरोध नाही, पण पूजा काही स्वार्थी भावनेनं केली जाते, त्याला माझा विरोध आहे. पूजेला विरोध करण्याचं कारण नाही. त्यामध्ये भावना कुठल्या आहेत, ते महत्त्वाचं आहे. समुद्र ही नियतीची एक शक्ती आहे. ती मला भरपूर देते. त्यावर माझं आयुष्य अवलंबून आहे. आणि असा समुद्र थोडा ओसरला आहे. उद्यापासून माझ्या बोटी मी हाकारणार आहे, तर त्याआधी हा तुला नमस्कार. हा अतिशय सुंदर संस्कार आहे. .. म्हणून पूजा करणं या प्रकाराला माझा विरोध नाही. त्यामागे भावना काय आहे हे महत्त्वाचं आहे. परमेश्वराची पूजा करतात, त्याबद्दल मला आदर आहे. मला तो व्यक्त करावासा वाटतो आणि ती कृतज्ञता व्यक्त करणं, हा सुंदर संस्कार आहे. "

दोन गुणिले दोन चार आणि दोन अधिक दोन चार हे असंच असणार आहे हा गणिताचा नियम आहे. हा नियम ब्राह्मण शिक्षकाने शिकवला म्हणुन बदलणार नाही की मुस्लिम शिक्षकाने शिकवला म्हणुन बदलणार नाहीय. पण सतत एकमेकांच्या धर्माचा, जातींचा तिरस्कार करुन, द्वेषपुर्ण वाक्यं फेसबुक, ट्विटर वर लिहुन कोणतं भविष्य साध्य करु पाहतो आहोत आपण?

आज विशी-तिशीच्या पिढीसमोर AI tools  वापरुन स्वतःला नोकरी धंद्याच्या जगात survive करायचं सर्वात मोठं आव्हान आहे. ह्यासाठी आज चाळीशी- साठीच्या पिढीतील लोकांकडे ती टुल्स वापरायची टेक्निक्स नाहीयेत पण बहुतांशी लोकांकडे विचारांचे तारतम्य आहे. हे तारतम्य कसे वापरायचे हे तरुणांना तुम्ही शिकवा. ती मुलं तुम्हाला टेक्निक्स शिकवतील. तुम्ही जर तिरस्कार पेरत राहिलात तर तरुण मुलांच्या अंगातील उसळत्या उर्जेला धोकादायकच वळण लागेल. आता काय केलं म्हणजे घराबाहेर अतिरेकी धर्माचा विचार घेऊन येणाऱ्या माठ लोकांना समजेल? त्यांच्या डोळ्यांवरची जातीपातीची झापडं गळुन पडतील याचं उत्तर मीही शोधतेच आहे. 

मी माझ्यापुरता मार्ग शोधलाय. आपण या समाजात बौध्दिक आणि मानसिक पातळीवर एकटे नसलो तरी असंघटित आहोत. हे मी स्वतःपुरतं मान्य केलंय. मी नोकरी करत नाही. माझ्या आसपासचे जग लहान आहे पण त्यांच्या डोक्यात भरवुन दिलेल्या उलटसुलट टोकाच्या विचारांबद्दल सतत स्वच्छ शब्दांत न चिडता प्रश्न विचारत राहते. मत मांडत राहते. एका पिढीत होणारे हे बदल नव्हेत. आपल्या आधीच्या पिढीत बदल घडवणे सर्वार्थाने कठीणच आहे. पण चिऊला ह्यांपासून दूर ठेवायचा प्रयत्न करते. तिला अभ्यासाचं, logic and rationality यांचं महत्व लहान लहान प्रसंगातून सांगत राहायचं इतकं मी माझ्यापुरतं सांभाळते. 

कधी जमतं, कधी गप्प बसते.